काही चित्रपट चोरपावलांनी येतात आणि ठसा उमटवून जातात….फक्त तिकिटावरच नाही, तर प्रेक्षकांच्या मनावर सुद्धा. चित्रपट हे एक असे माध्यम आहे जिथे अलीकडच्या काळात चित्रपटांच्या कथांचे विषयच नाही तर त्यांची प्रसार पद्धती देखील बदलत चाललेली दिसून येत आहे. असेच काहीसे ‘ध्यानीमनी’ या चित्रपटासोबत घडत आहे. चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती महेश मांजरेकर यांनी केली आहे.

महेश मांजरेकर हे नेहमीच वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांना प्राधान्य देतात त्यामुळे त्यांचा ‘ध्यानीमनी’ हा चित्रपटही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता जागृत करत आहे. पण, हा चित्रपट ‘पाहून नका’ अशी विनंती अनेक दिग्गज कलाकार करत आहेत. कलाकारांच्या अशा आग्रही विनवण्यांचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले असून सर्वत्र त्याचीच चर्चा होत आहे. ठाम, गंभीर आणि रहस्यमय अशा प्रकारच्या भावना त्यांच्या चेहऱ्यावर व्हिडिओत व्यक्त होताना आढळून येत आहेत.

एकीकडे काळ बदलत चाललेला असताना मराठी चित्रपट नव्या भरारी घेताना आपण बघतो आहोत. या चित्रपटाबद्दल ख्यातनाम हिंदी कलाकार अमिताभ बच्चन सलमान खान यांनी सुद्धा ‘हा चित्रपट बघू नका’ असे ट्विट केले आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील सचिन खेडेकर, भाऊ कदम, अमृता खानविलकर, संजय जाधव, संदीप पाठक, आनंद इंगळे, संस्कृती बालगुडे, वैदेही परशुरामी, आकाश ठोसर तसेच पूजा सावंत हे देखील ‘चित्रपट बघू नका’ असे आग्रहाने सांगत आहेत. साधारणतः कलाकार एकमेकांच्या चित्रपटांची हटके मार्गाने प्रसिद्धी करत आहेत. पण, या चित्रपटा बाबत तसे नसून, तो ‘बघू नका!’, असे सर्वजण सांगत असल्याने चित्रपटाप्रतीच्या या नकारात्मक भूमिकेने अनेक प्रश्नचिन्हे उभी केली आहेत. कोणत्याही प्रकारचे रक्षा कवच न बाळगता जोखमीने केल्या गेलेल्या या चित्रपटाचे असे प्रमोशन जरा चौकटीबाहेरचेच आहे.

माणसाचा स्वभावच असतो की एखादी गोष्ट करू नका किंवा बघू नका सांगितल्यावर ती मुद्दाम करावीशीच वाटते. निर्मात्यांना त्यांच्या कलाकृती विषयी असलेला आत्मविश्वास तसेच त्यांनी केलेले धाडस यातून दिसून येते. हे सांगताना प्रेक्षकांची निराशा होणार नाही अशी खात्री त्यांच्या सांगण्यात दिसून येते. त्यामुळे ‘ध्यानीमनी’ या चित्रपटाबद्दल अशा प्रकारे बोलले जात असल्याने त्या विषयी लोकांच्या मनात उत्सुकता आणि कुतूहलाने चांगलेच घर केले आहे यात शंकाच नाही. नाटककार प्रशांत दळवी यांनी चित्रपटाचं लेखन केलं आहे. संदीप खरे यांनी गीतलेखन आणि अजित परब यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. येत्या १० फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दरम्यान, महेश मांजरेकरांनी २०१६ या वर्षाची सुरूवात ‘नटसम्राट’ या दमदार चित्रपटाने केली होती आणि आता, २०१७ च्या सुरूवातीच्या काळात येत असलेल्या ‘ध्यानीमनी’ या चित्रपटाच्या निमित्ताने ते पुन्हा एकदा एका वेगळ्या धाटणीच्या चित्रपटासह प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळविण्यासाठी सज्ज झाले आहेत.