बऱ्याच दिवसांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर असलेली रविना टंडन ‘मातृ’ चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाली आहे. आगामी ‘मातृ’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर रविना टंडनच्या चित्रपटाचा ट्रेलर गुरुवारी प्रदर्शित करण्यात आला. १३ वर्षानंतर चित्रपटामध्ये परतलेली रविना या चित्रपटात बलात्कार पीडित तरुणीच्या आईच्या म्हणजेच विद्याच्या भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलरमधील झलक पाहता चित्रपटाची मांडणी भावनिक आणि अॅक्शन अशा दुहेरी रुपात केल्याचे दिसते. महिलांसाठी असुरक्षित असलेल्या देशाच्या राजधानीतील घटनेच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाच्या कथानकाची मांडणी केलेली असून, मुलीवर झालेल्या बलात्कारानंतर न्याय मागण्यासाठी झगडणाऱ्या आईची व्यथा या चित्रपटातून मांडण्यात आली आहे.

बलात्कार पीडितेच्या आईची व्यक्तिरेखा साकारणारी रविना टंडन प्रशासन दाद देत नसल्यामुळे मुलीवर झालेल्या अत्याचाराचा बदला घेताना दिसते. अत्याचाराचा बदला घेण्यासाठी ती स्वत: अन्यायाविरोधात लढताना दिसते. १३ वर्षानंतर पुनरागमनासाठी रविनाने योग्य चित्रपटाची निवड केल्याचे दिसते. हा चित्रपट २१ एप्रिल २०१७ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अश्तर सय्यद याने केले आहे. यापूर्वी रविनाने ‘सत्या’, ‘अक्स’, ‘पत्थर के फूल’, लाडला’ आणि ‘दामन- अ विक्टिम ऑफ मॅरिटल वॉयलन्स’ या चित्रपटामध्ये तिने दमदार अभिनय दाखवून दिला आहे. २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दामन- अ विक्टिम ऑफ मॅरिटल वॉयलन्स’ या चित्रपटातील अभिनयाबद्दल तिला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला होता.

वयाच्या ४१ वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या रविनाला तिच्या आगामी चित्रपटाकडून निश्चितच अपेक्षा असतील. ट्रेलरमधील तिची भूमिका पाहता प्रेक्षक या चित्रपटाला पसंती देतील, असे वाटते. २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सत्या’ चित्रपटातील मुख्य भूमिकेनंतर रविना पुन्हा एकदा आपल्यातील कसदार अभिनय दाखवून देणार आहे. रविनाने १९९१ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. नव्वदीच्या दशकातील ती एक आघाडीची अभिनेत्री आहे. मात्र, वयाच्या चाळीशीनंतर आईच्या भूमिकेत प्रेक्षक आणि समीक्षक रविनाला कसा प्रतिसाद देतात, हे पाहावे लागेल.