द कपिल शर्मा शोने त्यांच्या एका स्किटसाठी आपला विनोद चोरल्याचा आरोप कॉमेडियन अभिजीत गांगुलीने केला होता. अभिजीतने त्याच्या फेसबुक अकाऊंटवरुन याबाबत रागही व्यक्त केला होता. अभिजीतची ही पोस्ट काही तासांतच व्हायरल झाली. लोकांनी कमेन्ट बॉक्समध्ये या शोबद्दल वाईट प्रतिक्रिया द्यायला सुरूवात केली. ‘आमची टीम खूप मोठी आहे. प्रत्येक एपिसोडआधी आम्ही खूप चर्चा करतो. सहज बोलताना कोणीतरी हा जोक सांगितला आणि आम्ही तो आमच्या स्क्रिप्टमध्ये घेण्याचा निर्णय घेतला.’ असे स्पष्टीकरण किकू शारदाने दिल्याचे  ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने म्हटले आहे.

किकू म्हणाला, ‘त्या विनोदासारखीच एखादी कल्पना आमच्या लेखकाच्या डोक्यात आली असेल किंवा हाच जोक त्याने इतर कुठून ऐकला असेल ही शक्यता नाकारता येत नाही. शिवाय एसएमएस किंवा व्हॉट्सअॅपवर आलेले जोक शोमध्ये वापरु शकत नाही असं काही नाहीये. प्रत्येक विनोद कोणी लिहिला, कुठून आला आणि कोणाचा आहे याचा रेकॉर्ड तर कोणी ठेवू शकत नाही.’

शोमध्ये किकू शारदाने एक जोक ऐकवला होता. ज्यात तो म्हणाला की, ‘जेवढेही वेगवान गोलंदाज असतात, त्यांचा एक मोठा भाऊ असतो आणि ते यासाठी वेगवान असतात कारण मोठ्या भावाकडून फलंदाजी मिळवणं फार कठीण असतं म्हणून ते वेगवान गोलंदाजी करतात. हा जोक स्टॅण्डअप कॉमेडीयन अभिजीत गांगुलीने त्याचा स्वतःचा असल्याचा दावा केला होता.

दरम्यान, नुकताच कपिलने त्याच्या ‘द कपिल शर्मा शो’च्या १०० व्या भागाचे दणक्यात सेलिब्रेशन केले. कपिलने सर्व चाहत्यांचे आणि सहकलाकारांचे आभार मानत, त्यांच्यामुळेच हा शो वर्षभरात इतका यशस्वी होऊ शकला अशी कबुलीही दिली.