सोशल मीडिया हे एक असं माध्यम आहे ज्या माध्यमातून जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातील व्यक्तीसोबत तुम्ही जोडले जाऊ शकता. दिवसागणिक विविध अॅप्सवर उपलब्ध होणारी माहिती आणि हाताशी असणारं इंटरनेट या सर्वांमुळे आपले आवडते सेलिब्रिटी नेमके काय करत आहेत, त्यांचं आयुष्य कसं असेल याचा अंदाज आपल्याला येतो. पण, कधीकधी सोशल मीडियावर चाहत्यांशी जोडलं जाणं अनेकांच्या अंगलट येतं.

एकाएकी सोशल मीडिया वापरणाऱ्यांना दक्षतेचा इशारा देण्यात येण्यामागचं कारण म्हणजे सध्या एक स्पॅम अकाऊंट अनेकांच्या सोशल मीडिया अकाऊंटमध्ये शिरकाव करत आहे. मुख्य म्हणजे कोणीतरी एक व्यक्ती बोगस फेसबुक अकाऊंटच्या माध्यमातून या सेलिब्रिटींच्या फ्रेण्ड लिस्टमध्ये असल्याचं लक्षात आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्या व्यक्तीची सायबर सेलकडे तक्रारही दाखल करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच अपूर्वा नेमळेकर या मराठी अभिनेत्रीचं सोशल मीडिया अकाऊंट हॅक झाल्याचं लक्षात आल्यानंतरच ही तक्रार दाखल करण्यात आली होती. सध्या हे स्पॅम अकाऊंटही ब्लॉक करण्यात आलं आहे. पण, जर का तुम्हाला अशा कोणत्याही नावाने रिक्वेस्ट आली तर त्यासंबंधी योग्य ती काळजी घेण्याचा इशारा देण्यात येत आहे.

नेहा मांडलेकर म्हणजेच मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकरच्या पत्नीने तिच्या फेसबुक अकाऊंटवरुन एका स्क्रीनशॉटच्या माध्यमातून सर्वांनाच एक प्रकारचा इशारा दिला. ‘कृपया या नावाचं अकाऊंट तुमच्या फ्रेंण्ड लिस्टमध्ये असल्यास ते अनफ्रेण्ड करा किंवा ब्लॉक करा. कारण हे स्पॅम अकाऊंट आहे. कारण, मी त्याची रिक्वेस्ट न स्वीकारताही माझ्या फ्रेण्डलिस्टमध्ये तो दिसत होता. त्याशिवाय म्युच्युअल फ्रेंड्समध्ये काही ओळखीची नावंही मला दिसली’, असं नेहाने या अतिशय महत्त्वाच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

तिच्या म्हणण्यानुसार प्रशांत दामले, महेश लिमये, शिल्पा तुळसकर, विवेक लागू, निवेदिता सराफ या कलाकारांच्या फ्रेण्ड्स लिस्टमध्येही मोहम्मद अली अब्देलवाहाब या नावाने ही बोगस व्यक्ती आढळली आहे. त्यामुळे आता सोशल मीडियाच्या बाबतीतही दक्षता राखण्याची गरज असल्याचं लक्षात येतंय.