शरीरावर केल्या गेलेल्या शस्त्रक्रिया, ट्विटरवरील फॅन फॉलोइंग व अधुनमधून इंटरनेटवर लीक होणारे व्हिडीओ यांमुळे सतत चर्चेत असणारी हॉलीवूड अभिनेत्री किम कर्दाशियन सध्या डोनाल्ड ट्रम्पवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहे. तिची चार वर्षांची मुलगी ट्रम्पपेक्षा उत्तम कारभार सांभाळू शकते, अशा शब्दांत तिने अमेरिकन प्रशासनाची खिल्ली उडवली आहे. तिच्या मते अमेरिका हा देश प्रगतीचे प्रतीक म्हणून जगभरात ओळखला जातो. लिंगभेद, वर्णद्वेष यांसारख्या चुकीच्या परंपरांविरोधात लढा देत आधुनिक विचारांचा संदेश या देशाने जगाला दिला आहे. जगभरातील महत्त्वाकांक्षी लोकांना आपले ज्ञान, कला जगासमोर मांडण्याची संधी अमेरिकेने दिली. अशा या सुजलाम सुफलाम देशात डोनाल्ड ट्रम्प म्हणजे एक धोक्याची घंटा आहे. त्यांच्या विचारसरणीमुळे समाजात अराजकता पसरत असून त्यांना वेळीच रोखणे गरजेचे आहे, असे मत किमने व्यक्त केले. याआधी नुकत्याच पार पडलेल्या ‘६९व्या एमी प्राइमटाइम’ पुरस्कार सोहळ्यातही लिली टॉमलिन, एलेक बाल्डविन, डोनाल्ड ग्लोवर, स्टीफन कोलबर्ट, डॉली पार्टन, जेन फोंडा या कलाकारांनी अमेरिकन प्रशासनावर जोरदार टीका केली होती. या सर्वानी अमेरिकन प्रशासनाच्या वृत्तीवर मिष्किल शब्दांत भाष्य केले. त्यांच्या मते ट्रम्प यांनी समाजातील विकृत वृत्तींना सक्रिय केले आहे. संपूर्ण जग आधुनिक विचारांची कास धरून प्रगतीच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना अमेरिका मात्र पुन्हा एकदा जुनी मूल्यं स्वीकारून अधोगतीच्या दिशेने जात आहेत.