मराठी सिनेरसिकांचा गळ्यातील ताईत असलेला लक्ष्या म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे याच्या सोबतच्या पहिल्या चित्रपटातील आठवणींना महेश कोठारे यांनी लोकसत्ता ऑनलाइनच्या व्यासपीठावरुन उजाळा दिला. मराठी प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्याला पहिल्या चित्रपटासाठी केवळ एक रुपया देऊन साइन केल्याचा किस्सा त्यांनी यावेळी सांगितला. केवळ एक रुपया देऊन त्यांनी लक्ष्याला आपल्या चित्रपटात मुख्य नायकाची भूमिका ऑफर केली होती. एवढेच नाही तर लक्ष्याने देखील माझी ऑफर आनंदाने स्वीकारली, असे ते यावेळी म्हणाले.

मराठी चित्रपटसृष्टीतील लक्ष्या सोबतच्या पहिल्या चित्रपटाबद्दल बोलताना महेश कोठारे म्हणाले की, आत्माराम भेंडे आणि बबन प्रभू यांच्या ‘झोपी गेलेला जागा झाला’ या नाटकात माझे आई-वडील दोघंही काम करत होते. माझी आई या नाटकामध्ये मुख्य नायिकाच्या भूमिकेत होती. तर वडील एका सावंत नावाच्या सीआयडी अधिकाऱ्याची भूमिका साकरत होते. बबन प्रभूंच्या निधनानंतर आत्माराम यांनी त्यांच्या स्मरणार्थ नव्याने नाटक करायचे ठरविले. या नव्याने आलेल्या नाटकात बबन प्रभूंची भूमिका त्यावेळी लक्ष्मीकांत बेर्डे करत होता. नाटकाची तालीम पाहताना लक्ष्याच्या अभिनयाने मला प्रभावित केले. बबन प्रभूंची भूमिका त्याने तंतोतत साकारली होती. बबन प्रभू यांच्या अभिनयाच्या इतके जवळ त्यावेळी कोणीच गेले नव्हते. यावेळी माझ्या डोक्यात ‘धुमधडाका’ या चित्रपटाचा विषय सुरु होता. मी त्याच क्षणी एक रुपया देऊन लक्ष्याला ‘धुमधडाका’ या चित्रपटासाठी लक्ष्याला साइन करुन घेतले, असे महेश कोठारे म्हणाले. धुमधडाका या चित्रपटामध्ये आशोक सराफ देखील मुख्य भूमिकेत दिसले होते. महेश कोठारे यांच्या लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ या जोडीसोबतच्या या चित्रपटाने अक्षरश: धुम केल्याचे पाहायला मिळाले होते.

यावेळी आदिनाथ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डेला घेऊन चित्रपट करण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखवली. महेश कोठारे सध्या कॉमेडीची बुलेट ट्रेनमधून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या कार्यक्रमातील प्रत्येक भागात उत्कृष्ट परफॉम करणारी जोडी माझी फेवरेट असते, असे सांगताना त्यांनी प्रसाद आणि संदीप या जोडीला अधिक गुण दिल्याचेही ऐकायला मिळाले.  लोकसत्ता फेसबुक लाइव्ह चॅटमध्ये त्यांना व्ही. शांताराम यांचा ‘दो आंखे बारा हाथ’ यासारख्या चित्रपटाचे मराठीमध्ये नव्याने दिग्दर्शन करण्याची इच्छा आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना व्ही. शांताराम यांच्या जवळ जाण्याची माझी ताकद नाही, असे महेश कोठारे म्हणाले.