'दाग' सिनेमातील 'मैं यार मनाना नी' हे गाणे आठवतेय का? या जुन्या गाण्याला नव्याा अंदाजात प्रेक्षकांसमोर सादर करण्याचा यशराज फिल्म्सने प्रयत्न केला आहे. हे गाणे तेव्हा खूपच लोकप्रिय झाले होते. 'दाग' सिनेमाचे दिग्दर्शन यश चोप्रा यांनी केले होते. या रिमिक्स गाण्यातून यशराज यांना आदरांजली वाहण्यात आली आहे. या गाण्याबद्दल बोलताना वाणी म्हणाली की, ''मैं यार मनाना नी' हे माझे आवडीचे गाणे आहे. या गाण्यात तुम्ही ज्याच्यावर मनापासून प्रेम करता त्याला कधीही न सोडण्याचा निश्चय करता. मी जेव्हा हे गाणे ऐकले तेव्हापासूनच मला हे गाणे आवडू लागले. मी नेहमीच माझ्या मनाचे ऐकले आहे. या गाण्याचे बोल ऐकून मी स्वतःला या गाण्याशी जोडू शकले. हे गाणं माझ्यासाठी फार खास आहे आणि मला अपेक्षा आहे की प्रेक्षकांनाही हे रिमिक्स आवडेल.' या सिनेमात राजेश खन्ना, राखी गुलजार, शर्मिला टागोर आणि प्रेम चोप्रा यांच्या मुख्य भूमिका होत्या. मूळ गाणे लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी गायले आहे. रिमिक्स गाण्यात वाणी कपूरचा अप्रतिम डान्स पाहायला मिळतो. या नवीन गाण्याला याशिता शर्माने आवाज दिला आहे. वाणी कपूरच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच हृतिक रोशनसोबत यशराज फिल्म्सच्या आगामी सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा २०१९ मध्ये प्रदर्शित होईल. २०१६ मध्ये वाणीचा 'बेफिक्रे' सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमात तिच्यासोबत रणवीर सिंगचीही मुख्य भूमिका होती.