संगीतकार तसंच दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांचा ‘रंगून’ प्रदर्शित होतो आहे. आपल्या प्रत्येक सिनेमात स्वत:च्या आधीच्या कामाशीच स्पर्धा करणारा हा माणूस दरवेळी आधीच्या कामाच्या कित्येक योजने पुढं निघून जातो.

येत्या २४ तारखेला दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांचा ‘रंगून’ हा दहावा सिनेमा प्रदर्शित होतो आहे. गुलजार यांची गाणी, विशाल भारद्वाज यांचं संगीत, त्यांचंच दिग्दर्शन, कंगना राणावत, सैफ अली खान आणि शाहीद कपूरसारखे अभिनेते आणि यूटय़ूबवर आधीच हिट झालेली गाणी या सगळ्यामुळे जाणकार प्रेक्षक ‘रंगून’ची आतुरतेने वाट पाहतो आहे. आपल्या सिनेमाचं कथानक गुलदस्त्यात ठेवण्यात विशाल भारद्वाज यांना यश आलेलं असलं तरी हा पिरीयड सिनेमा असून तो दुसऱ्या महायुद्धाच्या पाश्र्वभूमीवर आहे हे एव्हाना समजलं आहे. त्यामुळे त्या काळात असलेली भारतातली परिस्थिती, स्वातंत्र्यलढय़ाची पाश्र्वभूमी, रंगूनवर जपान्यांचं होऊ  घातलेलं आक्रमण, आझाद हिंद सेना हे सगळे तपशील ओघानेच आले. फीअरलेस नादियावर हा सिनेमा आहे, अशीही एक चर्चा आहे. प्रत्यक्षात काय असेल ते सिनेमा प्रदर्शित झाल्यावरच कळेल, पण तोपर्यंत मात्र ‘ओमकारा’, ‘मकबूल’, ‘हैदर’, ‘कमिने’ सारखे सिनेमे देणारा हा दिग्दर्शक या सिनेमातून काय देणार ही उत्सुकता राहणार आहे.

विशाल भारद्वाज यांचा सिनेमा म्हटलं की त्यांचं स्वत:चं वैशिष्टय़पूर्ण संगीत आणि नंतर बराच काळ लोकांच्या ओठांवर रेंगाळत राहणारी गुलजार यांची गाणी हे समीकरण असतं. ‘रंगून’मध्येही ते आहेच. जानेवारीतच यूटय़ूबवर प्रदर्शित झालेल्या त्यातल्या ‘ब्लडी हेल’, ‘टिप्पा’, ‘एक दुनी दो’, ‘ये इश्क है’, ‘अलविदा’, ‘चोरी चोरी’, ‘मेरे पिया गये इंग्लंड’ अशा अर्जितसिंग, रेखा भारद्वाज, सुनिधी चौहान यांनी गायलेल्या बारा गाण्यांचे अल्बम चांगलेच उत्सुकता वाढवणारे आहेत.

तुम्ही सिनेमा का काढता, असा प्रश्न विशाल भारद्वाज यांना कधी कुणी विचारलाच तर त्यांचं उत्तर असतं, त्या सिनेमाला संगीत देता येतं म्हणून. संगीत हेच त्यांचं पहिलं प्रेम, पहिलं पॅशन आहे. त्यांनीच आजवर अनेक मुलाखतींमधून सांगितलं आहे की मला संगीतकार म्हणून काम मिळावं म्हणून मी सिनेमा काढतो. पण सिनेमा काढायचा असेल तर मला दुसऱ्याच्या स्क्रिप्टवर नाही काम करता येत. तेव्हा कथा माझीच पाहिजे. दुसऱ्याने लिहिलेले संवाद दिग्दर्शित करणं माझ्यासाठी कठीण होऊन बसतं. त्यामुळे तेही माझंच पाहिजे. म्हणजे संगीतकार व्हायचं म्हणून सिनेमा काढायचा, तो दिग्दर्शित करणं शक्य व्हावं यासाठी पटकथा लिहायची, संवाद लिहायचे आणि ही सगळी प्रक्रिया आपल्या हातात हवी म्हणून निर्माताही स्वत:च बनायचं आणि हे सगळं करताना सिनेमाच्या आशयाशी, निर्मितीमूल्यांशी तडजोड झालीय असं पडद्यावर दिसत नाही.

अर्थात संगीत आणि शब्दांशी असलेलं त्यांचं हे नातं रक्तातूनच म्हणजे वडिलांकडूनच आलेलं होतं. त्यांचे वडील उत्तर प्रदेशमध्ये साखर उत्पादनांशी संबंधित उत्पादनाचं इन्स्पेक्शन करणारे सरकारी अधिकारी. त्यांना गीतरचनेचा, संगीताचा छंद होता. तो त्यांनी त्या काळातल्या बॉलीवूडपर्यंत नेऊन भिडवला होता. त्यांनी काही हिंदी सिनेमांसाठी गीतं लिहिली होती. मीरतमध्ये राहूनही ते कल्याणजी आनंदजी, आशा भोसले, उषा खन्ना यांच्याशीही जोडलेले होते. त्यासाठी त्यांची मुंबईत सतत जा-ये असायची. वडिलांचं बोट धरून विशालही यायचे. ‘टॅक्सी ड्रायव्हर’सारख्या त्या काळातल्या मोठय़ा सिनेमांचे प्रीवूा त्यांनी लहानपणी बघितले होते. त्या सगळ्या वातावरणाचा त्यांच्यावर अप्रत्यक्ष परिणाम होतच होता. त्यातून त्यांनी १७ व्या वर्षी जी संगीतरचना केली, ती त्यांच्या वडिलांनी उषा खन्ना यांना ऐकवली. आणि ती ‘यार कसम’ सिनेमासाठी वापरली गेली. वयाच्या १९ व्या वर्षी विशाल भारद्वाज यांनी आशा भोसले यांना संगीत दिलं होतं. पण ते सगळं पुढे गेलं नाही ते त्यांच्या वडिलांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे.

वडील गेले तेव्हा विशाल यांचं वय होतं अवघं १९ वर्षांचं. त्यानंतर लगेचच ते मीरतहून दिल्लीला आले. हिंदू कॉलेजला त्यांना स्पोर्ट्स कोटातून प्रवेश मिळाला. क्रिकेट होतं, भरपूर मित्रमंडळी होती. पण कॉलेजच्या दुसऱ्या वर्षांला असताना एका टुर्नामेंटच्या आदल्या दिवशीच विशाल यांचा हाताचा अंगठा मोडला. वर्षभर त्यांना क्रिकेट खेळता आलं नाही आणि मग त्यांना क्रिकेट सोडूनच द्यावं लागलं. मग या काळात संगीताने त्यांचं सगळं आयुष्य व्यापून टाकलं. याच काळात मैत्रीण, प्रेयसीच्या रूपात रेखा यांचा त्यांच्या आयुष्यात प्रवेश झाला होता. दूरदर्शनला काही कार्यक्रमांचं काम मिळत होतं. गझल गाणाऱ्या मित्रांना हार्मोनियमची साथ द्यायला ते जायचे. दिल्लीत राहून छंद आणि काही प्रमाणात अर्थार्जन अशा दोन्ही पातळीवर संगीत साधना सुरू असताना अगदी योगायोगाने त्यांची भेट झाली गुलजारांशी.
विशाल दिल्लीतील एका स्टुडिओत जिंगल रेकॉर्ड करत होते. तेव्हा त्यांना समजलं की आज रात्री आठ वाजता स्टुडिओत गुलजार येणार आहेत. त्यावेळी गुलजार अमजद अलींवर एक डॉक्युमेंट्री करत होते. विशाल स्टुडिओतच थांबून राहिले. थंडीचे दिवस होते. रात्री बरोबर आठ वाजता फोन वाजला की मी गुलजार बोलतोय. मी अमुकतमुक मिठाईच्या दुकानाच्या जवळ आहे. मला तुमचा हा स्टुडिओ सापडत नाहीये. तो फोन विशाल यांनीच घेतला. त्यांनी गुलजारना सांगितलं तुम्ही आहात तिथेच थांबा. मी तुम्हाला घ्यायला येतो. गुलजार यांना घेऊन येताना तरुण वयाच्या उत्साहाच्या भरात त्यांनी गुलजारना सांगितलं की, मीही संगीत देतो. या मुलाची एनर्जी बघून गुलजार त्यांना म्हणाले की मुंबईला येऊन भेट. काही काळाने जेव्हा विशाल खरोखरच मुंबईला आले, तेव्हा त्यांनी गुलजारना भेटायचा प्रयत्न केला. भेट लगेच होणं मुश्कीलच होतं. विशालना दूरदर्शनच्या कार्यक्रमांना संगीत द्यायचं काम मिळालं. नंतर एका म्युझिक कंपनीत काम मिळालं. या कंपनीला ‘जंगल बुक’ ही मालिका मिळाली होती. तिला संगीत विशालच देणार होते. विशाल यांनी सुरेश वाडकरांना मधे घालून ‘जंगल बुक’साठी ‘जंगल जंगल बात चली है’ हे गुलजारांचं टायटल साँग मिळवलं. मग गुलजारांबरोबर आणखीही काही कामं झाली. आणि  गुलजार यांनी विशालना ‘माचिस’ सिनेमाचा ब्रेक दिला.

विशाल भारव्दाज हे नाव सगळ्यांच्या कानावर पडलं ते पंजाबच्या पाश्र्वभूमीवरची कथा असलेल्या गुलजार यांच्या (१९९६) ‘माचिस’ सिनेमापासून. ‘चप्पा चप्पा चरखा चले’ हे गाणं त्यावेळी अगदी गल्लीगल्लीतही वाजायला लागलं. गुलजारांचा सिनेमा, त्यामुळे गीतंही त्यांचीच. पण गल्लोगल्ली वाजणारा हा कोण बुवा नवीन संगीतकार असं लोकांनी बघेपर्यंत या सिनेमासाठी त्यांना फिल्मफेअर आर डी बर्मन अ‍ॅवॉर्ड फॉर न्यू टॅलेंटही मिळालं. त्यानंतर ‘सत्या’ आला. ‘सत्या’च्या गाण्यांनी तर कमालच केली. त्यातत्या ताज्यातवान्या संगीताने धुमाकूळ घातला. ‘सपने मे आती है’, ‘गोली मार भेजे में’ ही गाणी त्यावेळी अक्षरश: हिट होती. त्यानंतर तीनच वर्षांनी त्यांना ‘गॉडमदर’साठी फिल्मफेअर मिळालं. पण अशी हिट गाणी वगैरे देऊनही करिअर म्हणावं तसं बहरत नव्हतं. त्यांना आपलं भविष्य अंध:कारमय आहे, असंच वाटायचं.

असं असलं तरी या काळात त्यांच्या पाठीवर थेट गुलजार यांचाच हात होता. गुलजारांबरोबर त्यांनी या काळात उत्तमोत्तम फिल्म फेस्टिव्हल्स पाहिले. टोरँटिनो, ख्रिस्तोफ किझलोव्हस्की यांच्या सिनेमांनी त्यांच्यावर अक्षरश: गारुड केलं. हिंसासुद्धा मनोरंजन करू शकते, हे त्यांना हे सिनेमे बघूनच जाणवलं. याच काळात गुलजारांनींच त्यांना सांगितलं की तू दिग्दर्शनाचा विचार कर. तू चांगला दिग्दर्शक होऊ  शकतोस. गुलजार यांचा सल्ला आणि या सिनेमांचा प्रभाव यातून त्यांना दिग्दर्शक व्हायचे वेध लागले. त्यातूनच ते ‘मकडी’चं स्क्रिप्ट घेऊन शबाना आझमींकडे पोहोचले. हा सिनेमा चिल्ड्रन्स सोसायटीसाठी तयार केला गेला होता. पण तो तयार झाल्यावर मात्र चिल्ड्रन्स सोसायटीने नाकारला. मग मित्राकडून २४ लाख रुपयाचं कर्ज घेऊन त्यांनी तो स्वत:च विकत घेतला. गंमत म्हणजे या सिनेमाचं सगळीकडे कौतुक झालं, त्याला पुरस्कारही मिळाले. या सिनेमाचे लेखक, दिग्दर्शक, निर्माते, गीतकार, कथा, पटकथा, संवाद, संगीत सबकुछ विशाल भारव्दाज असंच होतं.

‘मकडी’नंतर ‘मकबूल’ आला..त्यानंतर  ‘द ब्ल्यू अमरेला’..‘ओमकारा’.. ‘ब्लड ब्रदर्स’ ही शॉर्ट फिल्म.. मग ‘कमिने’.. ‘सात खून माफ’.. ‘मटरू की बिजली का मंडोला’.. ‘हैदर’ आणि आता प्रतीक्षित ‘रंगून’.

यातले ‘मकबूल’, ‘ओमकारा’, ‘हैदर’ हे तीन सिनेमे म्हणजे शेक्सपीअरच्या मॅकबेथ, आथेल्लो, आणि हॅम्लेट या तीन कलाकृतींचं भारतीय मातीतलं रूप. ‘मकबूल’, ‘ओमकारा’ निखळ सादरीकरणामुळे गाजलेले तर ‘हैदर’ विषयामुळे. ‘कमिने’ची हाताळणी ही त्याची जमेची बाजू ठरली. ‘सुहानाज सेव्हन हजबंडस’ या कादंबरीवरचा ‘सात खून माफ’ हा विशाल भारव्दाज यांचा आवडता सिनेमा. पण तो बाकी फारसा कुणाला आवडला नाही. डाव्या विचारसरणीशी जवळीक सांगणारा ‘मटरू की बिजली का मंडोला’चंही (हा सिनेमा ब्रेख्तच्या नाटकावर आधारित आहे) तसंच. ‘द ब्ल्यू अमरेला’ तर थेट रस्किन बॉण्ड यांच्याच कथेवरचा सिनेमा. त्याचा जीव छोटा. पण लहान मुलांसाठी त्याची दखल घ्यायलाच हवी असा.

असे मोजकेच पण दर्जेदार सिनेमे देणाऱ्या विशाल भारव्दाज या माणसाची संगीत, दिग्दर्शन, पटकथा, संवाद या सगळ्यावर प्रचंड हुकमत आहे. हा माणूस आहे संगीत, सिनेमा हेच जगणारा. तथाकथित फिल्मी दुनियेचा भाग असूनही एकदम साधा. शिस्तीचं आयुष्य जगणारा. पहाटे उठणं. तासभर योगा. दोनेक तास वाचन, तासभर लिखाण, मग टेनिस, संगीत या सगळ्याची शिस्त सहसा मोडत नाही. त्यांना ओळखणारे सांगतात की आजही ते संगीताची व्यावसायिक कामं घेतात. आजही ते मुंबईत भाडय़ाच्या घरात राहतात. हातात पैसा आल्यावर त्यांनी घर नाही, तर स्वत:चा स्टुडिओ उभा केला. (मसुरीला मात्र त्यांनी प्रसिद्ध लेखक रस्किन बॉण्डच्या शेजारीच घर घेतलं आहे. आणि त्या घरात राहून लिखाण करायला त्यांना फार आवडतं. सिनेमा करायचा असतो तेव्हा ते एकाच वेळी दिग्दर्शक, पटकथा लेखक, संवाद लेखक, संगीतकार, निर्माते असं सगळं असतात. पण सेटवर यायच्या त्यांच्या वेळा चुकत नाहीत. या सगळ्या भूमिका एकाच वेळी निभवायच्या असतात, त्यासाठी त्यांच्याभोवती सतत गर्दी, गोंधळ असतो. पण ते स्वत: अत्यंत शांत असतात. ते कधीही फिल्मी पाटर्य़ा, अ‍ॅवार्ड फंक्शन अशा कार्यक्रमांमध्ये नसतात. सिनेमे येणार असले की टीव्ही माध्यमाच्या सर्व वाहिन्यांवरून त्या सिनेमाचे ढोल वाजवणाऱ्या ज्या मार्केटिंगसदृश मुलाखती वाजायला लागतात, अशा मुलाखतींमध्ये ते नसतात. सिनेमा काढणं हे माझं काम,  ते मी केलंय, आता त्याचं काय करायचं ते प्रेक्षकांनी बघावं असं म्हणून ते टेनिस खेळायला निघून जातात. सिनेमा काढणाऱ्या, संगीताची विलक्षण ओढ असणाऱ्या, एकेकाळी क्रिकेट हेच जीव की प्राण असणाऱ्या विशाल भारव्दाज यांचं टेनिसप्रेम हीपण एक गमतीशीर गोष्ट आहे. आपला राग, लोभ, इगो ते नेहमी टेनिसमध्ये काढतात. त्यासाठी रोज नियमित टेनिस खेळतात. शूटिंगच्या काळात तर आवर्जून सलग दोन दोन तास टेनिस सुरू असतं आणि सेटवर काही गडबड झाली की, ते तिथे शांत असतात. पण मग त्यांचा टेनिस कोर्टावरचा वेळ मात्र वाढतो.

विशाल भारद्वाज पाटर्य़ा करतात, देशभर, देशाबाहेर भरपूर फिरतात, पण हे सगळं त्यांना हव्या असलेल्या, त्यांच्या माणसांबरोबर. अगदी गेल्या चार-पाच वर्षांपर्यंत तर ते रेल्वेनेही फिरायचे. आता लोक त्यांना ओळखायला लागल्यापासून असं फिरणं बंद होत गेलं आहे. आशीष विद्यार्थी, पीयुष मिश्रा असे उमेदीच्या काळातले मित्र मात्र आजही त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत.

या सगळ्याबरोबरच त्यांची आणखी एका माणसाची नकळत मैत्री झाली. तो माणूस म्हणजे शेक्सपीअर. विशाल यांनी शेक्सपीयरचं केलेलं भारतीयीकरण ही त्यांची खास ओळख आहे. ते म्हणतात टोरँटिनो, किझलोव्हस्की यांचे सिनेमे बघून मला हिंसेचं आकर्षण निर्माण झालं होतं. हिंसा अशा पद्धतीने मनोरंजन करू शकते, करते हेच मला कमालीचं वाटलं होतं. त्यात गुलजारांनी तू दिग्दर्शन चांगलं करशील असं म्हणून खतपाणी घातलं होतं. ‘मकडी’ने आत्मविश्वास दिला आणि असं वाटायला लागलं की गँगस्टर या विषयावर सिनेमा काढावा. अशातच एका रेल्वे प्रवासात शेक्सपीअरच्या ‘मॅकबेथ’ची कुठलीतरी सुमार दर्जाची रूपांतरित आवृत्ती त्यांना वाचायला मिळाली. त्यातूनच प्रेरणा घेऊन त्यांनी ‘मकबूल’ लिहिला. आपण शेक्सपीअरला हात घातला आहे, याचं त्यांना फारसं गांभीर्य वाटलं नव्हतं. हे इतर कुणाला कळणार नाही असंच त्यांना त्यावेळी वाटत होतं. पण त्यांनी एक केलं होतं, कथानकाच्या मूळ गाभ्याला कुठे धक्का लावला नाही. मग ‘ओंकारा’ आला. त्यात त्यांना शेक्सपीअरचं ओझं नाही झालं. उलट तो त्यांचा अदृश्य सहलेखक झाला. ‘माझ्या शेजारी उभं राहून मला हवं तसं काम करून दिलं त्याने. शिवाय त्याच्या मानधनाचा, कॉपी राइटचाही प्रश्न नव्हता,’ असं विशाल गमतीने सांगतात. त्यांच्या या शेक्सपीअर ट्रायालॉजीबद्दल त्यांनी गुलजार यांनी दिलेली प्रतिक्रिया एकदम मार्मिक आहे. गुलजार त्यांना म्हणाले की तू शेक्सपीअरच्या जमिनीवर तुझी इमारत उभी केली आहेस.

न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्यांना सतराव्या शतकातला शेक्सपीअर तुम्ही आताच्या काळातल्या काश्मीर प्रश्नाशी कसा जोडलात, असा प्रश्न विचारला गेला. तेव्हा त्यांचं उत्तर होतं, ४०० वर्षांनंतरही शेक्सपीअर लोकांना ताजा वाटतो हा त्याचा ग्रेटनेस आहे. तो माणसाच्या मानसिकतेशी चक्क खेळतो. माणसाच्या भावना, वेदना यातला संघर्ष आणि त्यातलं राजकारण मांडतो. हा संघर्ष शतकानुशतकं कायम आहे. अकिरा कुरोसावा, मेल गिब्सन, रशियन लेखक ग्रिगोरी कोझीन्त्सेव या सगळ्यांनी शेक्सपीअरचं रूपांतर करताना आजच्या काळातही शेक्सपीअरचीच पल्लेदार भाषा वापरली आहे. याचं कारण लोक आजही त्याच्या प्रभावातून बाहेर आलेले नाहीत. मला मात्र तसली ओझी नव्हती. त्यामुळे मी त्याला भारतीय मातीत रुजवू शकलो. (‘ओमकारा’मधली आधा बम्मनसारखी संकल्पना ऐकताना किंवा ‘मकबूल’मधल्या अब्बाजींच्या तोंडून ये इश्क बहुत ही बुरी बिमारी है.. पुरी कायनात हमारी मुठ्ठीमे है, लेकिन ये रत्तीभर औरत संभाली नही जाती, हा कारमध्ये बसून पंकज कपूर यांनी म्हटलेला डायलॉग ऐकताना हे पुरेपूर पटतं.)

विशाल सांगतात, काश्मीर प्रश्नावर सिनेमा तर करायचा होता, पण मी काश्मिरी नाही, तिथे गेलोही नाही कधी. काश्मीर प्रश्न माहीत. पण ते सिनेमा बनवायला पुरेसं नव्हतं. त्या दरम्यान माझ्या पत्नीने रेखाने बशरत पीरचं ‘कफ्र्युड नाइट्स’ वाचलं होतं. बशरत पीर काश्मीरमध्ये वाढला. काश्मिरी लोकांप्रमाणेच त्याच्या आई-वडिलांनी त्यालाही शिक्षणासाठी अलिगढ युनिव्हर्सिटीत पाठवून दिलं होतं. दहशतवादापासून दूर राहण्यासाठी. मग मला त्यातून हवी ती लिंक मिळाली. सिनेमात ते सगळे बारकावे यावेत यासाठी बशरत पीरलाच या सिनेमाचा सहलेखक म्हणून बोलावलं गेलं. ‘हैदर’ विरुद्ध निदर्शनं झाली. अँटी आर्मी, अँटी नॅशनलिस्ट असल्याचे आरोप झाले. त्यांना पोलीस संरक्षण घ्यावं लागलं. पण हैदरमध्ये मी कोणाचीही बाजू घेतलेली नाही. मी तटस्थपणे माझं काम केलं. काश्मीर प्रश्नातली मानवी वेदना मी शोधत होतो. त्यामुळे त्यात सामान्य माणूस कसा अडकत गेला हे मला मांडता आलं. या सिनेमावर टिप्पणी करताना ते सांगतात की काश्मीर प्रश्न युरोपात असता तर त्यावर आजवर २०० तरी सिनेमे निघाले असते.

शेक्सपीअरइतकाच किंवा त्याच्याहूनही जास्त महत्त्वाचा त्यांच्या आयुष्यातला माणूस म्हणजे गुलजार. गुलजार हे आपले मेंटॉर असल्याचं विशाल कबूल करतात. दिल्लीतल्या स्टुडिओत गुलजार भेटल्या क्षणापासून त्यांच्याशी जे नातं सुरू झालं आहे, ते दिवसेंदिवस अधिकच रुजत गेलं आहे. वास्तविक लहानपणापासून कविता-गीतं यांची आवड असणाऱ्या विशालना चित्रपटाची गीतं लिहिणंही आवडेल असंच काम. पण गुलजार यांच्यासारखा गीतकार बरोबर असताना कोण कशाला ते करेल. म्हणून मग ते त्या फंदात पडत नाहीत. त्यामुळे त्यांच्या सिनेमात सहसा संगीत त्यांचं आणि गीतं गुलजार यांची हे समीकरण ठरलेलंच असतं. स्वत: विशाल यांनी स्लो पेसची गाणी आवडतात. त्यामुळे ‘बीडी जलायले’सारखं गाणं द्यायला आपल्याला त्रास झाला, हेही ते कबूल करतात. पण डान्स नंबर द्यायचंच आहे तर ‘झुमका गिरा रे’ सारखं लोकांच्या तोंडात बसेल असं गाणं द्यायचं असं ठरलं. त्या दरम्यान त्यांना उत्तरेतल्या लोकसंगीतात ‘तुम सिगरेट का छोडो खयाल बाबू होठ जलेंगे’ अशी ओळ असलेलं गाणं मिळालं. तेवढय़ावरून गुलजार यांनी ‘बीडी जलायले जिगर से पिया’ रचलं आहे.  त्यात बिपाशाने साकारलेल्या बिल्लोच्या व्यक्तिरेखेला काहीसा हमिंग वाटणारा रेखा भारव्दाज यांचा आवाज एकदम चपखल बसला आहे. शिवाय ‘ठंडी हवा भी’ नंतर ‘ससुरी’सारखी विशाल यांनी केलेली अ‍ॅडिशन सॉलिड मजा आणते.

वास्तविक विशाल यांनी ‘यार कसम’चं म्युझिक केलं तेव्हा म्हणजे वयाच्या सतराव्या वर्षी संगीताचं शिक्षण घेतलेलं नव्हतं. मग ते मित्रांकडून, पत्नीकडून संगीत शिकले. तरुणपणी त्यांच्यावर जगजीतसिंग, मेहंदी हसन, आरडी, मदनमोहन, सलील चौधरी, एसडी या सगळ्यांचा प्रभाव होता. पण त्यातून ते त्यांचं संगीत शोधत गेले आणि आजच्या मुक्कामाला पोहोचले आहेत. त्यांना एक दिवस संगीतातच असं काहीतरी करायचं आहे जे शब्दातीत असेल.

आता ‘रंगून’ प्रदर्शित व्हायच्या आधीच ‘रंगून’च्या गाण्यांनी, संगीताने जाणकार रसिकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आपल्या प्रत्येक सिनेमात स्वत:शीच, स्वत:च्या आधीच्या कामाशीच स्पर्धा करणारा विशाल भारद्वाज हा माणूस दरवेळी जिंकतो आणि आधीच्या कामाच्या कित्येक योजने पुढं निघून जातो. त्यांच्या प्रत्येक सिनेमागणिक असलेला हा शिरस्ता ‘रंगून’ही पाळेल आणि विशाल भारद्वाजना संगीतकार म्हणून, दिग्दर्शक म्हणून आणखी उंचीवर नेऊन ठेवेल अशीच अपेक्षा आहे.

response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा