मुलींना खरेदी करायला फार वेळ लागतो आणि मुलं कमी वेळेत त्यांच्यापेक्षा अधिक खरेदी करुन मोकळे होतात असे अनेकदा म्हटले जाते. मुली चार पाच तास लावून एखादी साडीच खरेदी करतात किंवा काहीच आवडले नाही म्हणून हात हलवत घरीही येतात. पण त्याउलट मुलं अर्ध्या किंवा एका तासात पूर्ण महिन्याला पुरेल अशी खरेदी करतात. असा काहीसा अनुभव प्रत्येकालाच येत असेल. पण खरेदी करणारी आपली बायकोच असली तर.. आणि त्याहूनही जर तुम्ही तिच्यासोबत खरेदीला गेला असाल तर..

असाच काहीसा अनुभव सध्या अभिनेता कुशल बद्रिकेने घेतला आहे. तो आपल्या बायकोसोबत खरेदीला गेला होता. पाच मिनिटांत येते असे सांगून ती जी खरेदी करायला गेली ती २ तास झाले तरी परत आलीच नाही. एका ठिकाणी दोन तास बसण्याची सवय कदाचीत कुशलला असेल पण त्याच्या मुलाचे काय? तोही कुशलला सोबत म्हणून त्याच्यासोबत बसला आणि कंटाळा येऊन झोपीही गेला. पण तरीही कुशलची बायको काही खरेदी करुन आलीच नाही.

कुशलची नजर तिच्या वाटेवर लागली असली तरी, त्याच्या चेहऱ्याचे भाव मात्र रागीट आहेत. पण बायकोसमोर आल्यावर हा राग टिकतोच असे नाही ना? कुशलने त्याचा आणि त्याचा मुलाचा बायकोची वाट बघत असतानाचा फोटो फेसबुकवर शेअर केला. त्याने हे सगळे गंमतीनेच लिहिले असताना त्याच्या या पोस्टवर अनेक मजेशीर कमेन्ट्सही आल्या.

कुशल बद्रिकेचं नाव जरी घेतलं तरी लहान मुलांपासून ते थोरा- मोठ्यांपर्यंत अनेकांच्या चेहऱ्यावर आपसूक हसू येतं. निलेश साबळे, श्रेया बुगडे, भाऊ कदम, कुशल बद्रीके, भारत गणेशपुरे, सागर कारंडे आणि संपूर्ण टीम त्यांच्या ‘थुकरटवाडी’त आलेल्या प्रत्येक पाहुण्याच्या चेहऱ्यावर हसू उमटवण्यात नि:शंक यशस्वी होत आहे. छोट्या पडद्यावरील ‘चला हवा येऊ द्या’ या हास्यविनोदी कार्यक्रमाने केवळ मराठी मनातच नव्हे तर इतर भाषिक चित्रपट रसिकांच्या मनातदेखील स्थान मिळवले आहे. मराठी कलाकारांबरोबरच बॉलिवूडमधील शाहरुख खान, सलमान खान, अक्षय कुमार, जॉन अॅब्राहम, सोनम कपूर इत्यादी नामवंत मंडळींनीही त्यांच्या चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर उपस्थिती लावली आहे. या शोमधील हास्यफवाऱ्यांनी दर्शकांबरोबरच सिनेमाच्या प्रसिध्दीसाठी आलेले कलाकारदेखील उपस्थितांसोबत हसूनहसून लोटपोट होतात.