विनोदवीर ऑलिव्हर हार्डी यांनी हसणे हे पुण्य तर हसवणे हे महापुण्य असे म्हटले होते. इतिहासात डोकावून पाहता चार्ली चॅप्लीन, बस्टर किटन, हॅरोल्ड लॉइड, चार्ली चेस, डॅनी के, बॉब होप यांसारख्या अनेक महापुण्यवान विनोदवीरांनी आपल्या कथा, कादंबऱ्या, नाटक, चित्रपट, मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. आजही अनेक चाहते इंटरनेटवर या साहित्याचा आस्वाद घेताना दिसतात. अशाच गाजलेल्या आणि लोकप्रिय मालिकांपैकी एक असलेली ‘ओन्ली फूल्स अँड हॉर्सेस’ ही विनोदी मालिका पुन:प्रसारित करण्याचा निर्णय सुसॅन बॅलबन यांनी घेतला आहे. काही महिन्यांपूर्वी या मालिकेचा १९ मिनिटांचा एक भाग इंटरनेटवर व्हायरल झाला होता. लाखो लोकांनी पाहिलेला तो व्हिडीओ पाहता पाहता इंटरनेटवरील सर्वात जास्त पाहिल्या जाणाऱ्या व्हिडीओच्या यादीत तो झळकू लागला. तो एका जुन्या लोकप्रिय मालिकेचा भाग असल्यामुळे वृत्तमाध्यमांनी दिग्दर्शकांशी संपर्क साधून या संदर्भात माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना याबद्दल काहीच माहीत नसल्याचे कळले. काही वर्षांपूर्वी तांत्रिक गडबडीमुळे त्या मालिकेचे अनेक भाग ‘बीबीसी’ वाहिनीच्या सव्‍‌र्हरमधून नष्ट झाले होते. आणि हा भाग त्या नष्ट झालेल्या व्हिडीओंपैकी एक असल्यामुळे दिग्दर्शकांनी त्या चाहत्याचे आभार मानले आहेत. दरम्यान, अनेकांनी ट्विटर, फेसबुक, ई-मेलच्या माध्यमातून त्यांना मालिकेचे पुन:प्रसारण करण्याची विनंती केली. परिणामी त्यांनी ‘ओन्ली फूल्स अ‍ॅण्ड हॉर्सेस’ ही मालिका पुन्हा एकदा सुरू करण्याची घोषणा केली. या विनोदी मालिकेत डेव्हिड जेसन, रॉजर लॉइड पॅक, जॉन चॅलीस, निकोलस लिंडहर्स्ट, बस्टर मेरिफिल्ड या कलाकारांनी अभिनय केला होता. मध्यमवर्गीय माणसांच्या आयुष्यात येणाऱ्या लहानसहान समस्यांवर मिष्कील भाष्य करणाऱ्या या मालिकेने ऐंशीच्या दशकात प्रचंड लोकप्रियता मिळवली होती.