शांततेची दिवाळी- हृषीकेश जोशी
माझ्यासाठी दिवाळी हा दिपोस्तवाचा सण आहे.  मग त्यासाठी फटाके वाजवून उगाचच गाजावाजा करण्याची गरज नाही . दिव्यांची  आणि पणत्यांची आरास तसेच रांगोळी या सर्व गोष्टींमुळेच दिवाळीत खऱ्या अर्थाने रंग चढतो. मी कधीच फटाके वाजवत नाही. शांततेत सण साजरा करण्यावर मी अधिक भर देतो. माझी यंदाची दिवाळी अशीच शांततेत साजरी करण्याची ठरवली आहे. विकता का उत्तरच्या सेट वर दिवाळी सेलिब्रेशन करणार आहोत. त्यासाठी मी खूप उत्सुक देखील आहे. तुम्हा सगळ्यांना हॅप्पी दिवाळी….. कोणताही अपघात किंवा इजा न करून घेता दिवाळी साजरी करा.

‘सर्जिकल स्ट्राईक’ ने दिवाळीचा खऱ्या अर्थाने श्रीगणेशा झाला-  लीना भागवत
दिवाळी म्हटली की सगळीकडेच शुभ आणि प्रसन्न वातावरण असतं. पण यावर्षीच्या दिवाळीचा श्रीगणेशा आधीच झालाय तो पंतप्रधानांनी आपल्याला दिलेल्या सर्जिकल स्ट्राईक सारख्या महत्त्वाच्या भेटीमुळे. यावर्षी वरूण राजाने सुद्धा अपेक्षेपेक्षा अधिक हजेरी लावली. त्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांची दिवाळी यावर्षी आनंदात असेल. सध्या बरेच जण आरोग्याच्या बाबतीत, निसर्गाच्या बाबतीत जागरूक झालेले दिसून येतायत. म्हणूनच यंदाच्या दिवाळीचा शुभ श्री गिरवून झालाय अस म्हणायला हरकत नाही. पुढील अक्षरे मात्र सुवाच्च गिरवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर या दिवाळीत आहे.

यंदाची दिवाळी माझ्यासाठी खास आहे त्याच कारण म्हणजे ‘गोष्ट तशी गमतीची’ आणि ‘के दिल अभी भरा नही ही’ माझी नाटके सध्या रंगभूमीवर गाजत आहेत’ त्याचप्रमाणे यंदाच्या दिवाळीत मालिकांमध्ये मी व्यस्त नसल्याने बऱ्याच वर्षांनी घरी कुटुंबाला वेळ द्यायला मिळणार आहे. चकली, लाडू, शंकरपाळ्या असा साग्रसंगीत फराळ मी स्वत: करणार आहे. त्यासाठी मी प्रचंड उत्सुक आहे. दिवाळी हा सण सगळ्यांनी एकत्र येऊन भेटण्याचा आणि साजरा करण्याचा आहे म्हणून ही दिवाळी सांघिकपणे कशी साजरी करता येईल ह्याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. त्याचप्रमाणे दिवाळीची खरेदी करताना कमीत कमी ट्रॅफिक होईल ह्याची खबरदारी वैयक्तीक पातळीवर घ्यायला हवी.
दिवाळीच्या सुरवातीलाच एक मनाला चटका देणारी घटना घडली ती म्हणजे अश्विनी एकबोटे सारखी अभिनेत्री आज आपल्यात नाही. याला कुठेतरी आपलं सध्याच स्पर्धेचे युग, ताणतणाव, फास्ट लाईफ स्टाईल कारणीभूत आहे. त्यामुळे एका कलाकाराने आणि सर्वांनीच जागरूक असायला हवं. प्रत्येकाने स्वत:साठी थोडावेळ जरूर काढावा असा संदेश या दिवाळीच्या निमित्ताने मी देईन.

फटाक्यांवर पैसे जाळण्यापेक्षा शहिदांच्या निधीसाठी वापरा- रीना अगरवाल
दिवाळी म्हटली की गोड-धोड पदार्थ, नवीन खरेदी, फराळ, फटाके यांची रेलचेल. परंतु या दिवीळीला वायुप्रदूषणाला खतपाणी घालणाऱ्या महागडे फटाके प्रत्येकाने टाळावेत असा संदेश मी नक्कीच देईन. कारण फटाके जाळताना पर्यावरणाचा ऱ्हास तर होतोच पण एकप्रकारे आपण पैशांना जाळून टाकण्याप्रमाणे आहे. त्यामुळे ही दिवाळी आणि यापुढील अनेक दिवाळ्या फटाके न जाळता प्रदूषणविरहीत करण्याचा संकल्प प्रत्येकाने करायला हवा. आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी दिवसरात्र लढणाऱ्या जवानांचा जीव नेहमीच टांगणीला लागलेला असतो, त्यामुळे फटाक्यांवर पैसे जाळण्यापेक्षा तेच पैसे शहीद जवानांच्या निधीसाठी किंवा गरजू आश्रम, संस्थांसाठी वापरता येतील ह्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

यंदाच्या दिवाळीला माझ्या लहान बहीणीचे लग्न झाले असल्याने ही दिवाळी माझ्यासाठी तर खास आहेच आणि घरच्यांसाठी सुद्धा. त्यामुळे यावेळी लाडू, चकल्या, करंजी, अनारसे, सगळ्या फराळाचा आनंद आम्ही धाकट्या बहिणीच्या घरीच घेणार आहोत.