प्रिया बापट
माझं लहानपण दादरला गेलं असल्यामुळे नेहमीच्या आयुष्याचा भाग वाटणारी आणि कधीच परकी न वाटणारी गोष्ट म्हणजे ‘गर्दी.’ माझा जन्म शिवाजी पार्कचा आणि मी राहायचे दादर स्टेशनपासून चालत दोन मिनिटं अंतरावर. गर्दी हा दादरचा अविभाज्य भाग आहे. ज्या दिवशी रस्त्याला गर्दी नसते त्या दिवशी नक्की काहीतरी प्रॉब्लेम असणार किंवा सोमवार असणार. या सोमवारचं लहानपणी विशेष कौतुक वाटायचं. मंगळवार ते रविवार गजबजलेला रस्ता अचानक सुना सुना वाटे, काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटे.

माझ्या दादरच्या घरातल्या बाल्कनीतून तासन्तास ही गर्दी पाहत असे. त्यात वेळ कसा जायचा ते कळायचंच नाही. मोठी होत गेले तसं निरीक्षण वाढलं. आता मी या गर्दीत गोष्ट शोधू लागले. गाडीला टेकून उभ्या असणाऱ्या नवीनच प्रेमात पडलेल्या कॉलेजच्या जोडप्याचा संवाद, प्रेम, भांडण असो की उनाड मुलांचा कंपू, बासरीवाल्यापासून ते अगदी एकमेकांना साथ देणारे आजी-आजोबा, मुलाला ओढत शाळेत नेणारी आई, अगदी नवरा-बायकोचं भांडणसुद्धा. कधी कधी हे सगळं इतक्या मोठय़ा आवाजात चालू असे की त्यांचे संवाद मला बाल्कनीत तिसऱ्या मजल्यावरही स्पष्ट ऐकू येत. तर कधी कधी त्यांच्या हावभावावरून अंदाज बांधायचे. एकदा एक आजोबा नुसतेच अनेक तास रस्त्याच्या कोपऱ्यात बसून होते. मी दिवसभर त्यांना पाहत होते. काय चाललं असेल त्यांच्या मनात? घरचा पत्ता विसरले असतील? घरच्यांनी टाकलं असेल? की वेडे असतील? त्यांच्या मनात नक्की काय असेल याचा अंदाज शेवटपर्यंत आला नाही. संध्याकाळी पोलीस घेऊन गेले. ते त्यांच्या घरी अथवा वेडय़ांच्या दवाखान्यात गेले असावेत.

या गर्दीतल्या लोकांच्या मनात चाललेल्या गोष्टीचा मी अंदाज बांधायचे. मोठी झाल्यावर मीही या गर्दीचा भाग कधी झाले कळलंच नाही. आता मात्र त्यांच्याबरोबर चालताना त्यांना अधिक जवळून अनुभवत होते. गर्दीला एक स्वत:चं अस्तित्व असतं हे जाणवलं. तिच्यातही गरीब-श्रीमंत असा भेदभाव आहेच. गर्दीच्या अस्तित्वाची जाणीव करून देतो तो गर्दीचा वास. रस्त्यावरच्या गर्दीचा वास वेगळा. मंडईवरच्या गर्दीचा वास वेगळा, ट्रेनच्या गर्दीचा वास वेगळा. एसी मेट्रोमधला गर्दीचा वास वेगळा. गर्दी तीच. वेगवेगळ्या स्तरांतली, विविध स्वभावांची, विविध वृत्तींची, विविध आर्थिक परिस्थितीची; या प्रत्येक गर्दीचा एक स्वभाव असतो. मूडही असतो. याच गर्दीत माणसं एकमेकांना धक्केही देतात; पण वेळ आलीच सांभाळूनही घेतात. याच गर्दीत खिसेकापू पैसे कमवतात आणि याच गर्दीतील लोक प्रसंगी पैशाचा विचार न करता मदतीला धावून येतात. बसायला जागा मिळाली नाही की ट्रेनमध्ये रागाने चरफडतात, पण त्याच गर्दीत एकमुखाने भजनही गातात. गर्दीचा फायदा घेऊन अनेक वेळा शारीरिक त्रासही सहन करावा लागतो, पण मन एकटं असताना हीच गर्दी आपलीशी वाटते.

गर्दी ही फक्त माणसांची नसते हे थोडं अजून मोठं झाल्यावर कळलं. घरात एकटं बसूनही गर्दीचा अनुभव येतोच हल्ली. पण ही गर्दी विचारांची असते. चांगल्या, वाईट, आनंदी, दु:खी, चूक, बरोबर अशा सगळ्या विचारांची डोक्यात झालेली गर्दी. या गर्दीला वास नाही पण स्वभाव आहे. ऑफिस, कॉलेज, शाळांमध्ये असलेल्या जीवघेण्या स्पर्धेत स्वत:ला टिकवून ठेवण्याची जिद्द, धडपड, रोज भेटणारी नवी माणसं, निर्माण होणारी नवी नाती, नात्यांना मिळणारी नवी ओळख आणि त्यातून वाढत जाणारा गुंता, आपणच वाढवून ठेवलेल्या गरजा आणि त्या पूर्ण करण्यासाठी स्वत:ची चाललेली ओढाताण. प्रश्नं वाढतच जातात पण उत्तरं त्याच वेगाने मिळत नाहीत. रस्त्यावरच्या गर्दीला सोमवारी तरी सुट्टी मिळायची. पण डोक्यातल्या गर्दीला सोमवारही नाही.

माझ्या प्रवासामध्ये मी एकटी असले तरी विचार कायमच सोबतीला असतात. सतत विचारांच्या आणि भावभावनांच्या गराडय़ात असतो. या गर्दीबद्दल एकदा विचार करत बसले होते. मनातली ही गर्दी जास्त सोपी की रस्त्यावरील माणसांची गर्दी सोपी? विचार करताना एक लक्षात आलं की आपण बाहेरून जे पाहतो ते नेहमीच सोपं वाटतं आणि आपण ज्याचा भाग असतो ते नेहमीच क्लिष्ट वाटतं. माणसांच्या गर्दीत अडकलेलो असताना त्यातून कधी एकदा बाहेर पडतोय, असं वाटतं. पण हीच माणसांची गर्दी बाल्कनीतून पाहताना फारच गमतीशीर वाटते. मनात चाललेल्या विचारांच्या आणि भावनेच्या गर्दीने मनाची घालमेल होते, उत्तर शोधण्यासाठीची धडपड सुरू होते. पण दुसऱ्याच्या मनात चाललेल्या गोष्टींचं नुसतं निरीक्षण करत बसायला आपण खूप उत्सुक असतो. आपण एवढा कसला विचार करतो? का करतो? मनुष्याचा स्वभावधर्म म्हणायचा की ओढवून घेतलेल्या सवयी आणि तणाव? चिमणीची पिल्लं काही दिवसांत स्वतंत्र होऊन उडून जातात. प्राण्यांची पिल्लंदेखील काही दिवसांतच स्वत: शिकार करतात. माणसाचं मात्र तसं नसतं. नवं जन्माला आलेलं बाळ स्वत:च्या पायावर उभं राहायलाच किमान वर्ष-दीड वर्ष घेतं. आपली मुलं कितीही मोठी झाली तरीही माणसांची एकमेकांमधली भावनिक गुंतवणूक त्यांना कधीच पूर्ण स्वतंत्र होऊ देत नाही. मग तयार होते भावनांची गर्दी. दुसऱ्याच्या, स्वत:च्या आनंदाची, यशाची, कुरघोडीची, स्पर्धेची, समृद्धीची, काळजीची आणि अपेक्षांची मनात आणि डोक्यात भरलेली गर्दी. सोमवार, रविवार कधीच सुट्टी न घेणारी.

मध्यंतरी एक पुस्तक वाचताना या सर्व विचारांवर उत्तर मिळालं आणि वाटलं असं जगता आणि असं वागता आलं तर सगळं जग सुखी होईल. ‘नदी ही एकाच वेळी सर्वत्र असते. तिच्या मुखाशी, तिच्या मूळ उगम स्रोताशी, धबधब्याशी, तिच्या पात्राशी आणि समुद्राला मिळते तिथेही. ती एकाच वेळी सगळीकडे असते. पण आपण जिथे तिला पाहतो, त्या वेळी फक्त तिथेच तिला अनुभवू शकतो. त्या क्षणी तिचे त्या क्षणाचे अस्तित्व सोडून ना आपण तिचे मूळ स्रोत पाहू शकतो, ना जिथे ती समुद्रास मिळते ते पाहू शकतो’, याचा अर्थ असा की, माणसानेही भविष्य आणि भूतकाळात न अडकता वर्तमानातल्या प्रत्येक क्षणाची पूर्ण अनुभूती घेतली पाहिजे. नदीसारखं त्या क्षणी तिथे जगता आलं पाहिजे. जर भूतकाळाचा किंवा भविष्याचा त्रास, काळजी नसेल तर डोक्यातल्या गर्दीला रोजच सोमवारची सुट्टी मिळेल, नाही का?

प्रिया बापट – response.lokprabha@expressindia.com @bapat_priya
सौजन्य – लोकप्रभा