बॉलीवूड दिग्दर्शक, निर्माता करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ या रिअॅलिटी शोचा पाचवा सिझन काही आठवड्यांपूर्वीच सुरु झाला आहे. आता या शोचे शंभर एपिसोड पूर्ण होणार आहेत. शोच्या शंभराव्या एपिसोडला बॉलीवूडचा दबंग खान सलमान त्याच्या भावांसह म्हणजेच अरबाज आणि सोहेलसह उपस्थि राहणार आहे. त्यानंतर आता अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत हेदेखील ‘कॉफी विथ करण’मध्ये गेल्याचे समोर आले आहे.

वाचा: रणवीर, दीपिकाच्या ब्रेकअपच्या बातम्यांमागे हे होते खरे कारण…

गेल्या काही दिवसांपासून शाहिद कपूर ‘कॉफी विथ करण’मध्ये जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, तो मीरासोबत जाणार की त्याची ‘पद्मावती’ चित्रपटातील सहकलाकार दीपिका पदुकोण हिच्यासोबत जाणार हे कळत नव्हते. अखेर त्यावरून आता पडदा उठला आहे. माध्यमांपासून सहसा दूरच राहणारी त्याची पत्नी मीरा हिच्यासह शाहिद हा करणच्या रिअॅलिटी शोमध्ये उपस्थित राहणार असल्याचे निश्चित झाले आहे. शाहिद आणि मीराच्या लग्नाला एक वर्ष उलटून गेले आहे. यावर्षी ऑगस्ट महिन्यात या जोडप्याच्या घरी चिमुकल्या परिराणीचे आगमन झाले. आपल्या पहिल्या बाळाचे नाव त्यांनी ‘मीशा’ असे ठेवले आहे. अनेकदा मीरा ही पार्टी किंवा इतर काही सोहळ्यांमध्ये आपल्या पतीसोबत दिसली होती. मात्र, मीरा राजपूत आजवर कुठेच मुलाखत देताना किंवा प्रसारमाध्यमांशी बोलताना दिसलेली नाही. पण, करण जोहरने आता मीराला सर्वांसमोर आणायचे ठरवले आहे. त्यामुळे मीरा आता तिच्या पतीसह म्हणजेच शाहिदसोबत टेलिव्हजनवर पदार्पण करताना दिसणार आहे. आज शाहिदने ‘कॉफी विथ करण’च्या सेटवरचा मीरासोबतचा सेल्फी इन्स्टाग्रामवर शेअर केला. ‘ओह द काउच विथ माय लव्ह’, असे कॅप्शनही शाहिदने फोटोला दिले आहे.

दरम्यान, करण जोहरच्या कॉफी विथ करणच्या पाचव्या सिझनमध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि हॉलिवूड अभिनेता विन डिझेल हजेरी लावणार असल्याची चर्चा आहे. बॉलिवूडमध्ये नावारुपास आल्यानंतर बी टाऊनच्या या मस्तानीने तिचा मोर्चा हॉलिवूडकडे वळवल्याचे सर्वांनाच ठाऊक आहे. ‘xXx: रिर्टन ऑफ झेंडर केज’ या चित्रपटाद्वारे दीपिका सेरेना उनगेरच्या भूमिकेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या टिझर आणि ट्रेलरद्वारेही दीपिका आणि विनच्या जोडीला अनेकांनीच पसंती दिली आहे. दीपिकाची विनसोबतची ऑनस्क्रिन केमिस्ट्री पाहता सध्या प्रेक्षकांमध्येही तिच्या या चित्रपटाबद्दल उत्सुकता पाहायला मिळत आहे. या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या प्रसिद्धीला आता सुरुवात झाली असून भारतातही या चित्रपटाची प्रसिद्धी करण्यासाठी या चित्रपटाची टीम खास आखणी करत आहे, असे वृत्त ‘डीएनए’ या वृत्तपत्राने काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केले होते. त्यामुळेच करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमामध्येही दीपिका आणि विनची जोडी लवकरच येऊ शकते असे म्हटले जात आहे.