मध्यप्रदेशमधील खंडवा महानगरपालिकेने गुरूवारी गायक- अभिनेते किशोर कुमार यांचं घर पाडण्याची नोटीस जारी केली. किशोर कुमार यांचं मध्यप्रदेशच्या खंडवातील घर हे सुमारे १०० वर्षे जुने आहे. या घरातच त्यांचं बालपण गेलं आहे. किशोर कुमार, अशोक कुमार आणि अनूप हे तीनही भावंड याच घराच्या अंगणात खेळले.

‘इंदू सरकार’ला पुण्यातही काँग्रेस नेत्यांकडून विरोध

किशोर कुमार यांचे वडील कुंजीलाल गांगुली यांनी फार मेहनतीने आणि हौशेने ते घर बांधलं होतं. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बांबे बाजारात हे घर बांधण्यात आलंय. या घराच्या परिसरात एकूण ११ दुकानं आहेत. त्या घरात सध्या कोणीही राहत नसल्यामुळे घराच्या दारावर घर मोडकळीस आल्यामुळे ते पाडण्याची नोटीस लावण्यात आली आहे. यासंबंधी कुमार यांच्या कुटुंबियांशीही संपर्क करण्यात आला होता. पण कोणीही त्या नोटीसला उत्तर दिले नाही.

किशोर कुमार हे अनेकदा मित्रांसोबत या घरी राहायला येत असत. त्यांनी तर मुंबई सोडून कायमस्वरूपी या घरी राहायला येण्याची तयारीदेखील केली होती. मात्र त्याचदरम्यान त्यांचं निधन झालं आणि त्यांचं हे स्वप्न अधुरंच राहिलं. किशोर यांच्या मृत्यूपत्रात लिहिल्याप्रमाणे अत्यंसंस्कारानंतर त्यांच्या अस्थी या घरात आणल्या गेल्या होत्या. पण त्यांच्या पश्चात घराची योग्य निगा न राखल्यामुळे ते आता मोडकळीस आले आहे.

या सिनेमावेळी श्रीदेवी, रजनीकांतवर थुंकली होती

२०१४ मध्ये किशोर कुमार यांचा मुलगा सुमीत आणि अनूप कुमार यांचा मुलगा अर्जुन खंडवा येथील घरी गेले होते. दोघांनी या घराची पाहणी करुन प्रॉपर्टी विकण्यासंबंधी हालचालही केली होती. घर आणि घराच्या परिसरातील दुकानं या सर्वाची किंमत सुमारे १२ कोटींच्या घरात जात असल्याचे सांगितले गेले होते. किशोर कुमार यांच्या या घराचं स्मारक व्हावं अशी सरकारची आणि त्यांच्या चाहत्यांची अपेक्षा होती पण कुमार यांच्या कुटुंबियांकडून याकडे गांभिर्याने बघितले न गेल्यामुळे सध्या हे घर जमीनदोस्त होण्याच्या अवस्थेत आलेय.