आज दिवाळीचा दुसरा दिवस. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रत्येकाच्याच घरी गोडाचे पदार्थ आवर्जुन असणार. पण दिवाळीच्या फराळाची तुलना कोणत्याच पदार्थांबरोबर केली जाऊ शकत नाही. यंदा सण इतक्या पटापट आल्यामुळे गृहिणींची चांगलीच धांदल उडतेय. त्यातही दिवाळीच्या फराळासाठीची लगबग, तो नीट होतोय की नाही यासाठी जीवाला लागून राहिलेली हुरहूर या साऱ्या गोष्टी सध्या घराघरात पाहायला मिळत आहेत. अशा या सणाच्या शुभमूहुर्तावर ‘लोकसत्ता ऑनलाइन’ काही पाककृती तुमच्या भेटीला आणत आहे. या पाककृती तुमच्या आवडत्या सेलिब्रिटींनी सांगितल्या आहेत.

दिवाळी म्हटलं की गोडधोड हमखास येतं. लाडू, शंकरपाळ्या, करंज्या हे सर्व पदार्थ घरी बनवलेच जातात आणि गोड खाणाऱ्यांना हे पदार्थ कितीही दिले तरी कमीच असतात. पण फराळापेक्षाही काही वेगळे पदार्थ केले जातात जे फक्त कोणत्या सणापुरतं मर्यादीत नसून कधीही खाऊ शकू असे असतात. अभिनेत्री अनुराधा राजाध्यक्ष यांनीही त्यांची खास पाककृती काश्मिरी दम आलू तुमच्यासोबत शेअर करत आहेत. तर जाणून घेऊयात या पाककृतीबद्दल…
त्यासाठी लागणारं साहित्य आहे-
माणशी दोन याप्रमाणे ६ मोठे बटाटे
खवा- १००- १५० ग्रॅम
४ टोमॅटो
३ कांदे, लसूण, आलं
हिरवा मसाला- कोथिंबीर, २-३ हिरव्या मिरच्या, कढिपत्ता, पुदिना

सोलाटण्याने बटाटे सोलून घ्यायचे, सोलाटण्याच्या टोकाने बटाटा आतून कोरुन घ्यायचा. बटाटा कोरण्याचेही एक साधन मिळते पण ते नसेल तर चमच्याच्या दुसऱ्या बाजूने किंवा सोलाटण्याने बटाटा कोरू शकतो. यानंतर बटाटा तेलात परतून घेऊ शकतो. पण मी तब्येतीच्या बाबतीत सजग असल्यामुळे माझ्या जेवणात तेलाचा कमीत कमी वापर असतो. त्यानंतर खवा कुस्करायचा किंवा मिक्सरमध्ये लावताना त्यात हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, पुदिना, कडिपत्ता या सगळ्या गोष्टी टाकाव्यात. हे सारण त्या बटाट्यात भरायचे. जे उरलेले सारण असते ते तसेच ठेवायचे. त्यानंतर ४ टॉमेटो मिक्सरमध्ये बारीक करुन घ्यायचे, ३ कांदे, आल्या- लसुणची पेस्ट कढईत तेलात परतवून घ्यायची. यावेळी २ टेबल स्पून तेल कढईत घातलं तरी चालेल. कांदे परतत असताना त्यात टॉमेटोची पेस्ट घालावी.

या पेस्टमध्ये भरून ठेवलेले बटाटे घालावेत आणि वरून गरम मसाला घालावा. त्यानंतर बटाटे कोरुन राहिलेला भाग आणि उरलेल्या खव्याचे सारण सगळे त्यात टाकावे. ग्रेव्ही घट्ट वाटत असेल तर त्यात गरजेनुसार पाणी किंवा दही घालावे. पॅनमध्ये ठेवून एक शिट्टी काढावी. शिट्टीवाला पॅन नसल्यास कुकरमध्ये केले तरी चालेल. सजावट म्हणून काजू आणि बेदाणे पेरावेत. गरमा गरम तुपाच्या पोळीबरोबर काश्मिरी दम आलू खाण्याची मजाच काही और असते.