नुकत्याच पार पडलेल्या ‘वर्ल्ड म्युझिक डे’ला बऱ्याच कलाकारांनी गाणं आणि एकंदर संगीताप्रती असणारी त्यांची निष्ठा काही फोटो, व्हिडिओ पोस्ट करुन व्यक्त केली. यामध्ये मराठी कलाकारही मागे नव्हते. पण, अभिनेता सिद्धार्थ जाधवने पोस्ट केलेल्या व्हिडिओनेच अनेकांचं लक्ष वेधलं. सिद्धार्थने त्याच्या मुलीसोबत म्हणजेच इरा जाधवसोबतचा एक सुरेख व्हिडिओ पोस्ट केला.

या व्हिडिओमध्ये त्याने #worldmusicday असं लिहित ‘पडोसन’ या अफलातून चित्रपटातील एक दृश्य रिक्रिएट केलं आहे असं म्हणायला हरकत नाही. आपल्या अतरंगी बाबांच्या या धमाल व्हिडिओमध्ये सिद्धार्थची लेक इराही फार उत्साहाने सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे. ‘आज “पडोसन” या सिनेमाची आठवण झाली..’, असं म्हणत किशोर कुमार त्यांच्या शिष्याला म्हणजेच सुनिल दत्त यांना ‘सा रे ग म’ शिकवतात त्या दृश्याची पुनरावृत्ती केल्याचं पाहायला मिळत आहे.

पाहा : प्रशांत दामलेंच्या गोंडस नातीचे फोटो

‘भोले… साssss’, असं म्हणत सिद्धार्थ त्याच्या लेकीला सा रे ग म गायला शिकवत आहे. पण, इराने त्याची उलटीच शाळा लावली असून ती अगदी नव्या अंदाजात तिची गायनशैली आपल्या बाबांसमोर सादर करत आहे. तिचा हा अंदाज पाहता सिद्धार्थला टक्कर देण्यासाठी त्याची लेकही सज्ज आहे असं म्हणायला हरकत नाही. अशी ही बाप- लेकीची मजा दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावरही चर्चेत आला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केल्या असून तो बऱ्याचजणांनी शेअरही केला आहे. तुम्ही पाहिला का सिद्धार्थ आणि त्याच्या मुलीचा हा व्हिडिओ?

वाचा : आपल्यापेक्षा वयाने मोठ्या अभिनेत्रीला डेट करतोय हा स्टार किड