‘कॉफी विथ करण’च्या १००व्या भागाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतशी प्रेक्षकांची उत्सुकताही शिगेला पोहोचत आहे. टेलिव्हीजन विश्वातील काही गाजलेल्या चॅट शोपैकी एक असणारा ‘कॉफी विथ करण’ कार्यक्रमाचे पाचवे पर्वही प्रेक्षकांची चांगलीच दाद मिळवत आहे. बॉलिवूड कलाकार आणि त्यांच्या धम्माल गप्पा, गॉसिपची रंगत करणच्या या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येते. अशा या बहुचर्चित कार्यक्रमाच्या १००व्या भागामध्ये अभिनेता सलमान खान आणि त्याचे दोन्ही भाऊ म्हणजेच अरबाज खान आणि सोहेल खान हजेरी लावणार आहेत त्यामुळे गप्पांची मैफल चांगलीच रंगणार यात शंकाच नाही. ‘कॉफी विथ करण’च्या या खास भागाचे काही प्रमोशनल व्हिडिओ याआधीही प्रदर्शित करण्यात आले होते. जे प्रेक्षकांमध्ये चांगलेच गाजले. स्टार वर्ल्डच्या अधिकृत ट्विटर आणि फेसबुक पेजद्वारे नुकताच आणखी एक व्हिडियो प्रदर्शित करण्यात आला आहे.

या व्हिडिओमध्ये सलमान खान त्याच्या व्हर्जिनीटीबद्दल बोलताना दिसत आहे. ‘मी अजूनही व्हर्जिन आहे आणि ज्यात आजही काहीच बदल झालेला नाही’ असेच सलमान या व्हिडिओमध्ये म्हणत आहे. इतकेच नव्हे तर अभिनेता सोहेल खान या व्हिडिओमध्ये सलमानची खिल्ली उडवतानाही दिसत आहे. या कार्यक्रमादरम्यान ज्यावेळी करणने सलमानवर प्रश्नांचा मारा केला त्यावेळी सलमाननेही त्याच्या प्रश्नांना चांगलीच उत्तरे दिली आहेत. सलमानला करणने विचारले की अनुष्का शर्मा, प्रियांका चोप्रा आणि कतरिना कैफ या अभिनेत्रींपैकी कोणासोबत तुला लग्न करायला, कोणासोबत मैत्री करायला आणि कोणासोबत अफेअर करायला आवडेल?. त्यावेळी सलमानने करणला याव्यतिरिक्त इतर अभिनेत्रींची नावांचा पर्याय देण्यास सांगितले. सलमानच्या याच बोलण्याला निशाणा करत सोहेलने लगेचच त्याच्यासमोर आणखी एका अभिनेत्रीचे नाव ठेवले. ती अभिनेत्री म्हणजे राखी सावंत. राखी सावंतचे नाव ऐकताच सलमानच्या चेहऱ्यावरील भाव पाहण्याजोगे होते.

काही दिवसांपूर्वी आलेल्या एका प्रोमोमध्येसुद्धा सलमान आणि त्याच्या दोन्ही भावांनी एकच कल्ला केल्याचे पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमामध्ये सलमान एवढेही बोलत आहे की रिलेशनशिपमध्ये येण्सायाठी मी काही योग्य माणूस नाही. तसेच, सलमान खान कतरिनाचे नाव घेण्यासाठी कधीही लाजताना दिसत नाही. याची झलक सलमानने या कार्यक्रमात दाखवून दिली. करणने अरबाजला आवडत्या अभिनेत्रींची नावे सांगण्यास सांगितले होते. यावेळी अरबाजला मध्येच थांबवून सलमानने कतरिना कैफचे नाव घेतले. एक नंबरपासून ते पाच नंबरपर्यंत अरबाजच्या यादीत फक्त कतरिना कैफ असल्याचे सलमानने सांगितले. एवढेच सांगून सलमाना शांत बसला नाही. सलमानने केलेल्या कतरिनाच्या डान्सची नक्कल सोहेल खानने आक्षेप घेतला. तुला हा डान्स करण्याचा अधिकार नसल्याचे सांगत सोहेलने सलमानला रोखले आणि त्याची खिल्ली उडविली.

करणच्या या कार्यक्रमात बॉलिवूड कलाकारांच्या अनेक रहस्यांवरील पडदा उघडला जातो. मागील आठवड्यात झालेल्या परिणीती चोप्रा आणि आदित्य रॉय कपूर यांची करणने फिरकी घेतली होती. या कार्यक्रमावेळीदेखील रंजक गोष्टी ऐकायला मिळाल्या होत्या. परिणीतीने ‘शुद्ध देसी रोमांस’ या चित्रपटाचे दिग्दर्शक मनिष शर्मा जवळचा मित्र असल्याचे कबुल केले होते. परिणीतीने या कार्यक्रमात एखाद्या अभिनेत्यासोबत डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. यावेळी परिणितीने वरुणसोबत प्रेम आणि द्वेष असा संबंध असल्याचेदेखील सांगितले होते.