क्रिती सेनन, राजकुमार राव आणि आयुषमान खुराना यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला बरेली की बर्फी हा सिनेमा कधी प्रदर्शित होणार याचे तारीख आता नक्की झाली आहे. हा सिनेमा पुढच्या वर्षी २१ जुलैला प्रदर्शित होणार आहे. अभिनेत्री क्रिती सेननने सोशल मीडियावर याबद्दलची घोषणाही केली. आयुषमान खुरानासोबत तिने एक फोटो शेअर केला. या फोटोच्या मेसेजमध्ये सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख लिहिलेली आहे.

या सिनेमाचं अधिकतर चित्रिकरण लखनऊमध्ये पूर्ण झाले आहे. या सिनेमाच्या कथानकाबद्दल अजून काही कळले नाही. पण ‘निल बटे सन्नाटा’ सिनेमाची निर्माती अश्विनी अय्यर तिवारी हिच या सिनेमाचीही निर्मिती करणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या सिनेमात आयुषमान एका प्रिन्टिंग प्रेसमध्ये काम करणाऱ्या मुलाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. तिकडेच क्रिती एका शहरी मुलीची व्यक्तिरेखा साकारणार आहे. या सिनेमात राजकुमार राव एका लेखकाची भूमिका साकारणार आहे. आयुषमान खुराना आणि क्रिती पहिल्यांदा एकत्र काम करत आहे.

जंगली पिक्चर्स आणि बीआर स्टुडिओज या कंपनीने या सिनेमाची निर्मिती केली आहे. आयुषमानने इंग्रजी संकेतस्थळाला दिलेल्या वृत्तानुसार, ‘या सिनेमात माझी व्यक्तिरेखाही गावरान असणार आहे. मला व्यायाम करावा लागणार आहे. ‘मेरी प्यारी बिंदू’ या सिनेमासाठी मी वजन कमी केले होते. पण आता ते मला परत वाढवावे लागणार आहेत. अनेकदा आपण अशा व्यक्तींना भेटतो जे आपल्याला सिनेमातल्या व्यक्तिरेखेसारखे दिसतात. ‘विकी डोनर’ या सिनेमात मी ज्या पद्धतीने दिसलो आहे, वास्यविक जीवनात मी तसा नाही. या सिनेमातली माझी व्यक्तिरेखाही माझा भाऊ आणि माझा मित्र यांचे मिश्रण होते.’

आयुषमानने सांगितले की, ”दम लगा के हईशा’मध्ये माझी जी व्यक्तिरेखा होती, माझ्या आयुष्यात मी अशा व्यक्तीशी कधीच भेटलो नव्हतो, म्हणून १० दिवसांसाठी मी हैदराबादला गेलो होतो. तिकडे मी अनेक लोकांना भेटलो आणि ती व्यक्तिरेखा अधिक समजून घेतली. ‘बरेली की बर्फी’ या सिनेमासाठीही मी अनेक लोकांना भेटलो. हा एक वेगळ्याच प्रकारचा विनोदीपट आहे. गावरान भाषेमध्ये हा संपूर्ण सिनेमा बनवण्यात आला आहे. याशिवाय मी पहिल्यांदा लखनऊ आणि बरेलीमध्ये सिनेमाचे चित्रिकरण करत आहे.’ त्याच्या इतर सिनेमांप्रमाणेच आयुषमानने त्याच्या या सिनेमातही गाणी स्वतःच गायली आहेत.