सतत काहीना काही वादांनी घेरलेली हॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री लिंडसे लोहान हिने इंस्टाग्रामवरून चाहत्यांची माफी मागितली आहे. आपला होणारा नवरा एगोर ताराबासोव्हविषयी लिंडसे सोशल मीडियावर बरेच काही अद्वातद्वा बरळली होती. रात्रभराच्या पार्टीनंतर घरी न परतलेल्या एगोरने आपली फसवणूक केल्याचा आरोप करीत तिने अनेक संदेश इंस्टाग्राम, स्नॅपचॅट आणि टि्वटरवर पोस्ट केले होते. आता आपण सावरले असल्याचे सांगत सोशल मीडियावर व्यक्त केलेल्या तीव्र भावनांसाठी तिने एका पोस्टद्वारे चाहत्यांची माफी मागितली आहे. आपल्या पोस्टमध्ये ती म्हणते की, प्रिय मित्रांनो मी व्यवस्थित असून सध्या मला बरे वाटत आहे. चांगल्या मित्रांच्या सहवासात मी सध्या वेळ घालवत आहे. अलिकडेच मी काही खासगी गोष्टी उघडपणे उदधृत केल्या, त्यासाठी माफी मागते. माझ्यातील भयामुळे आणि व्यथित भावनेमुळे मी अशी वागले… आपण सर्वजण चुका करतो. दुर्देवाने माझ्या चुका सार्वजनिक होतात.
गेल्या अनेक वर्षात मी स्वत्वाचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला. आता अंतःकरणाचे शुध्दीकरण झाल्याने खरे तर विचलित मानसिकतेपेक्षा माझे मन जास्त साफ असायला हवे. सोशल मीडिया आपल्या व्यावसायिक क्षेत्राचा आणि आपण जगत असलेल्या विश्वाचा भाग झाला आहे. मिश्र संदेश पाठविण्याचा माझा उद्देश नव्हता, असे तिने लिहिले आहे. एगोरबरोबरचे आपले संबंध पूर्ववत होतील अशी आशा व्यक्त करणारा संदेशदेखील तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या संदेशात ती लिहिते, कदाचित सर्व गोष्टी व्यवस्थित होतील… कदाचित होणारदेखील नाहीत. त्या होतील अशी मला आशा आहे. मी ३० वर्षांची असून, सज्जन व्यक्तीचा सहवास मिळण्यास पात्र आहे. जीवन म्हणजे प्रेम आणि आशा आहे. राग नव्हे. या काळात जे माझ्या बाजूने उभे राहिले त्यांचे आभार.