सांकेतिक भाषेत मूकबधिर तरुणींची कहाणी
मराठी रंगभूमीवर तरुण लेखक, दिग्दर्शक आणि कलाकारांकडून काही नवे प्रयोग सातत्याने केले जात आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना प्रेक्षकांकडूही चांगला प्रतिसाद मिळत आहे. याच प्रयत्नातून ‘कानांची घडी तोंडावर बोट’ हे नवे नाटक रंगभूमीवर सादर होणार आहे. मूकबधिर तरुणींची कहाणी असलेल्या या नाटकात त्यांच्या सांकेतिक भाषेचा वापर करण्यात आला आहे. २६ मे रोजी शिवाजी मंदिर येथे नाटकाचा पहिला प्रयोग सादर होणार आहे.
मूकबधिर तीन तरुणींची कथा या नाटकात सादर करण्यात आली असून नाटकात या मुली त्यांच्या सांकेतिक भाषेत बोलताना दाखविल्या आहेत, तर त्यांच्या मनात जे काही आहे ते व्यक्त करण्यासाठी वेगळ्या तीन पात्रांची योजना करण्यात आली आहे. या नाटकाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या कार्यक्रम मालिकेतील प्रसाद खांडेकर व संदीप गायकवाड हे दोघे जण या नाटकाच्या निमित्ताने व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करत आहेत.
नाटकाचे लेखन संकेत तांडेल यांनी केले असून दिग्दर्शन प्रसाद खांडेकर यांचे आहे. सांकेतिक भाषेचे तज्ज्ञ सीताराम चव्हाण यांच्याकडे कलाकारांनी दोन महिन्यांचे खास प्रशिक्षण घेतले आहे. श्री दत्तविजय प्रॉडक्शनचे दत्ता घोसाळकर हे यांनी नाटकाची निर्मिती केली आहे. नाटकात पूजा रायबागी, पूर्वा कौशिक, वृषाली खाडिलकर, नम्रता सावंत, स्नेहा पाटील, हेमंत नारकर हे कलाकार आहेत.