‘ड्रीम टीम टूर’ दौऱ्या दरम्यान आपल्या जबरदस्त डान्स परफॉर्मन्सने अनेकांना घायाळ करणारे वरुण धवन आणि कतरिना कैफ सिनेमातही एकत्र येऊ शकतात. आता दोघंही उत्तम नृत्य करु शकतात हे तर सगळ्यांनाच माहित आहे. म्हणून कदाचित ही जोडी ‘एबीसीडी ३’ मध्ये एकत्र येऊ शकतात. आतापर्यंत प्रदर्शित झालेले या सिनेमाचे सगळेच भाग लोकांना आवडले आहेत. ‘एबीसीडी-२’ या सिनेमातून वरुण आणि श्रद्धा ही जोडी पाहायला मिळाली होती. पण आता ‘एबीसीडी- ३’ मध्ये वरुण आणि कतरिनाची जोडी पाहायला मिळू शकते.
अशा चर्चा जरी असल्या तरी दिग्दर्शक आणि निर्मात्यांकडून ‘एबीसीडी-३’ मध्ये वरुण आणि कतरिनाच्या नावावर शिक्कामोर्तब झालेले नाही. पण ड्रीम टूरच्या दरम्यान या दोघांमध्ये चांगली केमिस्ट्री पाहायला मिळाली. त्यामुळे त्यांच्या या केमिस्ट्रीकडे कोणत्या ना कोणत्या सिनेनिर्मात्याची नजर तर नक्कीच पडली असेल. सध्या कतरिना तिचा आगामी सिनेमा ‘बार बार देखो’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात सिद्धार्थ मल्होत्रा बरोबरची तिची जोडी अनेकांना पसंत पडत आहे.
तर दुसरीकडे, वरुणचा नुकताच ‘ढिशुम’ हा सिनेमा येऊन गेला. या सिनेमात वरुणसोबत जॉन अब्राहम आणि जॅकलिन फर्नांडिसही होते. या सिनेमात परिणीती चोप्रा बरोबर त्यांच एक आयटम साँगही होतं. आता तो आलिया भट्ट आणि पंकज कपूरबरोबर रोमॅण्टिक- ड्रामापट असलेला सिनेमा ‘शुद्धी’मध्ये दिसणार आहे. या सिनेमाचा निर्माता करण जोहर आहे.