‘रईस’ या चित्रपटाची सध्या बॉलिवूड वर्तुळात चर्चा रंगत आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता शाहरुख खान आणि माहिरा खान मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. जसजशी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ येत आहे तसतशी चित्रपटाबद्दलची चर्चा रंगत आहे. या चित्रपटामध्ये पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानही झळकणार असल्यामुळे सध्या अनेकांनी चित्रपटाविषयी नाराजीचा सुर आळवला आहे. उरी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांमध्ये तणावाचे वातावरण काही कमी होण्याचे नावच घेत नाहीये. उरी हल्ल्यानंतर भारतामध्ये पाकिस्तानी कलाकारांना मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला होता. पण, राज ठाकरे यांची भेट घेत शाहरुख खानने संभाव्य अडचणी चित्रपटाच्या प्रदर्शनाधीच दूर करत त्याची महत्त्वाची भूमिका पार पाडली.

पाकिस्तानी कलाकारांना भारतात होणारा विरोध पाहता माहिरा खान ‘रईस’च्या प्रसिद्धीमध्ये सहभागी होणार नाही असे म्हटले जात होते. त्यामुळे सध्या माहिरा या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी एका अनोख्या मार्गाचा अवलंब करणार असल्याचे वृत्त पिंकव्हिला या संकेतस्थळाने प्रसिद्ध केले आहे. विविध कार्यक्रमांमध्ये आता शाहरुखच्या आगामी ‘रईस’ या चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात झाली आहे. माहिरीच्या अनुपस्थितीत शाहरुखच या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत आहे. पण, आता माहिरासुद्धा शाहरुखसोबत चित्रपटाचे प्रमोशन करणार असल्याचे म्हटले जात आहे. ‘स्काईप’च्या सहाय्याने माहिरा ‘रईस’ संदर्भातील मुलाखती देणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची जवळ आलेली तारीख पाहता माहिरा तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शक्य त्या सर्व परिंनी चित्रपटाचे प्रमोशन करत आहे.

https://www.instagram.com/p/BO7puktgOQV/

दरम्यान, राहुल ढोलकीया दिग्दर्शित ‘रईस’ हा चित्रपट गुजरातच्या दरियापूरमधील अवैध दारुचा व्यवसाय करणाऱ्या अब्दुल लतीफच्या जीवनावर आधारित आहे. अब्दुल लतीफ हा दाऊच्या जवळचा व्यक्ती होता. छोटे मोठे अवैध धंदे करणारा अब्दुल अंडरवर्ल्डचा डॉन कसा झाला या भोवती चित्रपटाचे कथानक फिरताना दिसणार आहे. २५ जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटामध्ये शाहरुख खान, नवाझुद्दिन सिद्दिकी, माहिरा खान, मोहम्मद झिशान आयुब हे कलाकारही झळकणार आहेत.