अभिनेता अक्षय कुमार नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. त्याच्या विविध धाटणीच्या भूमिकांपासून ते अगदी त्याच्या समाजसेवेसाठी हा खिलाडी कुमार अनेकांचीच दाद मिळवत असतो. आपल्या देशाप्रती प्रचंड आदर असणाऱ्या अक्षय कुमारने आजवर अनेक चित्रपटांमध्ये सैन्य अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. त्यामुळे सैन्याप्रती आपली जबाबदारी जाणणाऱ्या खिलाडी कुमारने सीमा सुरक्षा दलातील शहीद जवान गुरनाम सिंगच्या कुटुंबियांना मदतीचा हात दिला आहे.

खिलाडी कुमारने शहीद गुरनाम सिंगच्या कुटुंबियांना ९ लाख रुपयांची मदत देण्याचे ठरवले आहे. ज्या ठिकाणी शहीदांच्या कुटुंबियांपर्यंत मदत पोहोचवण्याच्या फक्त घोषणाच केल्या जात आहेत आणि या मदत निधीवरुनही राजकारण रंगत आहे त्याच ठीकाणी खिलाडी कुमारने दिलेला हा मदतीचा हात अनेकांनाच परिस्थीतीचे गांभीर्य सांगून जात आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये कथुआ या पाकिस्तानलगतच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरील भागात दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडत असताना जखमी झालेले जवान गुरनाम सिंग यांचा उपचार घेत असताना जम्मूतील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात मृत्यू झाला. २६ वर्षांच्या गुरनाम सिंग यांनी शुक्रवारी सीमेवर दहशतवाद्यांनी केलेल्या स्नायपर हल्ल्याचा प्रतिकार केला होता व त्यात ते जखमी झाले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, सैन्यदलाप्रती अतर कलाकारांनीही आपली सहामनुभूती आणि आदर व्यक्त केला आहे. त्यामुळे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासोबतच या कलाकार मंडळींना देशाप्रतीच्या जबाबदारीचीही जाण आहे असेच म्हणावे लागेल.