दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थीनी गुरमेहर कौर हिच्या फेसबुक पोस्टवरून सुरू झालेल्या वादामध्ये आता संगीतकार जावेद अख्तर यांनी उडी घेतली आहे. विरेंद्र सेहवाग आणि योगेश्वर दत्त या खेळाडूंनी गुरमेहरवर ट्विटच्या माध्यमातून नोंदवलेल्या प्रतिक्रियेवर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशिक्षित खेळाडू किंवा व्यक्तिंनी गुरमेहरची केलेली थट्टा समजू शकतो. मात्र सुशिक्षित खेळांडूनी तिच्या विरोधी पवित्रा घेणे अपेक्षित नव्हते, अशा आशयाचे ट्विट अख्तर यांनी केले आहे. त्यांच्या या ट्विटनंतर विरेंद्र सेहवाग आणि योगेश्वर दत्तच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया उमटल्याचे पाहायला मिळाले.  दरम्यान, अभिव्यक्ति स्वातंत्र्याची सुशिक्षित आणि अशिक्षित अशी वर्गवारी करता येत नसल्याचे सांगत दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी अख्तर यांच्या विधानाशी असहमती दर्शविली आहे. मी सहावी नापास आहे म्हणून माझ्या मतावर निर्बंध लादता येऊ, शकत नाही, असे स्पष्टीकरण देखील भांडारकर यांनी ट्विटरवरुन दिले आहे.

जावेद अख्तर यांच्यासह गुरमेहर कौर प्रकरणामध्ये भारतीय क्रिकेटपटू क्रिकेटपटू गौतम गंभीर यानेही सेहवागला टोला लगावला आहे. गंभीरने गुरमेहर कौरला पाठिंबा देत प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार असल्याचे म्हटले आहे. गंभीरने आपल्या ट्विटर हॅण्डलवर एका व्हिडिओच्या माध्यमातून आपले मत व्यक्त केले. भारतीय लष्करासाठी माझ्या मनात खूप आदर आहे. देशासाठी जवानांकडून केली जाणाऱ्या सेवेची तुलना होऊ शकत नाही. पण सध्याच्या काही घटनांमुळे मी खूप निराश झालो. आपण लोकशाही असलेल्या देशात राहत असून प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. असे त्याने म्हटले आहे. जेव्हा एखादी मुलगी आपल्या वडिलांना गमावल्यानंतर देशात शांती कायम राहण्यासाठीची इच्छा व्यक्त करत असेल तर तिला तसे करण्याचा अधिकार आहे. तिच्या मताची खिल्ली उडवणे म्हणजे तिचा अनादर करण्यासमान आहे, असा उल्लेख गंभीरने ट्विटमध्ये केला आहे.

दिल्ली विद्यापीठात शिकणारी गुरमेहर कौर ही कारगिल युद्धात शहीद झालेल्या कॅप्टन मनदीप सिंग यांची कन्या आहे. रामजस महाविद्यालयातील हिंसेनंतर गुरमेहरने सोशल मीडियावर अभाविपचा निषेध करणारी पोस्ट टाकली होती. तिच्या या पोस्टवरून मोठा वाद निर्माण झाला होता. तिला काहीजणांकडून बलात्कार करू अशा धमक्याही देण्यात आल्या होत्या. त्यानंतर गुरमेहर सोशल मीडियावर सातत्याने आपली भूमिका मांडत होती. यावेळी तिने राष्ट्रवाद्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी माझ्या वडिलांचा मृत्यू पाकिस्तानमुळे नाही, तर युद्धात झाला, अशी भूमिका केली होती. यावरून विरेंद्र सेहवागने तिच्या भूमिकेची खिल्ली उडवणारे ट्विट केले होते. मीदेखील दोन त्रिशतके केलेली नाहीत, ती तर माझ्या बॅटने केली आहेत, असा उपरोधिक टोला सेहवागने लगावला होता.