दिवाळी म्हटलं की वसूबारस, लक्ष्मीपूजन, भाऊबीज यांसारखे विविध दिवस आपण साजरे करतो. या पाच दिवसांमध्ये प्रत्येक विवाहितेसाठी खास असा दिवस म्हणजे पाडवा. यादिवशी लग्न झालेल्या स्त्रिया आपल्या नवऱ्याला ओवाळून त्यांचे औक्षण करतात. त्यानंतर नवरा आपल्या बायकोला साडी, दागिना किंवा काही ना काहीतरी भेटवस्तू देतो. मात्र, ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिका फेम राधिका म्हणजे अनिता दाते केळकरने यंदाच्या पाडव्याला आपल्या नवऱ्याकडे म्हणजेच चिन्मय केळकरकडे एका खास वस्तूची मागणी केली.

वाचा : ईशाने दिला बाळाला जन्म; धर्मेंद्र-हेमा मालिनी पुन्हा एकदा झाले आजी-आजोबा

‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेमुळे अनिता दाते या अभिनेत्रीचा चेहरा सर्वांच्याच अधिक परिचयाचा झाला. अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अनिताने नुकतीच एका वेब पोर्टलला मुलाखत दिली. आई-वडील आणि नवऱ्याकडे हक्काने गिफ्ट मागणाऱ्या या अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वीच झालेल्या पाडव्याच्या निमित्ताने कॉस्मेटीक्सने भरलेली मेकअप व्हॅनिटी नवऱ्याकडे भेट स्वरुपात मागितली. विशेष म्हणजे ही भेट आपल्याला नवऱ्याकडून मिळणारच असा विश्वासही तिला आहे. त्याचसोबत ती स्वतःही नवऱ्याला खास भेट देणार आहे. आम्ही कधीच एकमेकांना कपडे किंवा सोन भेट म्हणून देत नाही, असे अनिता आवर्जून सांगते. तिच्या नवऱ्याला वाचनाची फार आवड आहे. हेच लक्षात घेऊन तिने सर्व दिवाळी अंक एकत्र करुन त्याला दिले.

वाचा : तुमची हिंमत कशी झाली?, फरहान अख्तरने भाजप प्रवक्त्यांना धरले धारेवर

दरम्यान, ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिका रंजक वळणावर आली आहे. गुरुनाथ आणि शनायामध्ये अजूनही प्रेमसंबंध असल्याचे कळल्यावर राधिकाने या दोघांनाही धडा शिकवण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे मालिकेत काही मजेशीर घडामोडी पाहायला मिळत आहेत.