स्त्रीचा चेहरा झाकणारा एक कपडा खरा तो.. पण ज्या हेतूसाठी तो वापरला जातो त्याने ‘बुरखा’ या शब्दाला एक नकारात्मक अर्थ दिला आहे. सभ्यपणाचा बुरखा पांघरून ठेवलाय, हे वाक्य कितीतरी वेळा आपण सहज उच्चारून जातो. स्त्री आणि पुरुष या दोघांच्या मानसिकतेचा विचार करायचा झाला तर त्याने तिचे खरे सौंदर्य झाकण्यासाठीच तो सामाजिक शिस्तीचा-संस्कृतीचा बुरखा तिला दिला आहे. त्याने त्याच्या सोईसाठी दिलेला हा सभ्यतेचा बुरखा पांघरून वावरणे तिच्याही इतके अंगवळणी पडले आहे की त्याच्याआड लपलेला आपला खरा चेहराच ती विसरली आहे. गेली कित्येक वर्षे कित्येक स्त्रियांनी आपल्या मनावर ओढून घेतलेला हा बुरखा टराटरा फाडून आपला खरा चेहरा आरशात लख्खपणे पाहायला लावण्याचे काम अलंकृता श्रीवास्तव दिग्दर्शित ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या चित्रपटाने केले आहे.

भोपाळमधल्या चारचौघींच्या माध्यमातून ही कथा दिग्दर्शकाने सांगितली आहे. ‘रोझी’ नावाची आणखी एक व्यक्तिरेखा या कथेत आहे. जिच्या कथेतून या चौघींचे जगणे दिसत राहते. ‘हवाई मंजिल’ नामक इमारतीत राहणाऱ्या या चार स्त्रिया. त्यातली ‘बुवाजी’ (रत्ना पाठक शहा) वयाने मोठी. या ‘हवाई मंजिल’ची मुखत्यार. पन्नास वर्षांची विधवा बुवाजी ही सगळ्यांचा आदर्श आहे. तिच्या इमारतीवर मॉल बांधण्यासाठी टपलेल्या बिल्डर्सना बाहेरचा रस्ता दाखवतानाही न कचरणारी बुवाजी आपल्या सुकत चाललेल्या शरीरात फुलणारी प्रेमभावना, लैंगिक भावनेचा स्वीकार करताना तितकीच हळुवार होते. आध्यात्मिक पुस्तकांआड रोझीच्या लैंगिक सुखाच्या गोष्टी सांगणारे पुस्तक दडवून वाचणारी बुवाजी हा तिचा खरा चेहरा. मात्र आदर्श बुवाजी ही तिची इतक्या वर्षांची ओळख एवढी कायम आहे की एका क्षणी तिला तिचे नाव विचारल्यावर तेही तिला चटकन आठवत नाही. तिच्याखालोखाल शिरीन अस्लम या मुस्लीम विवाहितेची कहाणी. केवळ लैंगिक सुखासाठी पत्नी म्हणून नवरा आपला वापर करतोय, याची जाणीव तिला आहे. घरात बसून फक्त मुलांना जन्माला घालण्यात तिला रस नाही. बुरख्याआड दडून शिरीन सेल्सवुमन म्हणून काम करते. शिरीनच्या कथेला अनेक धारदार संदर्भ आहेत. पती-पत्नींमध्ये शारीरिक संबंध नीट असले म्हणजे त्यांच्यात प्रेमसंबंध आहेत, असे नाही. आपल्या कामाबद्दल, भावनांबद्दल आपल्या नवऱ्याला काडीचाही आदर नाही, हे तिलाही कळते आहे. रोज रोज शरीरसुख मागणारा तिचा नवरा गर्भनिरोधक वापरण्यासाठीही राजी होत नाही, अशा परिस्थितीत डॉक्टरांकडून वारंवार गंभीर इशारा मिळूनही त्याला शरीरसुख देत स्वत: गर्भनिरोधक गोळ्या खात राहणारी शिरीन अनेक घरांमध्ये आहे. आणि अशा शिरीनच्या कथा आपल्याला माहिती नाहीत, असेही नाही. मात्र या चित्रपटात स्वत:शी ते प्रामाणिकपणे कबूल करण्यापर्यंतचा तिचा प्रवास आणि मग तिच्यात होणारे स्थित्यंतर महत्त्वाचे ठरते.

लीला ही त्या छोटय़ा मोहल्यात पार्लर चालवणारी तरुणी. लीला मात्र लैंगिक सुखाबद्दल आग्रही आहे. तिचा बॉयफ्रेंड (विक्रोंत मसी) किंवा तिचा नियोजित वर (वैभव तत्त्ववादी) या दोघांकडूनही शरीरसुखाची मागणी करताना ती लाजत नाही. किंबहुना, स्वत:ला काय हवे आहे याबद्दल स्पष्ट मत असलेली आग्रही लीला ते हवे त्या पद्धतीने मिळत नाही म्हणून वैतागलेली आहे. तर चौथी रिहाना ही कर्मठ मुसलमान कुटुंबातील महाविद्यालयात शिक्षण घेणारी मुलगी. बुरख्याआड जीन्स-टॉप लपवून वावरणाऱ्या रिहानाला गायक व्हायचे आहे, तिला फॅ शनचाही सोस आहे. जीन्सला विरोध करणाऱ्या कळपात राहून जगण्याचा अधिकार मागणारी रिहाना आपल्या या महत्त्वाकांक्षी स्वप्नांच्या पूर्ततेसाठी चोरीचा मार्ग स्वीकारते. या चौघींची अस्वस्थता, हतबलता एका वळणावर ‘लिपस्टिकवाले सपने’ पाहणाऱ्या रोझीशी जोडली गेली आहे. आपल्या खऱ्या जाणिवांनिशी वावरणाऱ्या चौघींना जेव्हा आपल्याच लोकांकडून पाठिंबा मिळत नाही तेव्हा त्या एकमेकींचा आधार घेतात. ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ ही साधी सरळ कथा नाही. या चौघींच्या नेहमीच्या जगण्यातून स्त्रियांच्या रोजच्या आयुष्यात असलेल्या विसंगतीवर, विरोधाभासावर दिग्दर्शिकेने बोट ठेवले आहे. आणि त्यांचं हे द्वंद्व रत्ना पाठक शाह, कोंकणा, अहाना आणि प्लाबिता यांनी आपल्या अभिनयातून अस्सल उभे केले आहे. या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराने आपापली भूमिका चोख निभावत कथेला न्याय दिला आहे.

एकाकी पण खंबीर असलेली बुवाजी या वयात मात्र शारीर आणि भावनिक प्रेमासाठी आसुसलेली असू शकत नाही? बीवी म्हणून नवऱ्याच्या नियंत्रणात राहणे हे प्रेम आहे? खुलेपणाने शरीरसबंध ठेवते म्हणजे लीला छचोर आहे? रिहानाला अपेक्षित असलेले स्वातंत्र्य तिने आपल्या पद्धतीने मिळवायचा प्रयत्न करणे हा गुन्हा आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला माहिती आहेत. पण खरोखरच स्त्रियांनी आपल्या जाणिवानेणिवांनिशी वागायचे ठरवले तर ते समाजाला मान्य होईल? ‘लेडीज ओरिएंटेड’ म्हणून हा चित्रपट नाकारणाऱ्या सेन्सॉर बोर्डाच्या भूमिकेतूनच त्याचे उत्तर अधोरेखित झाले आहे. ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ हा खरोखरच पूर्णपणे स्त्रीवादी आहे आणि म्हणूनच तो सगळ्यांनी पाहावा असा चित्रपट आहे.

चित्रपट : लिपस्टिक अंडर माय बुरखा

  • दिग्दर्शक- अलंकृता श्रीवास्तव
  • कलाकार- रत्ना पाठक शाह, कोंकणा सेन शर्मा, अहाना कुमरा, प्लाबिता बोरठाकुर, विक्रांत मसी, सुशांत सिंग, वैभव तत्त्ववादी, शशांक अरोरा.