मनिषा कोईराला… हिंदी सिनेसृष्टीतला एक सुंदर चेहरा. नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या मोजक्या अभिनेत्रींपैकी एक. म्हणूनच अनेक दिग्दर्शक तिला आपल्या सिनेमात घेताना मेकअपशिवाय घेणं अधिक पसंत करायचे. पण मनिषाला मेकअप करणं फार आवडायचं म्हणून ती लपून मेकअपही करायची.

एका मुलाखतीत मनिषाने सांगितले की, मेकअपशिवाय केलेल्या सिनेमांमध्ये ‘बॉम्बे’ हा सिनेमा आहे. या सिनेमात तिने जराही मेकअप केला नव्हता. या पूर्ण सिनेमात मणिरत्नम यांनी तिला जराही मेकअप न करण्याची तंबी दिली होती. तरीही ती हळूच जाऊन मेकअप करून यायची. पण मणिरत्नम यांना कळल्यावर ते तिला चेहरा धुवून यायला सांगायचे. त्यांना या सिनेमात जराही मेकअप नको होता. ‘बॉम्बे’ सिनेमातील ‘केहना ही क्या…’ या गाण्यामध्ये तिला मेकअप करण्याची सुट मिळाली होती. बाकी संपूर्ण सिनेमात तिला मेकअपशिवायच राहावे लागले होते. एवढेच नाही तर ‘दिल से’ या सिनेमात दिग्दर्शकाने तिला मेकअप न करण्याचे सांगितले होते.

‘बॉम्बे’ सिनेमाची खास गोष्ट ही होती की, या सिनेमातले जास्तीत जास्त शॉट हे क्लोजअप होते. तरीही तिला मेकअप करण्याची परवानगी दिली नव्हती. पण तरीही मनिषाने यावर कधी राग व्यक्त केला नाही. लवकरच मनिषा मोठ्या पडद्यावर पुनरागमन करायला सज्ज झाली आहे. तिचा आगामी ‘माया’ हा सिनेमा २ जूनला प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. या ट्रेलरमधला तिचा अभिनय पाहून मनिषा एवढी वर्षे सिनेसृष्टीपासून लांब होती, यावर विश्वास बसणार नाही.

मनिषा सिनेमात ‘माया’ नावाची व्यक्तिरेखा साकारताना दिसते. जी २० वर्षे एका घरात एकटी राहत असते. ती कधीच बाहेर पडत नाही. पण, शाळेत शिकणाऱ्या दोन मुली मायाबद्दल जाणून घेण्यास उत्सुक असतात. मायाने घरातून निघून बाहेरच जग पाहावं अशी त्यांची इच्छा असते. यासाठी त्या एक शक्कलही लढवतात.

या मुली एका मुलाच्या नावाने मायाला खोटी प्रेमपत्र पाठवतात. मायाही त्या पत्रांवर विश्वास ठेवते. अचानक आयुष्यात आलेल्या या वळणामुळे मायाही सुखावून जाते. मात्र एक दिवस माया आपल्या प्रियकराला शोधण्यासाठी घरातलं सगळं सामान विकून दिल्लीला निघून जाते. पण दिल्लीला गेल्यावर मायासोबत काय होतं? हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात उपस्थित करून ट्रेलर संपतो.