विनोदवीर कपिल शर्मा आणि कृष्णा अभिषेक यांच्यात असलेले वैर अनेक रसिकांना ठाऊकच आहे. दोघांची विनोदाची शैली वेगळी, कार्यक्रमाचे स्वरुपही तितकेच वेगळे. कपिलच्या ‘कॉमेडी नाइट्स’ने कलर्स वाहिनीवरुन गच्छंती केल्यानंतर कृष्णा अभिषेक आणि त्याच्या टिमने रसिकांना हसवण्याची जबाबदारी घेतली होती. पण कपिलच्या कार्यक्रमाप्रमाणे टीआरपी मिळवण्यात मात्र कृष्णाचा शो अपयशी ठरला आहे.

कलर्स वाहिनीसोबत चाललेल्या काही वादांमुळे कपिलचे बस्तान सोनी वाहिनीवर बसवण्यात आले आहे. ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा विनोदवीर कपिल आणि त्याची अतरंगी टिम प्रेक्षकांच्या मनावर गारुड झाली. त्या तुलनेत कृष्णा अभिषेकच्या कार्यक्रमाने त्यांच्या विवादास्पद विनोदी शैलीमुळे अनेक कलाकारांचाही रोष ओढावून घेतला. असे असले तरीही एका पत्रकार परिषदेमध्ये कृष्णा अभिषेकने व्यक्त केलेल्या त्याच्या इच्छेवरुन सध्या अनेक चर्चांना उधाण आले आहे. कृष्णाने कपिल शर्माला त्याच्या कार्यक्रमाच्या एका भागामध्ये प्रमुख पाहुणा म्हणून येण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

त्याच्या कार्यक्रमात करण्यात आलेल्या काही बदलाविषयी बोलताना आपण कधीही कपिलचा कार्यक्रम पाहिला नाही असे कृष्णाने स्पष्ट केले आहे. तुझ्या कार्यक्रमापेक्षा कलाकार कपिलच्या कार्यक्रमामध्ये जाण्यास प्राधान्य का देतात? असे विचारले असता कृष्णा म्हणाला, ‘त्यांच्या आणि आमच्या कार्यक्रमाचे स्वरुप पाहा. कार्यक्रमात येणारे ३० टक्के सेलिब्रिटी शोमध्ये आपली खिल्ली उडवून घेणे पसंत करत नाहीत. तर, ७० टक्के सेलिब्रिटी यावर कोणताच आक्षेप घेत नाहीत. शाहरुख खान, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग या कलाकारंवर कितीही खिल्ली उडवली तरीही त्यांचा सहसा काहीच आक्षेप नसतो. अनिल कपूर यांनी तर स्वत: माझ्या कार्यक्रमात येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याऊलट करिनाने अशा कोणत्याही कार्यक्रमात जात स्वत:ची खिल्ली उडवून घेण्यापेक्षा एखाद्या ‘लाईव्ह’ कार्यक्रमाला जाण्यास प्राधान्य दिले आहे’, असे विचारपूर्वक उत्तर त्याने दिले.

त्यामुळे एकंदर हे विधान आणि कृष्णाने व्यक्त केलेली इच्छा यावर आता कपिल काही प्रतिक्रीया देतो का हे पाहणे औत्सुक्याचे राहिल.