‘कॉमेडी नाईट्स बचाओ’मध्ये पार्श्ड चित्रपटाची अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जीवर वर्णभेदी टीका केल्याचे प्रकरण काही केल्या शांत होताना दिसत नाही आहे. या कार्यक्रमाचा मुख्य सूत्रधार असलेल्या कृष्णा अभिषेकने तनिष्ठाने दिलेल्या प्रतिक्रियेला तिखट शब्दात प्रत्युत्तर दिले आहे. ‘या कार्यक्रमात सामील होण्याआधी तनिष्ठाने हा कार्यक्रम आधी टिव्हीवर पाहायला हवा होता’, अशा शब्दांमध्ये कृष्णाने प्रतिक्रिया दिली आहे.
‘तनिष्ठा जेव्हा सेटवर आली, तेव्हा ती मला भेटली होती. आपण कधीही हा शो किंवा एआयबी रोस्ट पाहिला नसल्याचे तनिष्ठाने मला सांगितले होते. हा कार्यक्रम सुरू झाल्यावर तनिष्ठा अस्वस्थ वाटत होती. तनिष्ठाला कार्यक्रमात फारसा रस नसल्याचे मला दिसत होते. दोन ते तीन सेगमेंट चित्रीत झाल्यावर तनिष्ठा कार्यक्रमातून निघून गेली. मात्र तनिष्ठाने आधी शो बघूनच कार्यक्रमात सहभागी व्हायला हवे होते’, अशा शब्दांमध्ये कृष्णाने तनिष्ठाला प्रत्युत्तर दिले आहे.
‘तनिष्ठाने कधी हिंदी टिव्ही पाहिलेला नाही. ती आमच्याकडून सॅलेड आण बर्गर म्हणजेच अमेरिकन कॉमेडीची अपेक्षा करत होती. मात्र आम्ही तिला मसालेदार वडापाव दिला. कृष्णा आणि भारती लोकांची याचप्रकारे खिल्ली उडवतात’, असे कृष्णाने म्हटले आहे.
लोकांच्या वर्णावर आणि शरीरावर विनोद करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न कृष्णाला विचारण्यात आला. यावर बोलताना ‘आम्ही भारतीलाही खूप काही बोलतो. मोटी, भैस या शब्दांमध्ये आम्ही भारतीला हिणवतो. मात्र बोलण्याची एक पद्धत असते. तनिष्ठा यासाठी तयारच नव्हती. माझे तनिष्ठासोबत कोणत्याही प्रकारचे शत्रुत्व नाही. मी महिलांचा सन्मान करतो. जर तनिष्ठाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी तिची माफी मागतो. मात्र कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता’, असे स्पष्टीकरण कृष्णाने दिले आहे.
गेल्या शुक्रवारी (२३ सप्टेंबर) प्रदर्शित झालेल्या पार्श्ड चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत असणारी तनिष्ठा चॅटर्जी कलर्स टिव्हीच्या ‘कॉमेडी नाईट्स बचाओ’च्या चित्रीकरणातून निघून गेली होती. कार्यक्रमात करण्यात आलेले वर्णभेदी विनोद तनिष्ठाला सहन झाली नाही. यावर तनिष्ठाने फेसबुकवर एक पोस्टदेखील लिहिली. पार्श्ड चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी ‘कॉमेडी नाईट्स बचाओ’ मध्ये गेली असताना तिथे अपमान करणारे विनोद होणार याची कल्पना होती. मात्र मला या प्रकारे लक्ष्य केले जाईल, याचा अंदाज नव्हता, अशा शब्दांमध्ये तनिष्ठाने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. तनिष्ठाच्या या पोस्टनंतर कलर्स चॅनेलने तनिष्ठाची माफी मागितली होती.