काळ बदलला तसा माणूस बदलला. जुने फोन जाऊन आता प्रत्येकाकडे अत्याधुनिक फोन आले. सध्या सेल्फीचे वेड सगळ्यांनाच लागले आहे. सेल्फी हा प्रत्येकाच्या जिव्हाळयाचा विषय आहे. कुठे ही जाऊ सेल्फी काढू हे प्रत्येकाचे ध्येयच बनले आहे. लहान मुलांपासून ते मोठयांपर्यत प्रत्येकालाच या सेल्फीने वेड लागले आहे.

पण हे सेल्फीचे प्रेम फक्त सर्वसामान्यांमध्येच दिसून येते असे नाही, तर या सेल्फीच्या प्रेमात मराठी सिनेसृष्टीही आहे. नेहमीच कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमात, घरी किंवा काम करतानाही हे कलाकार आपले सेल्फी काढत असतात आणि सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांच्या या फोटोंना चाहते भरभरुन लाइक्स आणि कमेन्टही देतातच.

आता हेच पाहा ना, आपल्या मराठी सिनेसृष्टीतल्या कलाकारांना अभिनेत्री श्रुती मराठेच्या लग्नातही सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. यावेळी अभिनेत्री हेमांगी कवीने श्रुती आणि गौरवसोबत एक झक्कास सेल्फी काढला आहे. या सेल्फीमध्ये अभिजीत खांडकेकर, अमृता खानविलकर, नेहा पेंडसे, भार्गवी चिरमुले, सोनाली खरे, संस्कृती बालगुडे या कलाकारदेखील उत्साहाना सहभागी झाले. मग काय एकाच फोटोमध्ये नावाजलेले मराठी कलाकार पाहायला कोणाला आवडणार नाही. हेमांगीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे.

४ डिसेंबरला अभिनेत्री श्रुती मराठे ही अभिनेता गौरव घाटणेकर याच्यासोबत विवाह बंधनात अडकली. या दोघांच्या लग्नाला मराठी तारकांनी हजेरी लावून या विवाह सोहळयाला चार चाँद लावले होते. त्याचप्रमाणे मराठी तारकांनी श्रुती आणि गौरवला लग्नाच्या भरभरून शुभेच्छादेखील सोशल मीडियावर दिलेले पाहायला मिळाले. श्रुती आणि गौरवने तीन वर्षापूर्वी ‘तुझी माझी लव्हस्टोरी’ हा चित्रपट केला होता. या चित्रपटा दरम्यानच यांच्यात मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. या तीन वर्षाच्या प्रेमसंबंधांनंतर अखेर ही जोडी विवाहबंधनात अडकली.

श्रुती ही ‘राधा ही बावरी’ या मालिकेमुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे. तर गौरवदेखील ‘तुजविन सख्या रे’ या मालिकेनंतर प्रेक्षकांचा लाडका बनला. तसेच श्रुतीचे नुकतेच बॉलिवूडमध्ये पदापर्ण झाले आहे. तिने ‘बुधिया सिंग बॉर्न टू रन’ हा सिनेमा केला आहे. या सिनेमात तिच्यासोबत बॉलिवूडचा तगडा कलाकार मनोज बाजपाई पाहायला मिळाला. नुकतेच अभिनेत्री मृण्मयी देशपांडे पाठोपाठ श्रुतीदेखील विवाहबंधनात अडकली आहे. त्यामुळे सध्या मराठी सिनेसृष्टीमध्ये सनई चौघडे वाजण्यास सुरूवात झाली आहे असे म्हणण्यास हरकत नाही.