‘मिस युनायटेड कॉन्टिनन्ट २०१६’ भारताचे प्रतिनिधित्व करणार

नागपूरची फॅशन आयकॉन आणि ग्लॅमरच्या क्षेत्रात स्व:ताची वेगळी शैली निर्माण केलेली सौदर्यवती लोपामुद्रा राऊत ही आणखी एक झेप घेण्यासाठी सज्ज झाली आहे. दक्षिण अमेरिकतील इक्वाडोर येथे आयोजित ‘मिस युनायटेड कॉन्टिनन्ट २०१६’मध्ये लोपामुद्रा भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

लोपामुद्रा ही ‘मिस दिवा २०१४’ या स्पर्धेत अंतिम पाचमध्ये होती. तसेच ‘मिस इंडिया २०१४’ मध्ये तिसऱ्या क्रमांकावर होती. आता ती ‘मिस युनायटेड कॉन्टिनन्ट’मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. स्पर्धेची ही चौथी फेरी इक्वाडोर येथे ऑगस्टमध्ये होणार आहे.

‘मिस युनायटेड कॉन्टिनेन्ट्स’ हा एक मोठा ‘फॅशन इव्हेन्ट’ आहे. ग्वायाक्वील मुन्सिपालटी आणि गामा टीव्ही टेलिव्हिजन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

‘मिस युनायटेड कॉन्टिनन्ट्स २०१६’ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाल्याने हा दिवस माझ्यासाठी अत्यंत आनंदादायी आणि काहीसा भावनिक क्षण आहे. कारण मी अनेक वर्षांपासून या दिवसाच्या प्रतीक्षेत होते. ‘मिस इंडिया गोवा’ २०१३ मध्ये विजयी झाल्यानंतर अनेक उप-किताब जिंकले. त्यानंतर ‘मिस इंडिया २०१४’ मध्ये पुन्हा पहिल्या चौघांत स्थान पटकावले.  खरं तर हा माझ्यासाठी वेगळा प्रवास होता. अखेर मला भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी प्रात झाल्यामुळे याचा अत्यंत आनंद आहे, असेही लोपामुद्राने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. ‘मिस इंडिया २०१४’ आणि ‘मिस दिवा २०१४’ मध्ये अंतिम फेरी गाठलेल्या लोपामुद्रा हिला अनेक उपकिताब मिळाले आहेत. तिला तीनदा ‘मिस बॉडी ब्युटिफुल’ हा उपकिताब मिळाला आहे. त्यापूर्वी लोपामुद्रा ‘मिस इंडिया गोवा २०१३’ राहिलेली आहे. लोपामुद्राने २०१३ मध्ये ‘मिस अ‍ॅडव्हेंचरस’, ‘मिस बॉडी ब्युटिफुल’, ‘मिस ऑसम लेग्स्’, ‘मिस इंटेलेक्युअल’ हे उपकिताब जिंकले आहेत.

उपराजधानीला मान

इक्वाडोर या देशात आयोजित या स्पर्धेत भारत, ब्राझील, अर्जेटिना, ऑस्ट्रेलिया, चीन, कॅनडा, बेल्जियम, कोलंबिया, पोर्तुगाल, रशिया, थायलँड, मेक्सिको, नॅदरलँड, स्वीडन, युनाटेड स्टेट्स, उक्रेन, फिलीपिन्स  यासह ३८ देश सहभागी होतात. गेल्या वर्षी ब्राझीलची नॅथालिया लागो ही ‘मिस युनायटेड कॉन्टिनन्ट’ विजेती होती. २००६ पासून ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. नागपूर, विदर्भच नव्हे तर महाराष्ट्रातून पहिल्यांदा या स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी लोपामुद्रा राऊत हिला मिळाली आहे.