कोणतीही व्यक्ती प्रसिद्धीझोतात येऊ लागली की त्या व्यक्तीच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी बरीच उत्सुकता पाहायला मिळते. मग या प्रसिद्ध व्यक्तींमध्ये मुख्यत: सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याबद्दल, त्यांच्या वाढदिवसाबद्दल हेरगिरी सुरु होते आणि काहीजण यात यशस्वीसुद्धा होतात. सेलिब्रिटींविषयी रंगणाऱ्या चर्चांमध्ये सर्वाधिक रंगणारा विषय म्हणजे त्यांची प्रेमप्रकरणं. कोणाचं नाव कोणाशी जोडलं जाणं आणि अफेअर नसतानाही त्यांच्या नावाभोवती नात्याचं वलय निर्माण करणं हे सर्रास सुरु असतच. पण, या सर्व स्वरचित गोंधळामध्ये आणखी एक गोंधळ घातला जातो, तो म्हणजे सेलिब्रिटींच्या वाढदिवसाचा.

केव्हा केव्हा तर आज आमचा वाढदिवस नाहीये असं खुद्द सेलिब्रिटींनाच सांगावं लागतं. अचानक वाढदिवसाची ही चर्चा सर्वांसमोर आणण्याचं कारण आहे मराठीतील सुपरहिट आणि एव्हरग्रीन जोडी, सचिन- सुप्रिया यांचा वाढदिवस. इंटरनेटवर उपलब्ध माहिती आणि बऱ्याच चर्चांमधून समोर येणारी माहिती पाहिल्यावर या दोघांचाही वाढदिवस एकाच दिवशी म्हणजे १७ ऑगस्टला असल्याचं म्हटलं जातं. मुख्य म्हणजे विकिपीडियावरही या दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी असल्याची माहिती देण्यात आली आहे. या सर्व गोंधळामुळे सोशल मीडियापासून ते अगदी विविध कार्यक्रमांमध्ये या एव्हरग्रीन जोडीला एकाच दिवशी शुभेच्छा देण्यात येतात. चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार नुकताच (१६ ऑगस्टला) एका कार्यक्रमामध्ये सचिन पिळगावकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. त्यावेळीच त्यांनी ही बाब स्पष्ट केली की, आज आपला वाढदिवस नसून सुप्रियाजींचा वाढदिवस आहे.

मुख्य म्हणजे श्रिया पिळगावकरनेही तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन फक्त सुप्रियाजींनाच १६ ऑगस्टला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अद्यापही या दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी असल्याचा समज कायम आहे. त्यामुळे आता कलाकारांच्या वाढदिवसांमध्ये केली जाणारी गल्लत थांबणार कधी, हाच प्रश्न सर्वांच्या मनात घर करत आहे. फक्त सचिन आणि सुप्रिया यांच्याच वाढदिवसांच्या तारखांमध्ये हा गोंधळ घालण्यात येतोय असं नाही. दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि त्यांचा मुलगा अभिनय बेर्डे यांच्या वाढदिवसांच्या तारखांमध्येही बऱ्याचदा गोंधळ घालण्यात येतो. गेल्याच वर्षी अभिनय बेर्डे चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार असल्यामुळे त्याच्या आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या वाढदिवसाच्या वेळी असा गोंधळ पाहायला मिळाला होता. त्यावेळी खुद्द प्रिया बेर्डे यांनीच ही माहिती चुकीची असल्याचं स्पष्ट केलं होतं. दरवर्षी आपल्याला हा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचं बेर्डे त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणाल्या होत्या. त्यासोबतच विकिपिडियावरील माहिती चुकीची असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.

वाचा : लक्ष्मीकांत आणि अभिनयचा वाढदिवस एकाच दिवशी नसतो; प्रिया बेर्डेंचा खुलासा

आपले वाढदिवस चुकीच्या दिवशी साजरा करण्याविषयी या कलाकारांच्या मनात कोणाविरोधात कोणताही राग नाही. पण, जर एखादा कलाकार आपल्याला इतकाच आवडत असेल तर त्याच्याविषयी आपल्या हाती असलेली माहिती निदान पडताळून ती खरी असल्याची निश्चिती करण्यात काहीच हरकत नसावी, अशी एक भावना प्रकर्षाने समोर येते. त्यामुळे येत्या काळात वाढदिवसांच्या तारखांमुळे होणारा हा सावळा गोंधळ कुठेतरी थांबेल अशी आशा आहे.