23 August 2017

News Flash

‘अपराध मीच केला’  कोमट प्रयोग

अभिनेते अरुण सरनाईक यांनी नौदल कमांडरची प्रमुख भूमिका साकारली होती.

रवींद्र पाथरे | Updated: August 13, 2017 1:19 AM

‘अपराध मीच केला’ हे नाटक विजय गोखले यांच्या दिग्दर्शनाखाली रंगमंचावर पुनश्च आलेलं आहे.

१९५९ साली भारतीय नौदलातील कमांडर के. एम. नानावटी याने आपली पत्नी सिल्विया हिचा प्रियकर प्रेम आहुजा याच्या प्रक्षोभाच्या भरात केलेल्या खुनामुळे तेव्हा प्रचंड खळबळ उडाली होती. नोकरीमुळे घरापासून बराच काळ दूर राहावे लागणाऱ्या कमांडर नानावटीच्या परोक्ष त्याची पत्नी सिल्विया हिचे नानावटीचा मित्र प्रेम आहुजाशी प्रेमसंबंध निर्माण झाले. नानावटीला मात्र याचा काहीच थांगपत्ता नव्हता. तो घरी आल्यावर सिल्विया आपल्याशी पूर्वीप्रमाणे मनमोकळेपणी वागत-बोलत नाही हे त्याच्या ध्यानी आले असले तरी त्याचे कारण मात्र त्याला कळले नव्हते. मात्र, एके दिवशी सिल्वियानेच आपले आहुजाशी प्रेमसंबंध असल्याचे नवऱ्याला सांगून टाकले. याचा प्रचंड मानसिक धक्का बसलेला नानावटी रागाच्या भरात प्रेमच्या घरी गेला आणि त्याने प्रेमला- ‘सिल्वियाला तू मुलांसह स्वीकारायला राजी आहेस का?’ असा सवाल केला. परंतु प्रेमने त्याला स्पष्टपणे नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या नानावटीने त्याच्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या आणि त्याचा खून केला.

या खून प्रकरणाचे समाजमानसात प्रचंड पडसाद उमटले. ‘ब्लिट्झ’सारख्या नियतकालिकाने कमांडर नानावटीची बाजू घेऊन माध्यमांतून हे प्रकरण जोरदारपणे लावून धरले. यथावकाश खटला उभा राहिला. त्यावेळी मुंबई राज्यात न्यायालयीन ज्युरी पद्धती अस्तित्वात होती. नानावटीने मानसिक व भावनिक प्रक्षोभाच्या उद्रेकात प्रेम आहुजाचा खून केल्याचे ग्राह्य़ धरून ज्युरींनी त्याची ‘योजनापूर्वक खून’ केल्याच्या आरोपातून मुक्तता केली. परंतु ज्युरींच्या या निर्णयाला आव्हान देत हा खटला पुढे उच्च न्यायालयात गेल्यावर ज्युरींचे म्हणणे अमान्य होऊन नानावटीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. (नानावटी प्रकरणानंतर ज्युरींकरवी न्यायदान करण्याची ब्रिटिशकालीन पद्धती संपुष्टात आली.) तथापि, न्यायालयाचा हा निकाल मंजूर नसलेले लोकमानस व्यभिचारी पत्नीच्या प्रियकराचा खून करणाऱ्या नानावटीच्या बाजूने एकजुटीने उभे ठाकले होते. लोकांच्या या दबावामुळे अखेरीस तीन वर्षांच्या कारावासानंतर मुंबई राज्याच्या तत्कालीन राज्यपाल विजयालक्ष्मी पंडित यांनी आपल्या विशेषाधिकारात कमांडर नानावटीची उर्वरित शिक्षा माफ केली आणि त्याची तुरुंगातून सुटका करण्यात आली. तदनंतर कमांडर नानावटी सहकुटुंब कॅनडात स्थलांतरित झाले आणि तिथे त्यांनी मागचे झाले गेले विसरून नव्याने सहजीवनास प्रारंभ केला.

नानावटी खून प्रकरण त्याकाळी एवढे गाजले होते, की त्यावर नंतर अनेक पुस्तके लिहिली गेली. या घटनेवर आधारित ‘अचानक’ आणि अलीकडेच ‘रूस्तम’ या सिनेमांचीही निर्मिती झाली. मराठीत नाटककार मधुसूदन कालेलकर यांनी ‘अपराध मीच केला’ या नावाचे नाटक त्यावर लिहिले. त्यात अभिनेते अरुण सरनाईक यांनी नौदल कमांडरची प्रमुख भूमिका साकारली होती. हे नाटकही प्रेक्षकपसंतीस उतरलं होतं.

आणि आता बऱ्याच काळानंतर ‘अपराध मीच केला’ हे नाटक विजय गोखले यांच्या दिग्दर्शनाखाली रंगमंचावर पुनश्च आलेलं आहे. रमेश भाटकर यात कमांडर अशोक वर्टीची भूमिका निभावत आहेत. त्याकाळच्या शिरस्त्यानुसार प्रदीर्घ असलेलं हे नाटक आता दोन अंकांत सुटसुटीपणे संपादित करून विजय गोखले यांनी ते मंचित केलं आहे. मूळ सत्य घटनेतील प्रसंगांचाच आधार या नाटकात घेतलेला आहे. मराठी रंगभूमीच्या मध्यमवर्गीय जाणिवांच्या चौकटीत (पात्रांचंही मराठीकरण करून!) हे नाटक लिहिलं गेलं असल्याने राजापूरच्या गोळेमास्तरांचं साचेबद्ध  ‘संस्कृतिरक्षक’ पात्र या नाटकात येणं ओघानं आलंच. आज मात्र ते कालबाह्य़ वाटतं. परंतु तरीही बोधामृत पाजण्यासाठी रंगावृत्तीकारांनी ते कायम ठेवलं आहे. असो. नानावटी खून खटल्यात मूळ वास्तव घटनाच इतक्या नाटय़पूर्ण आहेत, की लेखकाला त्यात काही अधिकची भर घालण्याची तोशीस पडलेली नाही. नानावटी हे पारशी. त्यांची उच्चभ्रू पत्नी सिल्विया पाश्चात्त्य आचारविचारांत वाढलेली. त्यामुळे स्वाभाविकपणेच त्यांची विवाहबाह्य़ संबंधांकडे पाहण्याची दृष्टी आपल्या मध्यमवर्गीय संवेदनांपेक्षा वेगळी असणार, हेही स्वाभाविकच. अर्थात माणसाच्या मूलभूत भावभावना तो कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या वर्गस्तरातला आहे यावर ठरत नाहीत, हेही तितकंच खरंच. तथापि, लेखकानं यातल्या नाटय़पूर्ण प्रसंगांवर जेवढा भर दिला आहे, तेवढा पात्रांच्या मनोव्यापारावर दिलेला नाही. गोळेमास्तरांसारखं आदर्शवादी पात्र योजून लेखकानं नैतिकतेसंबंधातील आपली भूमिकाही जाहीर करून टाकली आहे.   नानावटी प्रकरणात तत्कालीन समाजाची जी मनोभूमिका होती, तीच लेखकाचीही आहे. आजच्या लेखकानं कदाचित वेगळ्या कोनातून या प्रकरणावर झोत टाकला असता. असो.

दिग्दर्शक विजय गोखले यांनी लेखकाच्या भूमिकेशी सहमती दर्शवत ‘मम्’ म्हटलं आहे. बदललेल्या काळानुसार नाटकाचा अन्वय लावण्याच्या झमेल्यात ते पडले नाहीत. संहितेबरहुकूम प्रयोग बसवण्यास त्यांनी प्राधान्य दिलं आहे. आणि त्यांनी ते चोख पार पाडलं आहे.

नेपथ्यकार उल्हास सुर्वे यांनी कमांडर अशोक वर्टीचं घर, न्यायालय, तसंच शाम अजिंक्यचं (कमांडर वर्टीच्या बायकोचा प्रियकर) घर नाटकाच्या मागणीनुसारी उभं केलं आहे. ज्ञानेश पेंढारकर यांची संगीतयोजना नाटय़ात्मकतेत भर घालणारी आहे. प्रकाशयोजना पुंडलिक सानप यांची आहे. राजन आणि नंदू वर्दम यांनी रंगभूषेची, तर अंजली खोब्रेकरांनी वेशभूषेची जबाबदारी पार पाडली आहे.

उंची व भारदस्त देहयष्टीमुळे रमेश भाटकर कमांडर अशोक वर्टीच्या भूमिकेत शोभले आहेत. पतीपासून दीर्घकाळ दूर राहावं लागणाऱ्या आणि त्यातून स्खलित झालेल्या स्त्रीची कोंडी, घालमेल आणि भावनिक आंदोलनं निशा परुळेकर (कमांडर अशोक वर्टीची पत्नी शैला) यांनी आपल्या परीनं व्यक्त केली आहेत. विघ्नेश जोशी यांनी गुलछबू, आपमतलबी प्रियकर शाम अजिंक्य यथार्थतेने रंगवला आहे. विजय गोखले यांनी आपला विनोदी भूमिकांचा हमरस्ता सोडून बोधामृत पाजणारे आदर्शवादी गोळेमास्तर गांभीर्यानं साकारले आहेत. अन्य भूमिकांत संजय क्षेमकल्याणी (उपळेकर वकील), किशोर सावंत (न्यायाधीश असलेले शैलाचे वडील बाबासाहेब), यश जोशी (वर्टी दाम्पत्याचा मुलगा संजय), विलास गुर्जर (जज्), सोनाली बंगेरा (शाम अजिंक्यची बहीण), गणेश बने, विवेक टेमघरे, प्रवीण दळवी यांनी आपापली कामं चोख केली आहेत.

First Published on August 13, 2017 1:19 am

Web Title: marathi drama aparadh mich kela review by ravindra pathare loksatta
  1. No Comments.