लंडनमध्ये राहणा-या प्रसिद्ध अभिनेत्री लिंडसे लोहान हिने सहा महिन्याचे घरभाडे थकवल्याचे वृत्त समोर आले आहे. लंडन येथील राहत्या घराचे ४२ लाख डॉलर भाडे थकवल्याने लिंडसे ही दिवाळखोर घोषित होण्याची शक्यता आहे. एकेकाळी जगातील सर्वाधिक मानधन घेणा-या अभिनेत्रींमध्ये लिंडसेचे नाव घेतले जायचे. ती एका चित्रपटासाठी पाच मिलियन डॉलर इतके मानधन घ्यायची. पण, आता लिंडसे तिच्या घराचे भाडेही देण्यास असफल ठरत आहे.
३० वर्षीय लिंडसे नाइट्सब्रिज या भागात राहत असून संपत्ती मालकाने तिच्याकडे ९५ हजार डॉलर्सची मागणी केली आहे. जर तिने हे पैसे दिले नाहीत तर तिला दिवाळखोर घोषित करण्यासाठी तिच्याविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे. एका संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार,  ‘चाइल्ड अॅण्ड चाइल्ड’ च्या वकिलाने यासंबंधी लोहान हिला वैयक्तिकरित्या एक पत्र सोपविले आहे. या पत्रात तिला सहा महिन्यांचे भाडे देण्यास सांगण्यात आले आहे. ‘मीन गर्ल्स’ चित्रपटातील अभिनेत्री लिंडसे हिला घरभाडे देण्यासाठी ८ नोव्हेंबरपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.