चित्रपटसृष्टीतील ९०च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी ही आता एका साध्वीचे जीवन जगत आहे. विकी गोस्वामी याच्यासोबत ड्रग रॅकेट चालवत असल्याचा आरोप असलेल्या ममता कुलकर्णीने आपण सीतेप्रमाणे पवित्र असल्याचे म्हटले आहे. एका मुलाखतीत तिने विकीसोबत राहून आपण संपूर्ण जग फिरल्याचे म्हटले. आता ते केवळ मित्रमैत्रिण असून एकत्र राहत नसल्याचे तिने सांगितले. ती म्हणाली की, इथे बरेच काही सीता मातेप्रमाणे आहे. जेव्हा त्या रावणाच्या लंकेतून परतल्या तेव्हा अग्निपरिक्षा देऊनही त्यांच्यावर कोणीच विश्वास ठेवला नाही. केवळ रावणाच्या लंकेत राहिल्याने त्यांची प्रतिष्ठा गेली त्याचप्रमाणे माझीही प्रतिमा मलिन झाली आहे. जर त्यांच्यासोबत असे होऊ शकते मग मी तर मानव आहे. पोलिसांनी या प्रकरणास अहंकाराचा मुद्दा बनवल्याचा आरोप ममताने यावेळी केला. पोलीस या प्रकरणाने मिळणा-या प्रसिद्धीचा फायदा उचलत आहेत. पण त्यांना शेवटी काहीच मिळणार नाही. मुख्य साक्षीदार जय मुखी याने आपली साक्ष बदलली आहे. त्यामुळे मी निर्दोष आहे, असेही ती म्हणाली.
ममता कुलकर्णीने १९९५ साली भारत सोडल्यानंतर तपस्या करण्यास सुरुवात केली. ममताच्या म्हणण्यानुसार, मी १२ वर्षे तपस्या केली. महिन्याच्या अखेरपर्यंत मी काहीच खात नव्हते. केवळ को-या चहावर मी दिवस काढले. यामुळे माझ्या आईच्या मृत्युच्या धक्क्यातून सावरण्यास मला मदत झाली. माझ्या आईने सांगितल्यामुळे मी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते असा दावाही तिने केला. मिडे डेच्या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत तिने म्हटले की, मला बॉलीवूड सेलिब्रेटी बनायचे नव्हते त्यामुळे मी आश्रमात जाण्यास सुरुवात केली. मी अजूनही तपस्या करते. बॉलीवूड चित्रपटांमधून मी ब-यापैकी पैसा कमवला होता. त्यामुळे मला पुन्हा काम करण्याची गरज लागणार नाही.