हिंदी चित्रपटसृष्टीत केवळ देखणा चेहरा असून भागत नाही. कधी कधी सोलो हिरो म्हणून आघाडी घेण्याआधी अनेक वळणा-वळणांचा प्रवास करावा लागतो. जो प्रवास अभिनेता विनोद खन्ना यांच्या वाटय़ालाही आला होता. सुरुवातीच्या काळात इतका सुंदर आणि निरागस चेहरा असलेल्या या अभिनेत्याला खलनायकी भूमिका कराव्या लागल्या. मात्र सुरुवातीचे मोजके चित्रपट सोडले तर अगदी कमी वेळात आपल्या अभिनयाच्या जोरावर विनोद खन्ना यांनी ‘हिरो’ म्हणून आपली छाप पाडली. आणि मग मात्र त्यांनी मागे वळून पाहिले नाही. मुळात सत्तर आणि ऐंशीच्या दशकात हिंदी चित्रपटांमध्ये मल्टिस्टारर चित्रपटांचा ट्रेंड आला होता. एका चित्रपटात तीन-तीन नायक त्यामुळे या नायकांच्या गर्दीतही ‘हिरो’ म्हणून आपले नाणे खणखणीत वाजवणे त्या वेळी ज्यांना जमले त्यात विनोद खन्ना हे नाव रसिकांच्या कायम स्मरणात राहील..

पेशावरच्या श्रीमंत घरात १९४६ साली जन्म झालेल्या विनोद खन्ना यांचे कुटुंब फाळणीनंतर मुंबईत स्थायिक झाले. ते लहानाचे मोठे मुंबईतच झाले, त्यामुळे त्यांचे प्रारंभीचे शिक्षण मुंबईतलेच असले तरी त्यानंतर काही काळ दिल्ली आणि मग पुन्हा मुंबईत असा त्यांच्या कुटुंबाचा प्रवास झाला. शिक्षण सुरू असतानाच त्यांना चित्रपटांचा ध्यास लागला होता. ‘मुघल-ए-आझम’सारखा चित्रपट पाहून अभिनय क्षेत्राकडे ओढल्या गेलेल्या या देखण्या नायकाच्या पदरी १९६८ साली पहिली भूमिका पडली ती खलनायकाची.. ‘मन का मीत’ हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट ज्यात त्यांनी खलनायकी भूमिका केली. त्यानंतर ‘पूरब और पश्चिम’, ‘सच्चा झूठा’, ‘आन मिलो सजना’, ‘मस्ताना’, ‘मेरा गाव मेरा देश’, ‘ऐलान’ अशा ओळीने सुरुवातीच्या चित्रपटांमधून त्यांनी नकारी व्यक्तिरेखा साकारल्या. पण याही चित्रपटांमधून त्यांचा चेहरा लोकांच्या लक्षात राहिला हे विशेष. सोलो हिरो म्हणून भूमिका मिळायला त्यांना १९७१ साल उजाडावे लागले. ‘हम तुम और वो’ हा त्यांचा सोलो हिरो म्हणून पहिला चित्रपट. त्यानंतर मग गुलजार यांनी दिग्दर्शित केलेला ‘मेरे अपने’ मल्टी हिरो चित्रपट त्यांच्या वाटय़ाला आला. त्यानंतर गुलजार यांच्याच ‘अचानक’ चित्रपटातील त्यांच्या कामाचे कौतुक झाले. नंतर मग लागोपाठ त्यांनी सोलो हिरो म्हणून ‘फरेबी’, ‘हत्यारा’, ‘आप की खातिर’, ‘राजमहल’ असे किती तरी चित्रपट केले. मात्र आजही विनोद खन्ना यांचे नाव घेतले की ‘द बर्निग ट्रेन’, ‘इम्तिहान’, ‘कुर्बान’, ‘दयावान’ असे चित्रपट जसे झर्रकन डोळ्यांसमोर येतात तसेच त्यांचे गाजलेले मल्टि हिरो चित्रपट हटकून आठवतात.

Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
actor akshay kumar talk about movie bade miyan chote miyan
‘अपयशाने खचत नाही’
Narayani Shastri family
पाच बहिणी अन् एक भाऊ, आई महाराष्ट्रीय तर वडील…; प्रसिद्ध अभिनेत्रीने कुटुंबाबद्दल दिली माहिती
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट

आपल्या कारकिर्दीत विनोद खन्ना यांनी ४७ मल्टि हिरो चित्रपटांमधून काम केले. ज्यात ‘हेरा फेरी’, ‘अमर अकबर अँथनी’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘हाथ की सफाई’, ‘खून पसीना’, ‘इन्सान’, ‘परिचय’, ‘एक हसीना दो दिवाने’ अशा अनेक चित्रपटांमधून विनोद खन्ना यांनी स्वत:चा ठसा उमटवला होता. अमिताभ बच्चन यांच्याच शब्दांत सांगायचे तर त्या काळी त्यांनी विनोद खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, धर्मेद्र यांच्याबरोबर सातत्याने एकत्रित चित्रपट केले होते. त्यामुळे सहकलाकारापेक्षाही त्यांच्यात मैत्रीचे नाते अधिक दृढ होते.

‘ओशो’भक्ती आणि चित्रपट संन्यास

विनोद खन्ना यांचे वैयक्तिक आयुष्यही अनेक घडामोडींनी भरलेले असेच होते. १९७१ साली त्यांचा गीतांजली यांच्याशी विवाह झाला. अक्षय आणि राहुल ही त्यांची पहिल्या पत्नीपासून झालेली मुले आहेत. मात्र आपली चित्रपट कारकीर्द उत्तम सुरू असतानाच विनोद खन्ना यांना ओशो यांच्या आध्यात्मिक विचारसरणीकडे ओढले गेले. १९८२ साली त्यांनी चित्रपट संन्यास घेतला आणि कुटुंबालाही सोडून ते रजनीश यांच्या आश्रमात दाखल झाले. पाच वर्षे ते कुटुंबापासून दूर होते. त्याच काळात त्यांच्या पहिल्या पत्नीने त्यांना घटस्फोट दिला.

१९८७ मध्ये ते पुन्हा चित्रपटसृष्टीत परतले. त्यांनी डिम्पल कपाडियाबरोबर ‘इन्साफ’ या चित्रपटात काम केले. पुनरागमनानंतरही त्यांची कारकीर्द बहरली. या काळात त्यांनी ‘जुर्म’, ‘हमशकल’, ‘इन्सानियत के देवता’, ‘एक्का राजा रानी’, ‘इना मीना डीका’, ‘परंपरा’ अशा चित्रपटांतून काम केले. १९९० साली त्यांनी दुसरा विवाह केला. १९९७ साली त्यांनी आपल्या मुलाला अक्षय खन्नाला बॉलीवूडमध्ये आणण्यासाठी ‘हिमालयपुत्र’ या चित्रपटाची निर्मिती केली. आत्ताच्या काळातही ‘वाँटेड’, ‘दबंग’, ‘रेड अलर्ट : द वॉर विदिन’ या अनंत महादेवन दिग्दर्शित चित्रपटांमधून काम केले होते. रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘दिलवाले’ हा त्यांचा प्रदर्शित झालेला शेवटचा चित्रपट. चित्रपटाबरोबरच राजकारणातही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि ते यशस्वीही ठरले. १९९७ साली त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आणि ते पंजाबमधील गुरुदासपूर मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. खासदार ते केंद्रीय मंत्री असा प्रवास करणाऱ्या विनोद खन्ना शेवटपर्यंत गुरुदासपूर मतदारसंघातून खासदार म्हणून कार्यरत होते.

श्रद्धांजली

  • आशा भोसले- विनोद खन्ना हे एक माणूस म्हणूनही खूप मोठे होते. शेवटपर्यंत ते ‘स्टार’ म्हणूनच जगले.
  • धर्मेद्र- विनोद खन्ना गेला यावर माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. माझ्या खूप जवळचा माणूस कायमचा निघून गेला आहे.
  • शत्रुघ्न सिन्हा- विनोद खन्ना हे खरोखरच ‘मेरे अपने’ होते. हिंदी चित्रपटसृष्टीने देखणा आणि सर्वगुणसंपन्न अभिनेता गमावला आहे.
  • अक्षयकुमार- विनोद खन्ना यांच्या निधनाने एका युगाचा शेवट झाला आहे.
  • सुभाष घई- विनोद खन्ना हे पडद्यावर आणि पडद्याबाहेरही नेहमीच प्रसन्न आणि देखणे व्यक्तिमत्त्व होते. ते माझ्या कायम स्मरणात राहतील.
  • रजनीकांत- ‘माझ्या प्रिय मित्रा, तू नेहमीच स्मरणात राहशील’.
  • ऋषी कपूर- ‘अमर’ तुझी आठवण कायमच येत राहील.
  • करण जोहर- विनोद खन्ना हे प्रेरणा देणारे मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा रुपेरी पडद्यावरचा वावर अतुलनीय असाच होता.
  • वरुण धवन- हिंदी चित्रपटसृष्टी आज एका दिग्गज अभिनेत्याला मुकली आहे.
  • देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री)- विनोद खन्ना यांनी नायक, खलनायक, सहअभिनेता ते चरित्र अभिनेता अशा विविधांगी भूमिका साकारल्या आणि त्या सर्व भूमिकांवर आपला स्वतंत्र ठसा उमटविला. ‘भाजप’चे खासदार आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी राज्यमंत्री म्हणूनही काम केले. सामाजिक आणि राजकीय क्षेत्राची उत्तम जाण असलेल्या कलावंताला आपण मुकलो आहोत.
  • विनोद तावडे (सांस्कृतिक कार्यमंत्री)- विविधांगी भूमिकांमुळे हिंदी चित्रपटसृष्टी समृद्ध करण्यात मोठे योगदान देणारे तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविणारे व्यक्तिमत्त्व हरपले आहे.