अभिनेता मनोज बाजपेयी याच्यामते, दिवंगत अभिनेते ओम पुरी यांच्यावर जर सिनेमा बनवला गेला तर त्यासाठी त्याच्याशिवाय उत्तम अभिनेता दुसरा कोणीच असू शकणार नाही. ओम पुरी यांच्या प्रार्थना सभेत ते श्रद्धांजली द्यायला गेले होते. ६ जानेवारीला ओम पुरी यांचे निधन झाले होते.
मनोज म्हणाला की, मला वाटते की ओम यांच्या जीवनावर जर सिनेमा बनवला गेला तर त्याच्याशिवाय ओम पुरी यांची व्यक्तिरेखा कोणीच साकारु शकत नाही. मी त्यांच्या प्रार्थना सभेत आलो आहे, तरीही हसत आहे. कारण जर तुम्ही त्यांना आठवत आहात तर तुम्ही दुःखी राहूच शकत नाही. ते फार आनंदी स्वभावाचे होते. मला त्यांची नेहमीच आनंदाने आठवण येईल.

नेहमीच वैविध्यपूर्ण व्यक्तिरेखा साकारण्यासाठी ओळखला जाणारा अभिनेता अशी मनोज बाजपेयी याची ओळख आहे. ओम पुरी यांचा आक्रोश हा सिनेमा बघून मनोजने ठरवले होते की त्यालाही तशाच पद्धतीने काम करायचे आहे. ओम पुरी यांनी लहान शहरातल्या मुलांनाही स्वप्न बघण्यासाठी नेहमीच प्रोत्साहीत केले असल्याचे मनोजने यावेळी म्हटले.

तो पुढे म्हणाला की, ‘पुरी हे नेहमीच सगळ्यांसोबत समान वागायचे. त्यांनी माझा ‘अलिगढ’ हा सिनेमा पाहिला नव्हता. पण ते नेहमीच ‘अलिगढ’ आणि ‘बुधिया सिंग’ या सिनेमाबद्दल प्रत्येकाशी चर्चा करायचे. लोक म्हणतात की, जर तुम्हाला एक चांगला अभिनेता बनायचे असेल तर त्याआधी तुम्हाला एक चांगला माणूस बनणे आवश्यक आहे. पण जेव्हा ही माझा या वाक्यावरचा विश्वास उठायचा तेव्हा मी ओम पुरी यांना भेटायचो आणि माझा या वाक्यावरचा विश्वास परत यायचा.’