गरोदरपणाचा बाऊ करण्याचे दिवस आता नाहीसे झाले आहेत, हे बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींच्या उदाहरणावरुन सिद्ध होत आहे. बी टाऊनमधल्या अनेक अभिनेत्री त्यांच्या गरोदरपणानंतरही ‘फिट अॅन्ड फाईन’ अवतारातच समोर आल्या आहेत. ही झाली चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींची बाब. पण, फॅशन जगतातही रॅम्पवर सध्या असेच काहीसे चित्र पाहायला मिळत आहे. मॉडेलिंग क्षेत्रातील एक गाजलेलं नाव म्हणजे कॅरल ग्रेशिअस. गरोदरपणानंतर अवघ्या एकाच महिन्यात कॅरलने रॅम्पवर उतरत तिच्या अदांनी अनेकांना घायाळ केले.
कॅरलच्या या दमदार पुनरागमनामुळे तिने ‘सुपरमॉडेल’सह ‘सुपरमॉम’ होण्याचाही बहुमान मिळवला आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. बहुचर्चित ‘लॅक्मे फॅशन वीक २०१६’ मध्ये गौरांग शाहाचे कलेक्शन सादर करण्यासाठी कॅरल रॅम्पवर दिसली होती. हॅन्डलूमची सुरेख साडी परिधान करत रॅम्पवर उतरलेल्या कॅरलने उपस्थितांची मने जिंकली.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीदरम्यान ‘रॅम्पवर परतण्यासाठी मी फारच उत्सुक आहे, एका मुलाची आई झाल्यानंतर एक महिना आणि एक आठवड्याच्या कालावधीनंतर हा माझा पहिलाच रॅम्प वॉक आहे’, असे कॅरलने म्हटले. याशिवाय ‘अनेक स्त्रिया त्यांच्या मुलांना सोडून इतका वेळ काम कसे करतात हे मला समजतच नाही. कारण, मी इथे फक्त एक-दोन दिवसांसाठी आले आहे पण माझं सर्व लक्ष माझ्या मुलाकडे आहे. आताही मला त्याच्याकडेच जावसं वाटत आहे. माझ्या मते कुटुंब आणि करिअर सांभाळत समतोल राखाणाऱ्या भारतीय महिला फार मेहेनती आहेत’, असे ठाम मतही कॅरलने मांडले. गरोदरपणानंतरही तितक्याच प्रभावीपणे रॅम्पवर उतरलेली कॅरल याआधीही चर्चेत आली होती. गरोदरपणादरम्यान ‘बेबी बम्प’सह रॅम्प वॉक करत एक प्रकारची धारणा मोडित काढत नवा पायंडा पाडणाऱ्या कॅरलने अनेकांची प्रशंसा मिळवली होती.

gaurang-carol-mugdha-pti-759