जाहिरातींची नवीन समीकरणे, अनेक स्क्रीन्समध्ये चित्रपटाचे शो अशा अनेक कारणांमुळे २०१२ या वर्षांत प्रदर्शित झालेल्या बहुतांश चित्रपटांनी चांगला धंदा केला. या वर्षांत प्रदर्शित झालेल्या ६०पैकी १२ चित्रपट ‘सुपरहिट’ चित्रपट ठरले. तर ८ ‘हिट’ झाले. तिकीटबारीवर डब्ब्यात गेलेल्या चित्रपटांची संख्याही अवघी २० असून इतर चित्रपटांनी साधारण बरा धंदा केला आहे. विशेष म्हणजे या एका वर्षांत तब्बल ९ चित्रपटांनी शंभर कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवण्याची करामत केली.
या वर्षांत सर्वात जास्त गल्ला सलमान खानच्या ‘एक था टायगर’ने जमवला. सलमानच्याच ‘दबंग २’नेही शंभर कोटींपेक्षा जास्त कमाई केली. त्याच्या बरोबरीनेच अजय देवगणच्या ‘सन ऑफ सरदार’ आणि ‘बोलबच्चन’ या चित्रपटांनी हा पल्ला गाठला. यापैकी ‘सरदार’चा अपवाद वगळता इतर तीनही चित्रपट सुपरहिट ठरले. शाहरूख खानच्या ‘जब तक है जान’ने शंभर कोटींपेक्षा जास्त कमाई करूनही हा चित्रपट सुपरहिट ठरला नाही.
सुपरहिट चित्रपटांच्या यादीत ‘कहानी’ (५९ कोटी), ‘विकी डोनर’ (४० कोटी) अशा कमी गल्ला जमवलेल्या पण तरीही एकूण गुंतवणुकीच्या दुपटीहून जास्त कमाई केलेल्या चित्रपटांचाही समावेश आहे. त्याचबरोबर हिट चित्रपटांच्या यादीत केवळ १५ कोटींची कमाई करणाऱ्या आणि एका वेगळ्याच विषयावर असलेल्या ‘पानसिंग तोमर’ या चित्रपटाची उपस्थिती लक्षणीय आहे.
२०१२ चे सुपरहिट चित्रपट- कमाई (कोटींमध्ये)
अग्निपथ-  (१२३.०५)
कहानी-    (५९.२६)
हाऊसफुल-२- (११४)
विकी डोनर- (४०.०१)
रावडी राठोड- (१३१)
बोलबच्चन- (१०२)
एक था टायगर- (१९८)
राझ-३-     (७०)
बर्फी- (१२०)
ओह माय गॉड- (८१.०५)
स्टुडंट ऑफ द इयर- (७०)
दबंग-२    – (१३९.०५)*
(* चित्रपट अद्याप चालू आहे.)