बॉलीवूडपटांमध्ये प्रेमाचा त्रिकोण हा फॉम्र्युला नेहमीचाच. ‘संगम’, ‘अंदाज’ या जुन्या चित्रपटांपासून सुरू झालेला हा प्रवास ‘कुछकुछ होता है’, ‘हम दिल दे चुके सनम’ ते ‘स्टुडंट ऑफ द इयर’ इत्यादी चित्रपटांपर्यंतचा. हा प्रेमाच्या त्रिकोणाचा तोच साचा वापरत त्यात वेगवेगळे मसाले भरत दिग्दर्शकांच्या कित्येक पिढय़ांनी प्रेक्षकांना रिझवले आणि प्रेमात पाडायला भाग पाडले. अगदी श्याम बेनेगल यांच्यासारखे दिग्दर्शकही प्रेमाच्या त्रिकोण फॉम्र्युल्याच्या प्रेमात पडलेले. पण चित्रपटात कोणताही कोन वापरू नकोस असा सल्ला त्यांना एका महान दिग्दर्शकाने दिलेला. हा महान दिग्दर्शक कोण माहितेय.. हा महान दिग्दर्शक म्हणजे सत्यजित रे.

रे यांनी बेनेगल यांना हा सल्ला का व केव्हा दिला याबद्दलच्या आठवणींना बेनेगल यांनी उजाळा दिला. निमित्त होते के.सी. महाविद्यालयातील कार्यक्रमाचे. सहसा कुठल्याही कार्यक्रमला उपस्थिती न लावणाऱ्या बेनेगलांनी या वेळी खास विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्या आठवणींची सुरुवातच थेट सत्यजित रे यांच्यापासून झाली. ‘पथेर पांचाली’लागोपाठ तीनदा पाहिल्यानंतर रे यांना भेटण्यासाठी बेनेगल उत्सुक होते. त्यांना रे यांची भेट मिळाली आणि पहिलीच भेट सात तास रंगली. चित्रपटनिर्मितीच्या अनेक अंगांविषयीचे धडे थेट रे यांच्याकडून शिकण्याची संधी मिळालेल्या बेनेगल यांचा ‘अंकुर’ चित्रपट सत्यजित रे यांनी पाहिला. हा चित्रपट पाहिल्यानंतर रे यांनी जी प्रतिक्रिया दिली ती लाखमोलाची होती. चित्रपटाच्या कथानकात नाटय़ आणण्यासाठी कोणताही त्रिकोण आणू नकोस किंबहुना कोणताही ‘कोन’ कधीच वापरू नकोस, असा सल्ला रे यांनी त्यांना दिला होता. त्या काळी सत्यजित रे यांनी बेनेगलांना दिलेला हा सल्ला बॉलीवूडकरांनी ऐकला असता तर हे त्रिकोणपट व ते निर्माण करणाऱ्या दिग्दर्शकांचे काय झाले या असते, हा मोठा प्रश्नच आहे.