महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. वर्षभर अभ्यास केल्यानंतर निकालाच्या दिवशी प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात एक प्रकारची भीती, उत्सुकता अशा संमिश्र भावना पाहायला मिळाल्या. अशाच भावनांचा काहूर माजलेल्या वातावरणातच यंदाचा दहावीचा निकाल लागला. काही विद्यार्थ्यांनी या निकालांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याचं पाहायला मिळालं तर काहीजणांचा हिरमोड झाला. यंदा अवघ्या महाराष्ट्राची लाडकी आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु हीसुद्धा दहावीच्या परीक्षेला बसली होती. रिंकूने परीक्षेत ‘फर्स्ट क्लास’ कामगिरी केली असून, तिला ६६ टक्के गुण मिळाले आहेत. रिंकूला मिळालेले गुण कळल्यानंतर आता ती पुढे कोणत्या कॉलेजमध्ये जाणार आणि कोणत्या शाखेची निवड करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

वाचा : आर्चीच्या दहावीच्या निकालाची प्रत सोशल मीडियावर व्हायरल

संपूर्ण महाराष्ट्राला याड लावणारी ही अभिनेत्री भावी आयुष्यात कोणत्या क्षेत्राची निवड करणार हे जाणून घेण्यासाठी ‘लोकसत्ता ऑनलाईन’ने रिंकूचे वडील महादेव राजगुरु यांच्याशी संवाद साधला. तेव्हा ते म्हणाले की, रिंकू तिचं शिक्षण पूर्ण करणार याबाबत शंका नाही. तिने पुढे कोणत्या कॉलेजात प्रवेश घ्यावा तसेच कोणत्या शाखेची निवड करावी याबद्दल सध्या आम्ही कुटुंबीय चर्चा करतोय. मी स्वतः शिक्षक असल्याने तिला त्यासाठी मार्गदर्शनही करतोय. रिंकू आता तिच्या मावशीकडे पुण्याला असल्यामुळे आमचं फोनवरच बोलणं सुरू आहे.

वाचा : दहावीच्या परीक्षेत ‘या’ अभिनेत्रीच्या बहिणीला मिळाले ९९ टक्के

रिंकूचे वडील स्वतः शिक्षक असल्यामुळे त्यांच्या मुलीने कोणत्या क्षेत्राची निवड करावी असे त्यांना वाटते, असा प्रश्न विचारला असता रिंकूला अभ्यासासाठी वेळ मिळाल्यावर ती कोणत्याही क्षेत्रात चांगलीच कामगिरी करून दाखवेल, असा दृढ विश्वास तिच्या वडिलांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की, तिने कोणत्या क्षेत्रात जावं हा सर्वस्वी तिचा निर्णय असेल. तिने मनोरंजन क्षेत्रात काम करावं असं आम्ही आधी काही ठरवलं नव्हतं. अचानक तिच्याकडे तशी संधी चालून आली आणि तिने त्याचं सोनं केलं. यापुढे ती शिक्षणाकडे लक्ष देईलच पण त्यासोबतच चित्रपटसृष्टीत तिचं काम सुरु राहिल.

रिंकूने कोणत्याही शाखेची निवड केली तरी ती कलाक्षेत्राप्रमाणे त्यातही यश संपादन करेल यात शंका नाही.

चैताली गुरव, chaitali.gurav@indianexpress.com