बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खाने याने गुरुवारी एका कार्यक्रमात केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ योजनेचे कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुढाकार घेऊन सुरू केलेली ‘मेक इन इंडिया’ ही संकल्पना देशातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणारी असल्याने ती सर्वात महत्त्वाची असल्याचे शाहरुख यावेळी म्हणाला. भाजप नेत्या शायना एनसी यांच्या ‘मूव्हर्स अँड मेकर्स’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात शाहरुख उपस्थित होता. हे पुस्तक ‘मेक इन इंडिया’ संकल्पनेला समर्पित करण्यात आले आहे.
शाहरुख यावेळी म्हणाला की, ‘मेक इन इंडिया’ ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली सर्वात महत्त्वपूर्ण योजना आहे. येथील आणि परदेशातील कंपन्यांना आपली उत्पादने येथेच निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या या संकल्पनेतून देशातील युवकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. याशिवाय, येथील युवकांच्या कौशल्याचाही विकास होईल.
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे पुस्तक म्हणजे मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ‘मेक इन इंडिया’ सप्ताहाची आठवण करुन देण्यासाठीचा उत्तम दस्तावेज ठरेल, असे म्हटले.