‘झी मराठी’ वाहिनीवरच्या विविध कार्यक्रमांतून भेटणारे कलाकार आणि प्रेक्षकांमध्ये एक खास नाते तयार झाले आहे. त्यातही काही ठराविक कलाकारांची लोकप्रियता पाहता हिंदी प्रमाणेच मराठी टेलिव्हिजन तारे-तारकांनाही रसिक प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. ‘झी’च्या कोणत्याही पुरस्कार सोहळ्यासाठी कलाकारांसोबतच प्रेक्षकांमध्येही कमालीची उत्सुकता असते. रविवारी प्रेक्षकांनी सुट्टीसोबतच आनंद घेतला तो नुकत्याच पार पडलेल्या ‘झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स’सोहळ्याचा.
या कार्यक्रमादरम्यान ‘कल आज और कल’ या थीम नुसार जुन्या-नव्या गीतांवर मानसी नाईक, वैभव तत्त्ववादी, पूजा सावंत यांनी सादर केलेले नृत्य मानसी नाईकचा ‘ग्लॅम डान्स’ या सोहळ्यातील खास आकर्षण ठरला. सागर कारंडे, प्रियदर्शन जाधव, भूषण कडू, कुशल बद्रिके, विनीत भोंडे आदी कलाकारंच्या ‘सैराट २’ प्रहसनाने सोहळ्यात चांगलीच रंगत आणली. संतोष पवार, विशाखा सुभेदार, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके यांनी सादर केलेल्या ‘बाजीराव – मस्तानी’ या प्रहसनानेही हास्याचा चांगलाच बार उडवून दिला होता. पण या साऱ्यात बऱ्याच रसिकांच्या मनावर छाप पाडली ती मानसी नाईकने साकारलेल्या ‘पिके’ची. चित्रपटात साकारलेल्या आमीरच्या भूमिकेप्रमाणेच मानसीनेही हे पात्र रंगमंचावर चांगलेच निभावले. हा सोहळा टेलिव्हिजनवर प्रदर्शित झाल्यानंतर ज्यांना काही कारणास्तव हा कार्यक्रम पाहता आला नाही, त्यांच्यासाठी मानसी नाईकने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन ‘पिके’ अवतारातील तिचा फोटो आणि तिने साकारलेल्या ‘पिके’च्या व्हिडिओची एक झलक शेअर केली आहे. तिने शेअर केलेला हा मराठमोळा ‘पिके’ सध्या बराच गाजतो आहे. अनेक कलाकारांच्या उपस्थितीत रसिकांसाठी प्रदर्शित झालेल्या ‘झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स’ची रंगत विविध कलाविष्कारांमुळे आणखीनच वाढली होती.