बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि अभिनेत्री क्रिती सनॉन यांचा आगामी ‘राबता’ चित्रपट पुनर्जन्माच्या कथेवर आधारित आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्याला समीक्षक आणि नेटिझन्सचा चांगला प्रतिसाद मिळाला. यातील सुशांत-क्रितीच्या केमिस्ट्रीला सर्वांची पसंती मिळत असतानाच, ट्रेलरच्या शेवटी राजकुमार यादवचा लूक अधिक लक्षवेधी ठरला. ३२४ वर्षीय म्हाताऱ्याची भूमिका त्याने यात साकारली आहे. पण, प्रसिद्धीसोबतच बऱ्याचदा तुलना करणाऱ्या प्रतिक्रियाही समोर येतातच. गेल्यावर्षी बॉक्स ऑफिसवर सपशेल फेल गेलेला ‘मिर्झिया’ आणि एसएस राजामौलीच्या तेलगू हिट ‘मगधीरा’ चित्रपटाशी ‘राबता’ची तुलना केली जात आहे. प्रसिद्ध व्यापार विश्लेषक रमेश बाला यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘मगधीरा’च्या निर्मात्यांनाही आता असेच वाटत आहे.

वाचा : क्रितीसोबतच्या नात्याबद्दल सुशांतची प्रतिक्रिया

‘राबता’च्या निर्मात्यांना ‘मगधीरा’च्या निर्मात्यांनी कायदेशीर नोटीस पाठवल्याचे समजते. बाला यांनी ट्विट केलंय की, ‘ब्रेक्रिंग…. ‘राबता’ विरोधात ‘मगधीरा’चे निर्माते कोर्टात जाणार. कथा चोरल्याचा आरोप त्यांनी लावला असून, ते चित्रपट प्रदर्शनाच्या विरोधात आहेत.’
बाला यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये एक फोटो ट्विट केला आहे. ‘राबता’ चित्रपटाच्या विरोधात मगधीराचे निर्माते कोर्टात जाणार. ‘राबता’ने कॉपीराइटचे उल्लंघन करत चित्रपटाची कथा आणि प्लॉट लाइन कॉपी केल्याचे त्यात लिहिलंय. यावरून हैद्राबाद न्यायालयाने ‘राबता’च्या निर्मात्यांना नोटीस बजावली आहे. १ जूनला होणाऱ्या न्यायालयीन कारवाईत ‘राबता’ येत्या ९ जूनला प्रदर्शित होणार की नाही यावर निर्णय देण्यात येईल.

वाचा :  … म्हणून ‘राबता’मधून प्रितमचा काढता पाय

निर्माता दिनेश विजन ‘राबता’मधून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. सुशांत सिंग राजपूत, क्रिती सनॉन यांच्याव्यतिरिक्त चित्रपटात जिम सर्भदेखील असून, राजकुमार राव पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसेल. सैफ अली खान आणि करिना कपूर खान यांच्या ‘एजंट विनोद’मधील रिव्हिजिटेड व्हर्जन असलेल्या ‘राबता’ या शीर्षक गीतात अभिनेत्री दीपिका पदुकोण झळकली आहे.