राजेश पाटील निर्मित आणि भीमराव मुडे दिग्दर्शित ‘कौल मनाचा’ या आगामी मराठी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांच्या हस्ते पार झाला. या वेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर आणि चित्रपटातील कलाकार व तंत्रज्ञ उपस्थित होते. मानवी मनाच्या अंतरंगाचा वेध चित्रपटात घेण्यात आला आहे. चित्रपटात राजेश शृंगारपुरे, समीर धर्माधिकारी, अमृता पत्की, विजय गोखले, विजय चव्हाण, जयवंत वाडकर आदी कलाकार आहेत.
‘विकी वेताळ-२’ डिस्ने वाहिनीवर
‘डिस्ने’ वाहिनीवर ‘विकी वेताळ’ मालिकेचे दुसरे पर्व सुरू झाले आहे. ‘विकी वेताळ-२’ या नावाने दर रविवारी सकाळी दहा वाजता डिस्ने वाहिनीवरून नव्या भागातील विक्रम वेताळाची कथा पाहायला मिळणार आहे. या पर्वात साधील कपूर हा ‘विकी’ची भूमिका करत आहे.

लघुचित्रपट महोत्सव
अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या ऐरोली शाखेतर्फे नवी मुंबई येथे नुकताच लघुचित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला होता. संपूर्ण महाराष्ट्रातून ६५ हून अधिक लघुचित्रपट महोत्सवात सादर झाले. या महोत्सवासाठी पुरुषोत्तम बेर्डे, अमित राय, विजू माने, राजा फडतरे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. सहभागी झालेल्या लघुचित्रपटांतून सवरेत्कृष्ट दहा लघुचित्रपटांची निवड करण्यात आली. यात ‘आयडेंटिटी’, ‘सारथी’, ‘मुंबई एरर’ या तीन लघुचित्रपटांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. अभिनेता अशोक समर्थ यांची प्रकट मुलाखत या वेळी घेण्यात आली. चित्रपट लेखिका मनीषा कोर्डे यांनी लघुचित्रपट निर्मात्यांशी पटकथा व संवाद या विषयांवर चर्चा केली. अभिनेता पवन मल्होत्रा यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

‘शाली’ चित्रपटात कोकणातील दशावतार
निर्माते जयसिंग साटव आणि दिग्दर्शक अतुल साटम यांच्या ‘शाली’ या चित्रपटात कोकणातील ‘दशावतार’ या लोककलेचा खुमासदार वापर करण्यात आला आहे. कोकणातील चालीरीती, परंपरा, मानवी स्वभावाचे दर्शन या चित्रपटात घडणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी चित्रपटाचे संवाद लिहिले असून हा चित्रपट २७ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. रूपकुमार राठोड, बेला शेंडे आणि आरती अंकलीकर-टिकेकर यांनी चित्रपटातील गाणी गायली आहेत. गाण्यांचे गीतकार गुरू ठाकूर, मकरंद सावंत असून विजय नारायण, नंदू घाणेकर यांनी ती संगीतबद्ध केली आहेत. चेतना भट, विजय गोखले, जयवंत वाडकर, संजीवनी जाधव, दिगंबर नाईक, दशावतारी कलाकार दादा राणे ऊर्फ दादा कोणस्कर आदी कलाकार आहेत. प्रसिद्ध नेत्रशल्यविशारद डॉ. तात्याराव लहाने आणि अभिनेत्री अलका कुबल चित्रपटात विशेष भूमिकेत आहेत.