टीव्ही मालिकांमधील आघाडीची अभिनेत्री संजिदा शेख आणि बिग बॉसमधून घराघरात पोहोचलेला किथ सिक्वेरा लवकरच ‘स्टार प्लस’वरच्या ‘लव्ह का है इंतजार’ या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

बॉलिवूडची नावाजलेली अभिनेत्री आणि राजस्थानमधील शाही घराण्यातील राजकुमार यांची प्रेमकथा या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. इतर मालिकांपेक्षा या मालिकेतील प्रेमकथा ‘जरा हटके’ असल्याचे ‘लव्ह का है इंतजार’ची टीम आवर्जुन सांगते. या मालिकेत किथ सिक्वेरा आणि संजिदा शेख हे प्रमुख भूमिकेत आहेत. किथ या मालिकेत एका राजकुमाराची व्यक्तिरेखा साकारत आहे, तर संजिदा या मालिकेत अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. ती या मालिकेत बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री दाखवली आहे. ते दोघे एकमेकांचे जीवनसाथी बनतात का, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

या मालिकेत किथ आणि संजिदासोबत सोनी राझदान, प्रीतीका राव, सारा आरफीन खान, खालीद सिद्दीकी, शिशिर शर्मा, योगेंद्र टिक्कू आणि नताशा रस्तोगी यांच्याही भूमिका महत्त्वाच्या आहेत. या मालिकेची कथा नीना अरोराने लिहिली आहे. नीनाने याआधी पेज ३ या सिनेमाचे कथा लेखन केले होते. या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या मालिकेची कथा बॉलिवूडशी संबंधित असल्याने या मालिकेद्वारे हिंदी चित्रपटसृष्टी प्रेक्षकांना जवळून पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक वर्षे कारकीर्द गाजवलेल्या सिद्धार्थ पी. मल्होत्रा यांनी या मालिकेची निर्मिती केली असल्याने या मालिकेत हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक गोष्टी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

संजिदाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून या मालिकेचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. बॉलिवूडमध्ये यश आणि प्रसिद्धीच्या शिखरावर असलेली कामिनी माथूर मनाने सरळ-साधी मुलगी आहे. कामिनीचे वडील आयएएस अधिकारी असतात, तर आई चित्रकार आहे. यामुळे कामिनीवर लहानपणापासूनच चांगले संस्कार झालेले असतात. एका अभिनेत्रीवर नाही तर तिच्यातील साध्या मुलीवर प्रेम करणाऱ्या ‘जीवनसाथी’च्या ती शोधात असते. माधवसिंहच्या रुपाने तिला तिचं खरं प्रेम मिळतं की नाही, हे मालिका सुरू झाल्यावरच कळेल. ही मालिका आता प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते का, या येत्या काळातच कळेल.