अंकुश चौधरी, तेजश्री प्रधान, अभिनय बेर्डे तसेच आर्या आंबेकर अभिनित  ‘ती सध्या काय करते’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे. उत्तम कथानक, उत्तम अभिनय तसेच उत्तम संगीत याने नटलेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. या सिनेमाला निलेश मोहरीर यांचं संगीत असून यातील ‘परीकथा’ या गाण्याला सोशल साईटवर चांगला प्रतिसाद मिळत आहे. हे गाणं कौशिक देशपांडे याने गायलं आहे. कौशिकचं ‘परीकथा’ हे गाणं अभिनय बेर्डे याच्यावर चित्रित करण्यात आलं आहे.

‘सारेगमप'(हिंदी), ‘इंडियन आयडॉल’ तसेच ‘सारेगमप'(मराठी)  या रिएलिटी शोमध्ये कौशिक टॉप सेव्हनमध्ये होता. मराठी संगीताचं बाळकडू कौशिकला त्याच्या घरातूनच मिळालं. मेहंदीच्या पानावर या गाजलेल्या आर्केस्ट्रामध्ये कौशिकची आई प्रणिता  देशपांडे गायिका होत्या, तर त्याचे वडील एकनाथ देशपांडे हे  शंकर जयकिशन यांच्याकडे वादक होते. एकनाथ देशपांडे यांनी ‘मोहम्मद रफी’ तसेच ‘मन्ना डे’ यांना देखील साथ दिली आहे. रिएलिटी शो मधून संगीतक्षेत्रात पदार्पण करणाऱ्या कौशिकने  या काळात हिंदी सिनेसृष्टीतले नावाजलेले संगीत दिग्दर्शक  ‘प्रीतम’ आणि ‘आदेश श्रीवास्तव’ यांच्याकडे म्युझिक अरेंजर म्हणून चार वर्षे काम केले. ‘शॉर्टकट’ या सिनेमासाठी म्युझिक अरेंजर म्हणून काम पाहणाऱ्या  कौशिकने या सिनेमातील ‘मखमली’  हे गाणं स्वतः गायलं आहे. गायक म्हणून  कौशिकचा हा पहिलाच सिनेमा आहे. ‘मखमली’ या गाण्याचा किस्सा असा आहे की  या गाण्यासाठी कौशिकने काही स्क्रॅचेस आपल्या आवाजात बनवले होते, हे स्क्रॅचेस निलेश मोहरीर यांना आवडले आणि त्यांनी कौशिकला या सिनेमासाठी गाणं गाण्यास सांगितले. इथून कौशिकचा मराठी सिनेसृष्टीतील संगीताचा प्रवास सुरु झाला. कौशिक देशपांडे हा उभरता गायक लवकरच आपल्याला अनेक चित्रपटांमधून आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध करणार आहे.

photo4