‘कुछ मिठा हो जाए’
‘प्रेम’ संकल्पनेवर आजवर असंख्य नाटकं आली आहेत. हा तसा आदि अन् अंतही नसलेला विषय. मूलत: भिन्नलिंगी व्यक्तीच्या प्रेमात पडणं ही मनुष्यजातीची आदिम प्रेरणा आहे. त्यामुळे हा विषय सदा चिरतरुण राहिलेला आहे. देश-काल-परिस्थितीनुसार तपशिलात थोडाफार फरक होत असेल तेवढाच. त्यामुळे प्रेमावरील कलाकृतींची निर्मिती सतत होताना दिसते. अथर्व थिएटर्स निर्मित अशा काही ‘प्रेम’कथांचा गुच्छ नुकताच ‘कुछ मिठा हो जाए’ या शीर्षकान्वये रंगमंचावर आला आहे. प्रेमाच्या नाना तऱ्हा त्यात पाहायला मिळतात. अंबर हडप, गणेश पंडित, अभिजीत गुरू, शिरीष लाटकर आणि आशीष पाथरे या लेखकांनी हे प्रेमानुभव लिहिले आहेत. प्रेक्षकांचं दोन घटका रंजन करण्याच्या हेतूनंच ते लिहिले गेले आहेत. स्वाभाविकपणेच ते खमंग, चटपटीत आहेत. गांभीर्याचा आव आणणाऱ्या कथित प्रेमगोष्टींतही हा ‘स्मार्ट’नेस जाणवतो. अर्थात टाइमपास म्हणून नाटकाला आलेल्यांचं त्यातून मनोरंजन होणं महत्त्वाचं. मर्यादित अर्थानं तसं ते होतंही. याचं कारण प्रेक्षकांना हल्ली चुटकुल्यांमध्येच रस वाटतो. मेंदूला झिणझिण्या आणणारं, त्यावर विचार करायला लावणारं, अंतर्मुख करणारं अथवा आपल्या जीवनजाणिवा समृद्ध करू पाहणारं असलं काही त्यांना ‘बोअर’ करतं. आधीच नित्याच्या दैनंदिन व्याप-तापांनी ते कावलेले असतात. त्यातून त्यांना सुटका हवी असते. ‘कुछ मिठा हो जाए’सारखी स्मार्ट नाटकं त्यांना विरंगुळ्याचे ते दोन क्षण पुरवतात. तेवढंच त्यांना पुरेसं असतं. अर्थात् रंजन हीसुद्धा मानवी गरज आहेच. असो.
यातल्या पहिल्या किश्श्यात नुकतंच लग्न झालेल्या एका तरुण जोडप्याचा पहिल्या रात्रीचा अनुभव मांडला आहे. हे आजच्या काळातलं स्मार्ट जोडपं आहे. लग्नाआधी प्रेमानुभव घेतलेलं. त्या अर्थानं अनुभवसंपन्न. पहिल्या रात्रीचे प्रचलित समज-गैरसमज, त्यासंबंधीचं ज्ञान तसंच इतरांचे अनुभव जाणून घेतलेलं. अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ते अप्रत्यक्षरीत्या काहीसं अनुभवलेलंही. साहजिकच या रात्रीबद्दल दोघंही सर्वार्थानं माहितीसमृद्ध. अशा या तरुण जोडप्याची ही पहिली रात्र परस्परांना ‘समजून’ घेण्यातच जाते, हे मांडणारा हा प्रेमानुभव! एकमेकांच्या पूर्वायुष्याबद्दल जाणून घेण्याचा त्यांचा दृष्टिकोन मात्र मोकळा व खुला आहे. या मधुचंद्राच्या रात्रीच्या अनुभवाची मांडणी, (अट्टहासपूर्वक असला तरीही) त्यातला ताजेपणा, चटपटीतपणा कौतुकास्पद आहे. रचनाकौशल्याचे मार्क्‍स या प्रेमानुभवाला द्यावेच लागतील.
दुसरा प्रेमानुभव चाळीशीच्या अविवाहितांचा! परिस्थितीमुळे लग्न न जमू शकलेला चाळीशीतला एक पुरुष आणि भावी जोडीदाराकडूनच्या अवास्तव अपेक्षांमुळे लग्न होऊ न शकलेली चाळीशीचीच एक तरुणी यांची व्यथा-वेदना मांडणारा हा अनुभव. परिस्थितीमुळे आपलं लग्न योग्य त्या वयात जमू शकलं नाही; मात्र आपल्या धाकटय़ा बहिणीचं लग्नसुद्धा निव्वळ तिच्या काळ्या वर्णामुळे जमत नसल्यानं दु:खीकष्टी झालेला हा गृहस्थ बहिणीचा वर्ण उजळवण्यासाठी ब्युटीपार्लरमध्ये नेतो. तिथल्या ब्युटीशियन तरुणीचंही (चाळीशीची असूनही) लग्न झालेलं नसतं. स्वसौंदर्याबद्दलचा तिचा कमालीचा अहंकार तसंच भावी जोडीदाराबद्दलच्या तिच्या अवास्तव अपेक्षांमुळे तिचं लग्न रखडलेलं असतं. वेळेवर लग्न न झाल्यानं तिच्या स्वभावात एक प्रकारचा तुसडेपणा आणि एकारलेपण आलेलं असतं. मात्र, या गृहस्थाला तिच्याबद्दल ‘कुछ कुछ’ वाटू लागतं. तिला इम्प्रेस करायचा तो आपल्या परीनं प्रयत्न करत राहतो. परंतु तो आपल्या योग्यतेचा नसल्यानं ती त्याला सतत हिडीसफिडीस करते. आपला भाऊ ब्युटीशियनच्या प्रेमात पडलाय हे त्याच्या बहिणीच्या लक्षात येतं. ब्युटीपार्लरची मात्रा लागू पडते. बहिणीचं लग्न जमतं आणि त्यांचा ब्युटीपार्लरशी संबंध संपायची वेळ येऊन ठेपते. तरीही ती ब्युटीशियन तरुणी त्याचं सच्चं प्रेम ओळखू शकत नाही म्हटल्यावर त्याची बहीणच मग पुढाकार घेऊन तिला वस्तुस्थितीची कठोर शब्दांत जाणीव करून देते. आणि..
हा प्रेमानुभव त्यातल्या एका खटकणाऱ्या गोष्टीसहही लोभसवाणा झाला आहे. चाळीशीतल्या अविवाहितांची व्यथा-वेदना त्यातून मुखरीत होते. यातला मालवणीत बोलणारा गृहस्थ मधेच शुद्ध मराठीत बोलू लागतो, हे मात्र चांगलंच खटकणारं.
यातली तिसरी गोष्ट आहे- आईच्या सदाचारी संस्कारांमुळे शामळू बनलेल्या एका तरुणाची. फॅन्टसीच्या अंगानं जाणारी. ‘सगळ्या मुली म्हणजे भगिनी आणि सर्व स्त्रिया मातेसमान’ या संस्कारांत वाढलेल्या या बुळचट मुलाला व्हॅलेन्टाईन आमूलाग्र बदलायचं ठरवतो. तो त्याला आपला चमत्कारी गॉगल देतो आणि तो बावळट्ट तरुण एकदम स्ट्रीटस्मार्ट होतो. शेजारच्या मुलीशी फ्लर्टिग करू लागतो. ऐपत नसतानाही तिचे सारे हट्ट पुरवू लागतो. आई-वडिलांनी त्याच्या या उच्छंृखल वर्तनाला विरोध केल्यावर तो त्यांनाही सुनवायला कमी करत नाही. याचा शेवट अर्थात व्हायचा तोच होतो. ती मुलगी ‘मी तुझ्याकडे भाऊ म्हणून पाहते. तुझा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय’ असं म्हणून त्याच्या कथित प्रेमाची चक्क हवाच काढून घेते. या प्रेमभंगानं तो उद्ध्वस्तच होतो. परंतु व्हॅलेन्टाईन समजुतीच्या चार गोष्टी सांगून त्याला या धक्क्य़ातून बाहेर काढतो. प्रेमाचा हा फॅन्टसीसदृश्य अनुभव मस्त जमलाय. विशेषत: यातल्या बावळट्ट मुलाची भूमिका करणारा चिन्मय उद्गीरकर धम्माल बागडलाय. त्याच्यामधल्या अभिनेत्याला आव्हान देणारी ही भूमिका त्यानं लीलया पेलली आहे.
चौथी कथा आजच्या तरुणाईच्या नातेसंबंधांतली गोची प्रकट करणारी आहे. परस्परभिन्न स्वभाव, भिन्न दृष्टिकोन आणि वेगवेगळं करीअर असणाऱ्या विवाहित तरुण जोडप्यामधल्या संघर्षांची ही गोष्ट आहे. अतिरेकी व्यक्तिवादाने ग्रस्त अशा या जोडप्याचं एकमेकाशी जराही पटत नाही. सतत त्यांची भांडणं होत असतात. कुणी कुणाला समजून घेऊ इच्छित नाही. एकदा ते ट्रिपला गेलेले असताना त्यांचं क्षुल्लक गोष्टीवरून जोरदार भांडण होऊन ते एकमेकांपासून वेगळं व्हायचं ठरवतात. कर्मधर्मसंयोगानं तिथं पन्नास वर्षांनी एकमेकांना भेटणारं एक वयोवृद्ध प्रियकर-प्रेयसीची जोडी त्यांना भेटते. इतक्या वर्षांनी भेटल्यामुळे साहजिकच पूर्वीच्या आपल्या प्रणयाच्या आठवणी काढत ते बसलेले असतात. मधेच तो वृद्ध आपल्या विद्वत्तेचं प्रदर्शन करत तिच्या बावळटपणाबद्दल, टिपिकल बायकी असण्याबद्दल तिला झापत असतो. तीही त्याच्या आढय़ताखोर स्वभावाबद्दल तितक्याच खमकेपणी त्याला सुनावत असते. त्यांची या वयातली ती भांडणं पाहून तरुण जोडप्याला त्यांच्याबद्दल कुतूहल वाटतं. इतक्या वर्षांनंतर भेटूनही दोघं भांडताहेत याचं त्यांना हसू येतं. मधेच त्या दोघांना आपल्या जोडीदाराची आठवण येते. एकमेकांना आपल्या जोडीदाराशी ओळख करून देण्यासाठी म्हणून ते तिथून जातात आणि थोडय़ा वेळानं परत येतात.. जोडीदाराविनाच. तरुण जोडप्याला आश्चर्य वाटतं. तेव्हा ते खुलासा करतात : आम्ही दोघं प्रत्यक्षात लग्नाचे जोडीदारच आहोत!
वैवाहिक जीवनातले ताणतणाव आणि पेच सर्वानाच अनुभवावे लागतात. स्वभाव, आवडीनिवडी, प्राधान्यक्रमांतली भिन्नता असूनही विवाह यशस्वी करायचा असेल तर परस्परांना गुणदोषांसह समजून घेणं, प्रसंगी तडजोडी करणं अपरिहार्यच ठरतं, हा संदेश ‘नाथाघरची उलटी खूण’ या तऱ्हेनं या कथेत मांडला आहे. ‘मेक बिलिव्ह’ तंत्राचा वापर करत सादर झालेला हा प्रेमानुभव त्यातल्या मांडणीमुळे धरून ठेवतो. समोर घडतंय ते साफ खोटं आहे, बेतलेलं आहे हे माहीत असूनही प्रेक्षक या अनुभवात गुंततो, तो सादरीकरणातील सफाईमुळे.
चार प्रेमानुभवांचा हा गुच्छ दिग्दर्शक गणेश पंडित यांनी मस्त गुंफला आहे. या कथांची हाताळणी ‘स्मार्ट’ या सदरात मोडणारी असली तरी ती प्रेक्षकांना बांधून ठेवते. समीहन यांनी प्रत्येक कथेतलं नाटय़ पाश्र्वसंगीतातून खुलवलं आहे. विशाल नवाथे यांचं गोष्टीनुरूप लवचीक नेपथ्य आणि भूषण देसाईंची प्रकाशयोजना नाटय़पूर्णतेत भर घालणारी आहे. दीपाली विचारे (नृत्य), पौर्णिमा तळवलकर (वेशभूषा) आणि संदीप नगरकर (रंगभूषा) यांनीही आपली कामगिरी चोख वठवली आहे.
या नाटकाद्वारे चिन्मय उद्गीरकर हा नवा आश्वासक नट रंगभूमीला मिळाला आहे. आपल्या विविध भूमिकांतील वैविध्य त्यांनी उत्तमरीत्या प्रकट केलं आहे. विशेषत: शामळू तरुणाच्या भूमिकेत तर ते लाजवाबच वाटतात. केतकी चितळे यांच्या वाटय़ाला भूमिकांतली तितकीशी विविधता आली नसली तरी त्यांनी तरुणाईतली उत्फुल्लता सफाईनं दाखवली आहे. अभिजीत चव्हाण आणि पौर्णिमा तळवलकर हे तर कसलेलेच कलाकार असल्यानं त्यांनी आपल्या भूमिका उत्तम न केल्या असत्या तरच नवल.