४ ते ७ ऑगस्टदरम्यान खास प्रयोग
मराठी वाद्यवृंदाच्या इतिहासात एक वेगळा प्रयोग म्हणून रसिकमान्यता आणि लोकप्रियता मिळालेल्या ‘मंगलगाणी दंगलगाणी’ या कार्यक्रमाचे यंदा ३० वे वर्ष आहे. ७ ऑगस्ट १९८७ मध्ये ‘मंगलगाणी दंगलगाणी’चा पहिला प्रयोग शिवाजी मंदिर येथे झाला होता. संत ज्ञानेश्वर यांच्या पसायदानापासून ते पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेल्या ‘कसाईदाना’पर्यंतचा मराठी गाणी, संगीत व संस्कृतीचा संगीतमय इतिहास सादर करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे आत्तापर्यंत १ हजार ९०० प्रयोग झाले असून येत्या ४ ते ७ ऑगस्ट या कालावधीत मुंबई व ठाणे परिसरात या कार्यक्रमाचे खास प्रयोग आयोजित करण्यात आले आहेत.
अभंग, वामन पंडित, मोरोपंत यांचे काव्य, शाहिरी काव्य, पोवाडे, लावणी, गवळण, नाटय़संगीत, भावसंगीत, सुगमसंगीत, चित्रपट गीते असा महाराष्ट्राचा सांगीतिक ठेवा या कार्यक्रमातून उलगडला गेला. नृत्य, नाटय़, चित्रफीत, गाणी आणि संगीत या सगळ्याचा एकत्र मिलाफ या वाद्यवृंदात करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ‘मंगलगाणी दंगलगाणी’चे प्रयोग झालेच, पण लंडन, शिकागो, लॉस एंजलिस येथेही प्रयोग झाले. कारागृहात, बाबा आमटे यांच्या आनंदवनमध्ये किंवा ठाण्याच्या मनोरुग्णालयातही कार्यक्रम सादर झाला. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी या कार्यक्रमास आपली हजेरी लावली आहे.
येत्या ४ ते ७ ऑगस्ट या कालावधीत मुंबई व ठाणे परिसरात ‘मंगलगाणी दंगलगाणी’चे खास प्रयोग आयोजित करण्यात आले आहेत. याची सुरुवात ४ ऑगस्ट रोजी वाशी येथील विष्णुदास भावे नाटय़गृहापासून होणार आहे. अन्य प्रयोग प्रबोधनकार ठाकरे, बोरिवली (५ ऑगस्ट), शिवाजी मंदिर, दादर (६ ऑगस्ट) आणि गडकरी रंगायतन (७ ऑगस्ट) या नाटय़गृहात होणार आहेत.
‘मंगलगाणी दंगलगाणी’सह ‘चौरंग’निर्मित वरील सर्व कार्यक्रमांची निर्मिती, संकल्पना आणि दिग्दर्शन अशोक हांडे यांचे आहे.