‘चौदा विद्या आणि चौसष्ठ कलां’चा अधिपती असलेल्या गणेशाचा उत्सव मोठय़ा उत्साहात सुरू झाला आहे. सर्वसामान्यांप्रमाणे सेलिब्रेटी मराठी कलाकारांच्या घरीही गणपतीचे आगमन होत असते. तर काहीजणांकडे गणपती येत नसला तरी हे कलाकार उत्साहाने गणेशोत्सवात सहभागी होत असतात. गणेशोत्सवानिमित्ताने काही कलाकारांनी जागवलेल्या या आठवणी..

Relief for flood affected Chirner due to works started before monsoon
पावसाळ्यापूर्वी सुरू झालेल्या कामांमुळे पूरग्रस्त चिरनेरला दिलासा?
Ambabai Devis darshan will be restored from Tuesday conservation process of the idol is complete
अंबाबाईचे मंगळवारपासून दर्शन होणार पूर्ववत; मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पूर्ण
heart attack in the swimming pool
धक्कादायक! ‘स्विमिंग पूल’मध्येच हृदयविकाराचा झटका
Navi Mumbai, Gudipadwa
कडक उन्हात कडक उत्साह.. उन्हाची पर्वा न करता जोशात उत्साहात निघाली गुढीपाडवा स्वागत शोभायात्रा

आरास, आरत्या आणि बरेच काही

माझ्या गणपतीच्या आठवणी या लहानपणाच्या आहेत. आमच्या घरी गणपती यायचा, पण तो आमच्या घरचा नव्हे, तर इमारतीमधील आम्हा लहान मुलांचा म्हणून आणला जायचा.  माझे आई-बाबा, भाऊ यांनाही या सगळ्याची आवड असल्याने तेही आम्हा सगळ्या मुलांबरोबर उत्साहाने सहभागी व्हायचे. पाचसहा वर्षे आम्ही हा गणपती आणत होतो. गणपतीसाठी आम्ही मुले आरास, सजावट करायचो. तेव्हा ‘पर्यावरण पूरक’ वगैरे अशी काही संकल्पना डोक्यात नसली तरी आमची सर्व आरास, सजावट ही थर्माकोलशिवाय केलेली असायची. आमच्या घरी पूर्वापार चालत आलेला संगमरवरी मांडव (मांडणी) होता. गणपतीची प्रतिष्ठापना त्यात केली जायची आणि त्याच्या भोवताली फुले, हिरव्या वेली व अन्य सजावट आम्ही करायचो. आम्ही आणत असलेला गणपती हा मुलांसाठी असलेला व हौसेचा होता. त्यामुळे काही वर्षांनी तो आणणे बंद झाले. गणपतीसाठी कापसाची वस्त्रे तयार करण्याचे कामही मला आवडायचे. गणपतीसमोर केलेली सुवासिक फुलांची आरास, उदबत्त्या आणि धुपाचा तो सुगंध अजूनही मनात दरवळतो आहे. थाळी, वाटय़ा घेऊन आम्ही आरत्या म्हणायचो. एकंदरीतच लहाणपणीच्या गणपतीच्या त्या आठवणी खूप आनंददायी आहेत. गणपती विसर्जनाच्या वेळी आम्हा लहान मुलांना रडू यायचे. ‘गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला’ अशी आमची अवस्था व्हायची.

मुक्ता बर्वे, ‘रुद्रम’, झी युवा

गणेशोत्सवाशी खास नाते

गणपती उत्सवाच्या काळात माझ्यासाठी काहीतरी वेगळे, चांगले आणि आनंददायी घडते. त्यामुळे गणेशोत्सव आणि माझे असे एक खास नाते आहे. माझी पहिली मालिका ‘स्वप्नांच्या पलीकडले’ ऑगस्ट महिन्यात सुरू झाली. त्यानंतर ‘नांदा सौख्यभरे’ ही मालिका जुलै महिन्यात आणि आता सध्या सुरू असलेली ‘घाडगे अ‍ॅण्ड सन्स’. माझा पहिला चित्रपटही गणपतीच्या सुमारासच प्रदर्शित झाला होता. माझी काहीतरी नवीन सुरुवात या काळात होत असते. या सर्व घडामोडी गणपती उत्सवाच्या काळातच घडल्याने गणेशोत्सवाशी माझे वेगळे नाते आहे. नाशिकला आमच्या आई-बाबांच्या घरी गणपती असतो. व्यवसाय व नोकरीच्या निमित्ताने मी ठाण्यात आणि माझा भाऊ पुण्यात असतो. पण गणपतीसाठी मी व माझी बायको आणि भाऊ व त्याची बायको सर्व जण दरवर्षी आवर्जून घरी जातो.  माझ्यासाठी गणपती हा देवापेक्षाही जास्त करून जवळचा मित्र आहे. गणपती आपण कोणत्याही आकारात पाहू शकतो किंवा आपल्याला  दिसू शकतो. निसर्गातल्या कोणत्याही आकारात, वस्तूत देव पाहा असा विचार या मागे आहे असे वाटते. सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत गणपतीनिमित्ताने का होईना सर्व कुटुंब व सदस्य एकत्र येतात. नात्यांमधील वीण या उत्सवाच्या निमित्ताने अधिक घट्ट होते.

चिन्मय उदगीरकर,  ‘घाडगे अ‍ॅण्ड सून’

कलाप्रवासाची सुरुवात गणेशोत्सवातून

आमच्या घरी गणपती येत नसल्याने गणेशोत्सवाच्या काळात मित्र-मैत्रिणी, परिचित व नातेवाईकांकडे जाणे होते. आता कामाच्या व्यग्रतेतून फारसा वेळ मिळत नाही. पण जमेल तसा वेळ काढून काही घरी आजही गणपतीला आवर्जून जाते. आम्ही राहायचो त्या ठिकाणी तसेच आमच्या शाळेच्या गणेशोत्सवात माझा सहभाग असायचा. गणेशोत्सवाच्या निमित्ताने होणाऱ्या विविध कार्यक्रम, स्पर्धा यांमधूनही मी भाग घ्यायचे. पुढील कलाप्रवासाचा पाया गणेशोत्सवाच्या त्या कार्यक्रमातूनच घातला गेला. आमच्या घरी गणपती येत नाही. तो यावा असे मला नेहमी वाटायचे. एका वर्षी माझ्या एका मित्राने मला गणपतीच्या काही दिवस अगोदर गणपतीची एक छोटी मूर्ती भेट दिली होती. मी माझे पुस्तकांचे कपाट छानपैकी आवरून एका खणात ती मूर्ती त्या वर्षी ठेवली. ती मूर्ती परंपरेचा भाग नसल्याने मूर्तीचे विसर्जन करायचे नव्हते. त्यामुळे तो गणपती आमच्या घरी आता कायमचा विराजमान झाला. त्याचा खूप आनंद आहे. काही सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी त्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी होते. अनेक तास लोक श्रद्धेने रांगेत उभे राहतात. मात्र प्रत्यक्ष मूर्तीच्या जवळ गेल्यानंतर त्यांना शांतपणे पाच मिनिटेही तिथे उभे राहता येत नाही. अक्षरश: काही सेकंदात त्यांना तेथून बाजूला केले जाते. त्या प्रचंड गर्दीत मुली-महिला यांना काही वाईट अनुभवालाही सामोरे जावे लागते. ते मनाला पटत नाही. त्यामुळे अशा सार्वजनिक ठिकाणी जाऊनच गणपतीचे दर्शन घेतले तर तुम्ही श्रद्धाळू किंवा अमुक गणपतीचे त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेतले तरच तो तुम्हाला पावतो, असा जो काही गैरसमज आहे तो चुकीचा आहे. त्यापेक्षा तुम्ही घरातील गणपतीची मूर्ती किंवा तसबिरीपुढे शांत बसून गणपतीचे नामस्मरण केले तर त्यामुळे मनाला अधिक आनंद व शांतता मिळेल.

सुरुची आडारकर, ‘अंजली’, झी युवा.

माझ्यासाठी खास..

माझा वाढदिवस गणेशोत्सवाच्या कालावधीत येत असल्याने दरवर्षीच गणेशोत्सव माझ्यासाठी खास असतो. पूर्वी आमच्या घरी गौरी व गणपती असायचे. आता दीड दिवसांचा गणपती घरी येतो. आमचा हा गणपती फिरता असतो. यंदा माझ्या सर्वात धाकटय़ा काकांच्या घरी गणपती येणार आहेत. ज्या घरी गणपती असेल तिथे आम्ही सर्व कुटुंबीय एकत्र असतो. त्यामुळे आम्हा सर्व कुटुंबीयांसाठी गणपती म्हणजे धमाल, मजा असते. आम्ही सर्व चुलत व आत्तेभावंडे एकत्र जमून खूप मजा करतो. रात्री जागून गप्पा, गाण्यांच्या भेंडय़ा, पत्ते खेळणे आदी आमचा ठरलेला कार्यक्रम असतो. मालिकांमुळे आता प्रसिद्धी मिळाली असली तरी माझे आई-बाबा आणि कुटुंबातील सर्वामुळे माझे पाय अद्यापही जमिनीवरच आहेत. गणपतीसाठी काका-काकू यांचे परिचित, चुलत भावंडांचे मित्र-मैत्रिणी घरी येत असतात. मालिकांमधील प्रसिद्धीमुळे ते आता माझ्याकडे ‘सेलिब्रेटी’ म्हणून पाहतात. तुमची पुतणी, किंवा तुझी बहीण प्रसिद्ध आहे, असे माझ्या काका-काकूंना किंवा भावंडांना त्यांच्याकडून सांगितले जाते. त्याचा आनंद वाटतो.

ऋता दुर्गुळे, ‘फुलपाखरू’, झी युवा

बाबांच्या खांद्यावर बसून दर्शन

कामानिमित्ताने मी गेल्या सात-आठ वर्षांपासून मुंबईत असलो तरी दरवर्षी गणपतीला आमच्या पुण्याच्या घरी जातोच. आई, बाबा व धाकटा भाऊ पुण्यात असतात.  लहान असताना एके वर्षी आम्ही सार्वजनिक गणपती आणि आरास पाहायला बाबांबरोबर बाहेर पडलो होतो. दगडूशेट हलवाई गणपतीसह पुण्यातील मानाच्या सर्व गणपतींचे दर्शन आम्ही घेतले. तेव्हाची खास आठवण म्हणजे लहान असल्याने त्या गर्दीत गणपतीची सजावट व देखावा काही नीट पाहता येत नव्हता. तेव्हा बाबांनी मला खांद्यावर उचलून घेतले आणि मी बाबांच्या खांद्यावर बसून दगडूशेट हलवाई व अन्य गणपतींचे दर्शन घेतले. आता यंदा माझ्या लहान मुलाला घेऊन त्यालाही तसेच गणपती दाखवायचा विचार आहे. म्हणजे एक वर्तुळ पूर्ण होईल. मोठे झाल्यानंतर मित्रांबरोबर अनेक तास रांगेत उभे राहून घेतलेले दगडूशेट गणपतीचे दर्शन आजही आठवते. आता ‘कलाकार’ म्हणून तिथे रांगेत उभे न राहता गणपतीची आरती करता येते, बाप्पाचे थेट दर्शन घेता येते, याचा आनंद आहे; पण त्याच वेळी मन खूप भरूनही येते. ही सर्व गणरायाचीच कृपा आहे. दगडूशेट हलवाई गणपतीवर माझी श्रद्धा आहे. अभिनयातील करिअरसाठी मी पुणे सोडून मुंबईला येण्याचा निर्णय घेतला तेव्हा याच गणपतीचे दर्शन घेऊन मी त्याचे आशीर्वाद घेतले होते.

विकास पाटील, ‘

लेक माझी लाडकी’, स्टार प्रवाह

गावाची आठवण..

कोकणात आमचे स्वत:चे घर आहे.आमचा गणपती दरवर्षी कोकणातील त्या घरी असतो. गणपतीनिमित्ताने माझे चार काका व चार आत्या असा सर्व परिवार एकत्र येतो. घरी अकरा दिवसांचे गणपती असतात. यंदाही चित्रीकरणातून चार दिवसांची सुट्टी घेऊन गावी जाणार आहे. मुंबईत आल्यानंतर गावाची आठवण आली की गणपतीची आणि पर्यायाने सर्व कुटुंबीयांनी एकत्र येऊन केलेली मजा आठवते. त्यामुळे गाव आणि गणपतीविषयी मनात एक अतूट असे नाते आहे.गणपतीनिमित्ताने गावच्या त्या घरी आम्ही सुमारे पन्नास जण एकत्र असतो. प्रत्येक जण आपापल्या कामात व्यग्र असल्याने नेहमी भेट होतेच असे नाही. पण गणपतीसाठी सर्व एकत्र आले की खूप गप्पा, धमाल आम्ही करतो. गेल्या वर्षी ‘सरस्वती’ मालिकेचे पहिले वर्ष असल्याने मी जाऊ शकले नव्हते. यंदाच्या वर्षी मात्र मी गावी जाणार आहे. आमच्या घरी रात्री भजनाचा कार्यक्रम असतो. त्यासाठी गावातील अनेक लोक घरी येतात. टाळ, मृदुंग, तबला, पेटी आणि झांजा यांसह रात्रभर गणपतीसमोर भजन सुरू असते.गणपतीच्या दिवसातील हा सगळा अनुभव माझ्यासाठी खूप खास असतो. त्यामुळे गणपती म्हटले की मला आमच्या कोकणातील घरातला गणपतीच आठवतो.

तितिक्षा तावडे, अभिनेत्री ‘सरस्वती’

कौटुंबिक स्नेहसंमेलन

लहानपणीच्या आठवणी खूप आहेत. गणपतीसाठी आम्ही सर्व कुटुंबीय एकत्र असतो. त्यामुळे गणपती म्हणजे आमच्या पाठक कुटुंबाचे कौटुंबिक स्नेहसंमेलन असते. गणपतीच्या निमित्ताने आम्ही सर्व चुलत भावंडे एकत्र जमून खूप मजा करायचो. नाशिकला आमच्या घरी गौरी-गणपती दोन्हीही असते. गणपतीत सर्व एकत्र असले की आरत्या म्हणताना मजा येतेच, पण रात्री गप्पा, गाण्यांच्या भेंडय़ा हा कार्यक्रम असतो. गणपती आणि उकडीचे मोदक हे अतूट नाते आहे. पहिल्यापासूनच आमच्या घरी गणपतीच्या दर्शनाला खूप जण येतात. त्यात आता एक फरक पडला आहे. म्हणजे आता लोक घरी आले की माझ्याबरोबर ‘सेल्फी’ काढून घेतात. यांचा मुलगा, यांचा पुतण्या किंवा याचा भाऊ आता या मालिकेत आहे म्हणून ते माझ्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहतात तेव्हा गंमत वाटते. मी मात्र अजूनही सगळ्यांसाठी पूर्वीचा तोच संकेत आहे.

संकेत पाठक, ‘दुहेरी’, स्टार प्रवाह

शब्दांकन-शेखर जोशी